प्रत्येकाला त्वचेचे वेगवेगळे त्रास असतात.
काहींची त्वचा फारच तेलकट असते तर काहींची एकदम कोरडी, रुक्ष त्वचा.
ज्यांची त्वचा अशी कोरडी असते त्यांना थंडीत जरा जास्तच त्रास होतो.
त्वचा कोरडी पडून त्यावर भेगा धरणे, खाज सुटणे असे त्रास होतात.
खाजवल्यामुळे त्वचा अजूनच खराब होण्याची शक्यता असते.
यामुळे त्वचेवर जखमा सुद्धा होऊ शकतात.
कोरडी त्वचा असेल तर चेहरा अगदी मलूल, थकलेला दिसतो.
यावर बाजारात अनेक क्रीम्स, फेसपॅक उपलब्ध आहेत.
ते वापरून फायदा सुद्धा होत असेल.
पण जर तुम्हाला कोणी सांगितले की अशा तुकतुकी गेलेल्या, कोरड्या आणि रुक्ष त्वचेसाठी तुम्ही घरच्याघरी फेसपॅक बनवून लावू शकता तर?
बाहेरच्या महागड्या फेसपॅकचा कधीकधी त्वचेवर विपरीत परिणाम सुद्धा होण्याची शक्यता असते.
त्यापेक्षा जर घरच्याघरी, सोप्या पद्धतीने आणि मुख्य म्हणजे नेहमी घरी असणाऱ्याच साहित्यातून जर फेसपॅक बनवता येत असेल तर निश्चितच कोणालाही आनंद होईल.
या लेखात असे तीन फेसपॅक कसे तयार करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा ज्यामुळे तुमचा कोरड्या त्वचेचा त्रास हमखास दूर होईल हेच सांगितले आहे.
१. बनाना हनी फेसपॅक
कोरड्या, रुक्ष त्वचेसाठी हा एक अत्यंत उपयुक्त फेसपॅक आहे.
यामध्ये लागणारे घटक सुद्धा नेहमी घरी असतातच आणि हा तयार करायला देखील अतिशय सोपा आहे.
त्यामुळे यासाठी फार तयारी करावी लागत नाही.
हा फेसपॅक करायला एक व्यवस्थित पिकलेले केळे, एक चमचा मध आणि अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल लागते.
पॅक तयार करायला पिकलेले केळे हाताने कुस्करून घ्यायचे व त्यात मध आणि ऑलीव्ह ऑइल घालून पेस्ट करून घ्यायची.
ही पेस्ट चेहऱ्याला व मानेला लावून दहा मिनिटे तशीच ठेवावी.
यानंतर पाण्याने चेहरा व्यवस्थित धुवून घ्यावा.
मध कोरड्या त्वचेला पोषण देण्याचे काम करतो.
केळ्यामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी’, ‘सी’ व ‘ई’ जास्त प्रमाणात आढळतात.
यामुळे त्वचा तुकतुकीत दिसण्यास मदत होते.
ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात.
यामुळे त्वचेवरचे फ्री रॅडिकल्स निघून जाऊन त्वचेचा पोत सुधारतो.
या फेसपॅकच्या नियमित वापराने चेहऱ्याची कोरडी, रुक्ष त्वचा मऊ आणि टवटवीत व्हायला मदत होते.
२. काकडीचा फेसपॅक
काकडीचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत.
काकडीमध्ये व्हिटामिन ‘ई’ जास्त प्रमाणात असतात.
यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या जायला मदत होते. त्वचा जर कोरडी असल तर त्यावर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण जास्त असते.
काकडीतील पाण्याच्या अंशामुळे कोरड्या त्वचेला ओलावा मिळतो.
यामुळे त्वचेच्या कोरडेपणामुळे येणारी खाज, त्यामुळे होणाऱ्या जखमा कमी होतात.
काकडीचा अजून एक फायदा असा की काकडीमुळे त्वचेवरचा काळपटपणा दूर व्हायला मदत होते.
त्यामुळे जर तुमचे उन्हात जास्त फिरणे होत असेल तर हा पॅक वापरल्याने उन्हामुळे आलेला टॅन सुद्धा कमी व्हायला मदत होईल.
काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी अर्ध्या काकडीचा गर काढून हातानेच मऊ करून घ्यावा.
काकडीच्या गरात १ चमचा साखर घालावी आणि हे मिश्रण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेऊन द्यावे.
अर्ध्या तासाने हा फेसपॅक चेहऱ्यावर व मानेवर लाऊन घ्यावा.
दहा मिनिटांनी पाण्याने चेहरा साफ करावा.
या फेसपॅकचा नियमितपणे वापर केल्याने त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा तुकतुकीत दिसायला लागते
आणि उन्हामुळे पडलेले काळे डाग (टॅन) कमी होऊन त्वचा उजळायला सुद्धा मदत होते.
