मित्रांनो आपण पाणी पिण्याला नेहमीच साधारण समजतो आपल्याला वाटतं, आपण जेव्हा पाहिजे, जसं पाहिजे जेवढे पाहिजे तेवढे पाणी पिऊ शकतो. पण पाणी पिण्याला इतकं हलक्यातघेऊ नका बरंका!!
पाणी पिण्यात सुद्धा अगदीच रॉकेट सायन्स नसलं तरी त्याचे पण काही नियम पाळले पाहिजेत. पाणी म्हणजे आपण रोज खातो त्या अन्नाला पूरक घटक आहे असं जरी आपल्याला वाटत असलं तरी पाणी शरीराच्या सर्व अवयवांची कामं नीट चालण्यासाठी तसेच शरीरात तयार होणाऱ्या विषारी पदार्थांना बाहेर काढण्यासाठी तितकेच महत्त्वाचे असते.
वजन वाढवण्या पासून वजन कमी करण्यापर्यंत पाणी योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्य वेळी पिणे खूप महत्त्वाचे आहे.
पाणी कशा पद्धतीने प्यायल्यावर काय फायदे होतात आणि काय नुकसान होते याची माहिती आपल्याला नसेल तर आपण कितीही चांगलं, पौष्टिक आणि अन्न खाल्लं तरी त्याचा हवा तितका फायदा शरीराला मिळत नाही.
आणि त्यामुळे पुढे जाऊन अपचन, बद्धकोष्ठ, गॅस, लिव्हरच्या तक्रारी, सुस्ती येणं, मुतखडा, केस गळणं तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं यासारख्या कित्येक तक्रारी उद्भवतात.
तब्बेतीच्या तक्रारीच नाही तर त्वचा रूक्ष होणे, त्वचेवर वांग वाढणे, व्हाइट हेड्स, ब्लॅक हेड्स एकूणच काय तर सौंदर्यात बाधा ही सुद्धा पाण्याच्या असंतुलित प्रमाणाने आणि चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या पद्धतीने केलेल्या सेवनाने होते.
म्हणून या लेखात पाणी पिण्याचे योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे.
एका दिवसात जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती पाणी प्यायले पाहिजे? पाणी पिणे इतके गरजेचे का आहे? शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं हे कसं ओळखावं?
एका वेळेस किती पाणी प्यायले पाहिजे आणि कशा पद्धतीने प्यायले पाहिजे? पाणी पिण्याची योग्य वेळ काय? पिण्याचं पाणी कसं असलं पाहिजे, म्हणजे गरम पाणी प्यायले पाहिजे की थंड प्यायले पाहिजे की नॉर्मल प्यायले पाहिजे?
वजन वाढवणं आणि वजन कमी करणं याचा आणि पाण्याच्या सेवनाचा काय संबंध? या सर्व गोष्टी आजच्या या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे.
आता बघूया आपल्या शरीरातले पाण्याचे महत्व
आपल्या शरीरात ६० ते ७० टक्के पाणी असतं. आपण प्यायलेल्या पाण्याचा उपयोग किडनी, लिव्हर, पाचनतंत्र एकूणच शरीरातल्या सर्व अवयवांचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरातल्या कोशिकांना ताजे तवाने ठेवण्यासाठी होतो. पाणी शरीरातल्या विषारी द्रव्यांना बाहेर काढून त्वचेला आणि शरिराला योग्य प्रमाणात हायड्रेशन देते.
शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाले की युरीनचा रंग पिवळा दिसायला लागतो, पचनशक्ती कमी होते, चेहेऱ्याची त्वचा रुक्ष दिसू लागते.
पाण्यामध्ये शुन्य कॅलरीज असल्या तरी माणूस काही दिवस अन्न न खाता जगू शकतो पण पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. कारण मल, मूत्र, अंगाला येणारा घाम एवढंच नाही तर श्वास घेण्याच्या प्रक्रियेत सुद्धा जवळ जवळ २ लिटर पाणी आपल्या शरीरातून रोज बाहेर निघून जाते. या पाण्याची कमतरता भरून काढणे खूप गरजेचे असते.
