लेखाचे शीर्षक वाचून आश्चर्यचकित झालात ना? सर्वसाधारणपणे स्तनाचा कर्करोग म्हटले की आपण हा स्त्रियांना होणारा आजार आहे असे गृहीत धरतो.
परंतु अगदी कमी प्रमाणात का होईना पण पुरुषांना देखील हा आजार होतो. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाची उदाहरणे दुर्मिळ आहेत.
तसेच पुरुषांमध्ये होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाबाबत आणखी एक दुर्दैवाची बाब म्हणजे ह्या रोगाचे निदान होण्यास बराच उशीर होतो. अगदी शेवटच्या स्टेजमध्ये बरेचदा याचे निदान होते.
परंतु आपण जर या रोगाची नक्की लक्षणे जाणून घेतली तर त्याचे निदान लवकर होऊन रोग बरा होण्याचे प्रमाण वाढू शकेल.
पुरुषांमध्ये होणारा स्तनाचा कर्करोग इतका दुर्मिळ आहे की जगभरामध्ये आढळणाऱ्या कॅन्सर रुग्णांपैकी १ % पेक्षाही कमी रुग्ण या रोगाने ग्रस्त असतात..
तसेच पुरुषांमध्ये होणारा ब्रेस्ट कॅन्सर हा दर ८३३ लोकांपैकी केवळ एका व्यक्तीसाठी जीवघेणा असू शकतो. याचाच अर्थ हा रोग सहजपणे बरा होऊ शकतो परंतु त्यासाठी त्याचे निदान लवकर होऊन त्यावर योग्य औषधोपचार लवकरात लवकर सुरु होणे आवश्यक असते.
पुरुषांमध्ये होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान लवकर न होण्यामागचे महत्त्वाचे कारण असते या आजाराबद्दल काहीही माहिती नसणे.
ब्रेस्ट कॅन्सर म्हंटला की तो महिलांनाच होऊ शकेल असे वाटून त्यासंबंधीच्या लक्षणांकडे पुरुष वर्गाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पुरुषांकडून आपल्याला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष होऊन तज्ञ डॉक्टरांची मदत घेणे टाळले जाते. रोगाचे प्रमाण वाढल्यावर मात्र औषधोपचार करणे अशक्य होऊन बसते.
याच बरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांमध्ये स्तन आकाराने छोटे असल्यामुळे तेथील पेशींची संख्या कमी असते. आकार लहान असल्यामुळे तेथे झालेल्या गाठी लवकर लक्षात येऊ शकतात हे जरी खरे असले तरी कॅन्सर या भरभर वाढ होणाऱ्या आजाराची तेथे जागा कमी असल्यामुळे शरीरात इतरत्र लवकर वाढ होऊ शकते. पुरुषांमध्ये स्तनांच्या जवळपास असणाऱ्या इतर पेशींमध्ये हा आजार महिलांपेक्षा लवकर पसरू शकतो.
या आणि अशा इतरही कारणामुळे पुरुषांमध्ये होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगापैकी ४० % रुग्णांचे निदान कॅन्सरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये होते. तोपर्यंत आजार बऱ्याच प्रमाणात पसरलेला असतो. त्यामुळे स्तनाचा कर्करोग बरे होण्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कमी आहे.
पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
पुरुषांच्या बाबतीत स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे माहित असणे हे आजाराचे लवकर निदान होण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे हे तर आपण पाहिलेच. म्हणूनच ह्या आजाराची नक्की कोण कोणती लक्षणे असू शकतात हे आपण आज जाणून घेऊया
१. कोणत्याही एका स्तनामध्ये गाठ असणे. सहसा ही गाठ दुखत नाही.
२. स्तनाग्रे आक्रसणे, तेथे काही जखम दिसणे अथवा त्यातून काही द्राव पाझरणे.
३. स्तनांवर सुरकुत्या पडणे अथवा बारीक खळगा पडणे.
४. स्तनाचा अथवा स्तनाग्रांचा रंग बदलणे. तेथील त्वचा कोरडी पडून खपली निघून येणे.
ही आहेत पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग झालेला असण्याची काही प्रमुख लक्षणे. जर स्तनाचा कर्करोग शरीराच्या इतरही भागात पसरू लागला तर खालील लक्षणे दिसून येतात.
१. काखेतील आणि काखेजवळच्या भागातील लिंफ नोड्सना सूज येणे.
२. स्तनांमध्ये वेदना होणे.
३. हाडे दुखणे
४. शरीरात इतरत्र एखादी गाठ आढळून येणे.
जर वरीलपैकी कोणतीही लक्षणे असतील तर त्या व्यक्तीने ताबडतोब तज्ञ डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. कॅन्सरचे निदान करण्यासाठी प्राथमिक चौकशी आणि फॅमिली हिस्ट्री जाणून घेण्याबरोबर डॉक्टर खालील तपासण्या करतात.
१. मॅमोग्राफी
२. अल्ट्रासाउंड तपासणी
३. स्तनाग्रातून पाझरणाऱ्या द्रवाची तपासणी
४. बायोप्सी
स्तनामध्ये झालेली गाठ ही कॅन्सरची आहे असे निदान झाल्यास शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकण्यात येते. काही वेळा हा आजार पसरू नये म्हणून अशा गाठीच्या आजूबाजूच्या काही निरोगी पेशी देखील काढून टाकण्यात येतात. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅन्सर वरील आणखी आवश्यक असेल ती सर्व ट्रीटमेंट रुग्णाने घेणे आवश्यक असते. ह्यामध्ये किमोथेरपी, रेडीएशन, शस्त्रक्रिया, हिलींग इत्यादींचा समावेश होतो.
पुरुषांमध्ये होणाऱ्या या दुर्मिळ आजाराचे निदान जर लवकर झाले तर रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता जवळ जवळ ९७ % असते. परंतु दुर्दैवाने जर हा आजार लवकर लक्षात आला नाही आणि शरीरात इतरत्र पसरला तर मात्र तो रुग्णासाठी जीवघेणा ठरू शकतो.
त्यामुळे या लेखात दिलेल्या लक्षणांच्या आधारे महिलांबरोबरच पुरुषांनी देखील स्वतपासणी करत रहाणे आवश्यक आहे.
तर मित्रांनो, तुम्ही अशी स्वतपासणी नियमित करत रहा आणि कोणतीही शंका आल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच ही माहिती आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी पर्यंत पोचण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
Types Of Cancer : महिलांमध्ये आढळणारे कॅन्सरचे ५ प्रकार
क्या पुरुषों को भी होता है ब्रेस्ट कैंसर? जानें कारण, लक्षण और बचाव के उपाय
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Sir maze donhi stan dukhat hote. Kalantarane dave side che bare zale.. pan ujvya bajuche ajun sujel ahe ani hath lavla ki dukhte. (kami pramanat)