३. कलिंगडाचा फेसपॅक
कलिंगडामध्ये व्हिटामिन ‘ए’ आणि ‘सी’ जास्त प्रमाणात आढळतात.
निरोगी त्वचेसाठी ही दोन व्हिटामिन अत्यंत गरजेची आहेत.
कलिंगडामध्ये सुद्धा पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्वचेला ओलावा मिळतो.
कोरड्या त्वचेला या ओल्याव्याची, ज्याला हायड्रेशन सुद्धा म्हणता येईल, गरज असते.
म्हणूनच कोरड्या त्वचेसाठी कलिंगडाचा फेसपॅक फायदेशीर ठरतो.
कलिंगडामध्ये ऍन्टी ऑक्सिडन्ट सुद्धा जास्त प्रमाणात असतात.
यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारायला मदत होते, त्वचेवर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते.
कोरडी त्वचा असेल तर हे फार महत्वाचे असते.
हा फेसपॅक तयार करायला २ चमचे कलिंगडाचा रस, २ चमचे काकडीचा रस, एक चमचा मिल्क पावडर व एक चमचा घट्ट दही हे सगळे घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
याची पेस्ट तयार झाली पाहिजे. ही पेस्ट चेहऱ्यावर व मानेवर व्यवस्थित लाऊन १५ मिनिटांनी धुवून घ्यावी.
त्वचेत झालेले बदल तुम्हाला लगेच जाणवतील.
हा फेसपॅक नियमितपणे वापरल्यास त्वचा मऊ होण्यास मदत होते.
यातील काकडीच्या वापरामुळे त्वचा उजळण्यास सुद्धा याचा फायदा होतो.
४. मध आणि दुधाचा फेसपॅक
मध हे कोरड्या त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर असतो. पण मध आणि दुध जर एकत्र केले तर त्यासारखा कोरड्या त्वचेवर दुसरा रामबाण उपाय नाही.
हा फेसपॅक तयार करायला व वापरायला सुद्धा अतिशय सोपा आहे.
यासाठी मध आणि कच्चे दुध समप्रमाणात एकत्र करून घ्यावे व तो चेहऱ्याला लावताना त्याने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करून घ्यावा.
दहा मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवावा.
५. स्ट्रोबेरी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक
थंडीच्या दिवसात जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर हा एक प्रभावी उपाय आहे.
या दिवसात स्ट्रोबेरी सुद्धा उपलब्ध असतात.
स्ट्रोबेरीमध्ये व्हिटामिन ‘सी’ बरोबरच ओमेगा 3 – फॅटी ऍसीड सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात.
यामुळे कोरड्या त्वचेला मॉईश्चरायझिंग होते.
या फेसपॅकमध्ये गुलाब पाण्याचा सुद्धा वापर केला जातो.
यामुळे त्वचा टवटवीत व उजळ दिसते.
फेसपॅक बनवण्यासाठी साधारण दोन ते ३ स्ट्रोबेरी चुरून घ्याव्यात व त्यात १ चमचा गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी.
ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर २० मिनिटे लाऊन ठेवावी. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करावा.
६. दुध व बदामाचा फेसपॅक
दुधामध्ये अनेक व्हिटामिन व खनिजे आढळतात.
यामुळे कोरड्या त्वचेला मॉईश्चराईझ करायला दुध हा एक अत्यंत प्रभावी आणि खात्रीशीर उपाय आहे.
बदामामध्ये व्हिटामिन ‘ई’ जास्त प्रमाणात आढळतात.
हे व्हिटामिन त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कोरड्या त्वचेला सुरकुत्या जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता असते.
पण बदाम, म्हणजेच व्हिटामिन ई च्या नियमित वापराने त्याचा धोका कमी होतो.
फेसपॅक तयार करण्यासाठी ८ ते १० बदाम पाण्यात भिजत घालावेत.
बदाम व्यवस्थित भिजल्यावर त्यांची साले काढून मिक्सरमधून वाटून घ्यावेत.
बदामाच्या पेस्टमध्ये थोडे दुध घालून त्याचा लेप तयार करून घ्यावा.
हा लेप चेहऱ्यावर अर्धा तास लाऊन ठेवावा. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
या लेखात सांगितलेले फेसपॅक करायला आणि वापरायला सुद्धा सोपे आहेत.
यापैकी तुम्हाला सोयीस्कर वाटेल तो फेसपॅक घरच्याघरी तयार करून तुम्ही त्याचा नियमितपणे वापर करून तुमच्या त्वचेत होणाऱ्या बदलाला अनुभवू शकता.
हे फेसपॅक तयार करायला घरीच नेहमी असणारे घटक लागतात हा या फेसपॅकचा एक फायदा, त्याचप्रमाणे यात कोणत्याही केमिकल्सचा वापर नसल्याने या फेसपॅकचे तुमच्या त्वचेवर काही विपरीत परिणाम सुद्धा होणार नाहीत हा दुसरा फायदा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.