तुम्हाला डायबेटीस आहे? मग साखर तुमच्यासाठी पूर्णपणे वर्ज असते.
पण जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही काय करता?
मधुमेह असताना मध खावा की नाही..
साखरेला पर्याय म्हणून मध खाल्ला तर चालतो का?
चालत असेल तर किती प्रमाणात याबद्दल अनेक मते ऐकायला मिळतात.
यामुळे नक्की काय खरे काय खोटे हे समजत नाही.
या लेखात यावरच प्रकाश टाकला जाणार आहे.
जेव्हा आपण म्हणतो एखादी गोष्ट चालते किंवा चालत नाही तेव्हा त्यामागची कारणे आपल्याला कारणे माहीत पाहिजेत.
या लेखात मधुमेह म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते असतात आणि साखर, मध या पदार्थांचा मधुमेहींच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि मधुमेहींनी मधाचा वापर कसा करावा याबद्दल सगळी माहिती सोप्या शब्दात सांगितली आहे.
या लेखात आपण मधुमेहींना साखरेला पर्याय म्हणून मध वापरता येतो का?
या मुख्य प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत पण त्यापूर्वी आपण थोडक्यात मधुमेह म्हणजे काय हे बघूया.
डायबेटीस किंवा मधुमेह म्हणजे काय?
डायबेटीसमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
आपल्या शरीरातील स्वादुपिंड (पॅनक्रियाज) हे इन्सुलिन तयार करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करत असतात.
जर तुम्हाला डायबेटीस असेल तर, तुमचे स्वादुपिंड एकतर इन्सुलिन तयार करत नसते किंवा तयार केलेले इन्सुलिन तुमच्या शरीराला वापरता येत नसते.
मधुमेहाचे चार प्रकार असतात
१. टाईप 1 डायबेटीस – यामध्ये स्वादुपिंड एकतर इन्सुलिन तयार करत नाही किंवा केले तर अत्यंत कमी प्रमाणात करते.
२. टाईप 2 डायबेटीस – यामध्ये स्वादुपिंडाद्वारे इन्सुलिन तयार केले जाते, पण काही कारणाने ते आपले शरीर वापरू शकत नाही.
ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत जाते.
३. प्री डायबेटीस – ही डायबेटीस होण्याआधीची पायरी आहे.
यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नॉर्मलपेक्षा वाढलेले असते पण डायबेटीस झाला असे निदान करण्याइतपत नाही.
औषधांशिवाय हा डायबेटीस नियंत्रणात आणला जाऊ शकतो.
४. गरोदरपणात होणारा डायबेटीस – हा मधुमेह गरोदरपणात काही स्त्रियांना होतो.
बाळाच्या जन्मानंतर तो बरा होतो.
डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीच्या आहारात साहजिकच साखर आणि आणि असे पदार्थ ज्यामुळे शरीरात साखर निर्माण होते ते वर्ज असतात.
म्हणजेच मधुमेहींसाठी साखरेबरोबरच कार्बोहायड्रेट्स, कारण त्यांचे शरीरात गेल्यावर साखरेत रुपांतर होते, सुद्धा कमी करण्याची गरज असते.
म्हणूनच जर तुम्हाला डायबेटीस असेल तर साखर, भात, बटाटा इत्यादी पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.
कारण त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते.
पण डायबेटीस असून सुद्धा तुम्हाला गोड खायची इच्छा होऊच शकते, नाही का?
अशा वेळेस साखरेला पर्याय म्हणून मधाचा वापर केला जाऊ शकतो का?
त्यासाठी खालील मुद्दे समजून घेणे गरजेचे आहे.
१. साखरेच्या तुलनेत मधामध्ये कमी कार्बोहायड्रेट्स असतात.
यामुळे साखरेच्या तुलनेत मध खाल्ल्याने रक्तातील साखर एकदम वाढण्याचा धोका कमी असतो.
२. साखरेच्या तुलनेत मधासाठी शरीराला कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करावे लागते.
३. मध हा साखरेपेक्षा जास्त गोड असतो कारण मधामध्ये फ्रुक्टोज हि साखर ग्लुकोजपेक्षा जास्त प्रमाणात असते.
तर साखरेमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज समप्रमाणात असतात.
यामुळेच पदार्थात गोडसरपणा येण्यासाठी साखरेच्या तुलनेत मध कमी प्रमाणात लागतो. थोडक्यात, यामुळे शरीरात जाणारे कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी होते.
वरील मुद्दे वाचून तुमच्या हे लक्षात आलेच असेल की मधुमेहींसाठी मध हा काही प्रमाणात साखरेपेक्षा चांगला पर्याय ठरू शकतो.
पण शेवटी मधातून सुद्धा कमी प्रमाणात का होईना शरीरात कार्बोहायड्रेट्सच जात असतात.
तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुमच्या आहारातून तुमच्या पोटात दर जेवणात फक्त ६० ग्राम कार्बोहायड्रेट्स गेले पाहिजेत.
डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी साखर आणि कार्बोहायड्रेट्स धोकादायक असतात, ज्यामुळे आपण एरवी वापरतो ती साखर ते खाऊ शकत नाहीत.
पण जर काही ठरविक पदार्थांमध्ये गोडसर चव हवी असेल तर साखरेपेक्षा मध हा चांगला पर्याय असू शकतो.
याचा अर्थ असा नाही की मध हा साखरेला पर्याय म्हणून नेहमीच वापरण्यास योग्य आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर ती गोष्ट हानिकारकच ठरते.
त्यात मधुमेह असेल तर कॅलरीजचा सुद्धा विचार करणे गरजेचे असते.
मधामध्ये कॅलरी सुद्धा जास्त प्रमाणात असतात. मधुमेही व्यक्तीची तब्येत, डॉक्टरांचा सल्ला या ही गोष्टी महत्वाच्या असतात.
मधाचा वापर केल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी बघणे गरजेचे आहे.
या लेखाच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालेच असेल.
डायबेटीस असणाऱ्यांसाठी, अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्याने मध हा साखरेच्या तुलनेत चांगला पर्याय ठरू शकतो.. तो सुद्धा कमी प्रमाणात आणि क्वचित.
मधाचा औषध म्हणून पण मधुमेहावर उपयोग केला जाऊ शकतो.
तुम्ही जर मधुमेही असाल तर तुम्ही मधाचा वापर खालील प्रकारे करू शकता.
१. मध आणि दही
रोज सकाळी उठल्यावर काहीही खायच्या प्यायच्या आधी एक चमचाभर दही आणि अर्धा चमचा मध व्यवस्थित एकत्र करून घेतल्याने फायदा होतो.
महिनाभर हा उपाय केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित व्हायला मदत होते.
२. मध आणि दालचिनी
दालचिनी मिक्सरला दळून पूड करून घ्यावी.
एक कप दालचिनी पूड एक कप उकळत्या पाण्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
दालचिनी पाण्यात पूर्णपणे विरघळली पाहिजे.
दालचिनी विरघळली की हे पाणी झाकून अर्ध्या तासासाठी ठेऊन द्यावे.
दालचिनी घातलेले पाणी थंड झाले की त्यात एक चमचा मध घालून, व्यवस्थित ढवळून घ्यावे.
हा दालचिनी आणि मधाचा काढा रोज सकाळी उठल्यावर काही खायच्या अगोदर घेतल्याने डायबेटीस नियंत्रणात राहायला मदत होते.
तुमच्या सोयीसाठी तुम्ही दालचिनीची पूड तयार करून हवाबंद डब्यात भरून ठेऊ शकता.
३. मध तुळस चाटण
या चाटणामध्ये मध आणि तुळस याबरोबर हळद आणि कडुलिंब सुद्धा वापरले जातात.
हे सगळेच घटक अत्यंत औषधी आहेत त्यामुळे हे चाटण कडू लागले तरी त्याचा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.
हे चाटण करायला एक चमचा मध, ३ चमचे तुळशीची वाळवलेली पाने, ३ चमचे कडुलिंबाची वाळवलेली पाने आणि ३ चमचे हळद हे रिकाम्या पोटी घेतल्याने फायदा होतो.
वर दिलेले कोरडे घटक या प्रमाणात एकत्र करून हवाबंद डब्यात भरून ठेवता येतात. असे केल्याने सकाळी फक्त एक चमचा तयार मिश्रणाची पूड घेऊन त्यात एक चमचा मध घालून घेणे सोयीचे पडते.
४. आल्याचा चहा आणि मध
सकाळी उठल्यावर आल्याचा चहा घेतल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते हा अनुभव तुम्हाला असेलच.
पण या चहामध्ये जर मधाचा वापर केला तर याचा फायदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सुद्धा होतो.
यासाठी नेहमीच्या पद्धतीने आल्याचा चहा करून घ्यायचा, फक्त त्यात साखर आणि दुध घालायचे नाही.
म्हणजे एक कप पाण्यात एक चमचा चहा पावडर घालून पेरभर आले किसून उकळून घ्यायचे. नंतर यामध्ये अर्धे लिंबू पिळून एक चमचा मध घालून प्यावे.
५. ग्रीन टी आणि मध
ग्रीन टीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेतच. त्यात शक्यतो साखरेचा वापर केला जात नाहीच आणि गोड चवीसाठी मध घालता येऊ शकतो. रोजच्या चहाच्या ऐवजी ग्रीन टी घेणे कधीही आरोग्यपूर्ण ठरते.
तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काही प्रमाणात तुम्ही मधाचा वापर करू शकता. मधुमेह नसणाऱ्या लोकांसाठी सुद्धा नेहमीच्या साखरेपेक्षा मध हा एक चांगला पर्याय ठरतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.