खरं तर एखाद्या व्यक्तीच्या शरीरातला किती पाण्याची आवश्यकता आहे हे त्याचे वजन, फिझिकल ऍक्टिव्हिटीज, आरोग्य, माणूस जिथे राहतो तिथले वातावरण यांवर अवलंबून असते.
पण एका सामान्य व्यक्तीला दिवसभरात २.५ ते ३ लिटर पाण्याची गरज असते. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त घाम येतो म्हणून हे प्रमाण वाढवलं पाहिजे आणि जे लोक व्यायाम करतात त्यांना सुद्धा सामान्य प्रमाणापेक्षा पेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज असते.
आता प्रश्न असा आहे की गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने काही नुकसान होऊ शकते का?
कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा, प्रमाणापेक्षा जास्त झाली तर नुकसानकारक होतेच. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनीचे काम वाढते. पण हे सहसा होत नाही कारण अति पाण्याचे प्रमाण हे ४ ते ५ लिटरचे असते आणि शक्यतो इतके पाणी कोणी पीत नाही.
एका वेळी पाणी किती आणि कसे प्यायले पाहिजे?
पाणी पिण्यात काय आले सायन्स असा साधारण समज असतो. एकाच प्रकारच्या पाण्याला वेगवेगळ्या प्रकारे प्यायले की त्याचे परिणाम वेगवेगळे असतात.
चुकीची पद्धत Image Source : https://www.pinepollensuperfoods.com
पाणी नेहमी बसून आणि हळूहळू प्यायले पाहिजे. म्हणजे पाणी तोंडात धरून ४-५ सेकंद ते तोंडात फिरवून मग गिळावे. याने तोंडातली लाळ पोटात जाऊन पोटातल्या असिडीक प्रॉपर्टीजना शांत केले जाते. याने पाचनशक्ती सुधारायला मदत होते. तर उभे राहून घाईघाईने पाणी प्यायल्याने आपली किडनी त्या पाण्याला नीट फिल्टर करू शकत नाही.
एका वेळी एक ते दीड ग्लास पाणी पिणे हे प्रमाण योग्य आहे. यापेक्षा जास्त पाणी पिले तर किडनी त्याला नीट फिल्टर करू शकत नाही. आणि प्यायलेले पाणी मूत्रावाटे तसेच निघून जाते. याने कालांतराने वारंवार मूत्रवीसर्जनाला जाण्याची तक्रार उद्भवू शकते
पिण्याच्या पाण्याचे तापमान काय असावे?
आपण कुठलीही थंड वस्तू खातो किंवा पितो तेव्हा आपल्या शरीरात ते आधी योग्य तितके गरम केले जाते. आपण कुठलाही पदार्थ किंवा पाणी हे जेव्हा थंड घेतो तेव्हा आपले शरीर ते गरम करून घेते. आणि या प्रोसेस मध्ये लागणारी ऊर्जा शरीराला वापरावी लागते.
याशिवाय थंड पाण्याने, खाल्लेले अन्नकण कठीण होतात आणि त्यामुळे गॅस, ऍसिडिटी होऊन पचनक्रिया बिघडते. म्हणून पाणी नेहमी नॉर्मल किंवा कोमट प्यायले पाहिजे.
पाणी केव्हा प्यायले पाहिजे आणि केव्हा न प्यायलेले चांगले?
जेवताना जास्त पाणी न पिता फक्त एक-दोन घोट पाणी घ्यावे. आणि जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. याने खाल्लेले अन्न प्रमाणाबाहेर पात्तळ होऊन पाचक रसांची निर्मिती योग्य होत नाही यामुळे पचनक्रिया हळूहळू होते. म्हणून जेवण झाल्यानंतर पाऊण ते एक तासांनंतर पाणी प्यायले पाहिजे.
या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तरी आरोग्याच्या बऱ्याचश्या तक्रारी कमी होऊ शकतात. त्वचा सुंदर होऊन चिरतरुण दिसणं हे सुद्धा पाण्याच्या सेवनावर अवलंबून आहे. तर आजपासूनच पाणी पिण्याचं हे तंत्र आपल्या सवयीचाच भाग बनवून घ्या. आणि मग फरक बघा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Good