शिकेकाई.. भारतीय घरांमध्ये शिकेकाई म्हणजे काय हे माहीत असतेच.
आई-आजीवर जोवर मुलींच्या केसांची निगा राखण्याची जबाबदारी असते तोवर ही शिकेकाई वापरली जातेच.
काही जण नंतर सुद्धा शिकेकाई वापरतात पण काहींना मात्र वेळेच्या कमतरतेमुळे शाम्पू वापरणे सोयीस्कर वाटू लागते.
वेगवेगळ्या माध्यमातून शाम्पू, कण्डिशनर, हेयर जेल अशा बऱ्याच जाहिराती बघायला मिळतात जे वापरून केस लांबसडक आणि मऊ होतील अशी खात्री दिली जाते.
काही शाम्पूमध्ये तर शिकेकाई, आवळा, रिठा हे प्रमुख घटक म्हणून वापरल्याच्या सुद्धा जाहिराती असतात आणि तसे ते वापरले जात देखील असतील पण अशा उत्पादनात या बरोबरच बरीच केमीकल्स सुद्धा वापरली जातात.
काही वेळा अपरिहार्य कारणांमुळे जसे की अति घाईच्या वेळी किंवा प्रवासात तुम्हाला ही उत्पादने वापरावी लागतातच, पण जेव्हा शक्य असेल तेव्हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी जास्तीतजास्त अशा नैसर्गिक गोष्टींचा विचार केला पाहिजे.
या गोष्टी मिळवणे, त्या वापरणे हे किंचित त्रासदायक आणि वेळ खाऊ असू शकते पण त्याचा केसांवर होणारा परिणाम बघता, त्यासाठी लागणारा वेळ कमीच म्हणावा लागेल.
शाम्पूला पर्याय म्हणून शिकेकाईचा वापर केल्याने केसांचे आरोग्य नक्कीच सुधारेल.
शिकेकाई ही पूर्वापार केस धुण्यासाठी वापरली जाते. शिकेकाईमुळे केसांवरची धूळ जाऊन ते स्वच्छ तर होतातच पण त्याचबरोबर ते सोफ्ट आणि सिल्की सुद्धा होतात.
शिकेकाई या साधारण चिंचेसारखे दिसणाऱ्या फळात असे काय घटक आहेत ज्यामुळे ते केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते हे आज या लेखात आपण बघणार आहोत.
शिकेकाईमध्ये व्हिटामिन भरपूर प्रमाणात आढळतात. यामुळे केसांच्या वाढीला गती मिळते.
शिकेकाईमध्ये आढळणाऱ्या सॅपोनीनमुळे ती पाण्यात कालवल्यावर साबणाला येतो तसा फेस येतो ज्यामुळे केस स्वच्छ होतात.
शिकेकाईमध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे केस खराब होत नाहीत, त्यांची चकाकी टिकून राहते.
शिकेकाईचे केसांसाठी अनेक फायदे आहेत. तुम्हाला जर केसांच्या तक्रारी असतील तर शिकेकाई चा वापर का केला पाहिजे आणि तो कसा करायचा हे जाणून घ्यायला खालील मुद्दे वाचा.
शिकेकाईचे फायदे
१. केसांना नैसर्गिक चकाकी देते
बऱ्याचदा बाहेर फिरल्यामुळे, केसांवर धुळीचे आणि प्रदुषणाचे कण चिकटून बसतात.
यामुळे केस डल दिसायला लागतात. काही वेळा केस खूप वेळ ड्रायरने सुकवले किंवा ते कुरळे किंवा सरळ करण्यासाठी हॉट आयर्न चा वापर केल्यास ते एकदम रुक्ष दिसायला लागतात.
अशा केसांना चकाकी देण्याचे काम शिकेकाई करते. शिकेकाईमुळे केस स्वच्छ होतात.
केसात अडकलेले धुळीचे कण निघून जातात ज्यामुळे केसांना एक नैसर्गिक चमक येते.
याचबरोबर शिकेकाईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या व्हिटामिन, अँटिऑक्सिडंट्स आणि सॅपोनीन मुळे रुक्ष केस मऊ व्हायला मदत होते.
२. आरोग्यपूर्ण केस
शाम्पूच्या वापराने, तसेच वर म्हटल्याप्रमाणे केसांवर हॉट आयर्नचा जास्त वापर करणे, हेयरस्टाईल करताना स्प्रे मारणे यामुळे केस एकदम डल आणि रुक्ष दिसायला लागतात.
या कारणांमुळे तुमचे केस सुद्धा रुक्ष दिसत असतील तर त्यावर शिकेकाई हा एक प्रभावी उपाय आहे.
शिकेकाईमुळे केसांना व्हिटामिन आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात मिळतात ज्यामुळे त्यांच्या रुक्षपणा जाऊन ते मऊ होतात आणि आरोग्यपूर्ण दिसू लागतात.
अशा रुक्ष केसांची जर वाढ थांबली असेल तर शिकेकाईच्या वापराने केस वाढायचे प्रमाण सुद्धा वाढते.
३. केस स्वच्छ करते
शिकेकाईमधील सॅपोनीनमुळे पाण्यात कालवल्यावर साबणाचा होतो तसा फेस होतो.
यामुळे केसांवर अडकलेले धुळीचे, प्रदुषणाचे कण निघून जातात आणि केस स्वच्छ होतात.
शिकेकाई वापरून केस स्वच्छ करण्याचा अजून एक फायदा म्हणजे शिकेकाईमुळे केसांवरचे फक्त धुळीचे कण निघून जातात.
केसांना जो नैसर्गिक ओलावा किंवा तेलकटपणा असतो तो तसाच राहतो.
या नैसर्गिक ओलाव्यामुळे केस स्वच्छ झाले तरी मऊसूद राहतात.
शिकेकाईमुळे केसांना घामामुळे येणारा वास सुद्धा नाहीसा होतो.
४. कोंड्यावर हमखास उपाय
प्रदूषण, कोरडी त्वचा यामुळे कोंड्याचा त्रास होतो.
कोंडा घालवण्यासाठी वेगवेगळे शाम्पू, क्रीम इत्यादी बाजारात उपलब्ध असतात.
या उत्पादनांचा तेवढ्यापुरता उपयोग होऊन केसातील कोंडा नाहीसा होतो पण पूर्णपणे जात नाही.
ते उत्पादन वापरायचे बंद केले की परत कोंडा व्हायला सुरुवात होते.
कोंडा म्हणजे डोक्याच्या त्वचेला होणारे एकप्रकारचे फंगल इन्फेक्शन.
शिकेकाईमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे फंगसची वाढ थांबते.
त्यामुळे जर कोंड्याचा त्रास असेल तर त्यावर शिकेकाई हा एक उत्तम, सोपा घरगुती उपाय आहे.
५. डोक्याची खाज कमी करते
शिकेकाईमुळे केस स्वच्छ होताना, स्कॅल्प कोरडा पडत नाही.
डोक्याला खाज येते ती कोंड्यामुळे किंवा स्कॅल्प कोरडा पडल्यामुळे.
शिकेकाईमध्ये असणारे अँटी बॅक्टेरीयल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे स्कॅल्पला कोणत्याही इन्फेक्शनचा धोका राहत नाही.
काही इन्फेक्शन असले तर ते सुद्धा शिकेकाईच्या नियमित वापराने कमी होते. म्हणून शिकेकाई केस आणि डोके धुण्यासाठी चांगली असते.
६. केसांची वाढ चांगली होते
शिकेकाईमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.
अँटिऑक्सिडंट्स हे फ्री रॅडीकल्स पासून आपल्या केसांच्या मुळांचे संरक्षण करतात.
यामुळे केसांचे आणि स्कॅल्पचे आरोग्य सुधारून केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
याच अँटिऑक्सिडंट्समुळे केसगळती थांबवण्यासाठी सुद्धा शिकेकाई हा एक उत्तम उपाय आहे.
७. अकाली केस पांढरे होत नाहीत
हल्ली बरेच जण अकाली केस पांढरे होण्याची तक्रार करत असतात.
शिकेकाईमध्ये जास्त प्रमाणात असणाऱ्या पोषणद्रव्यांमुळे केसांना हवे असलेले पोषण मिळते.
यामुळे स्कॅल्पला होणारा रक्तपुरवठा सुधारतो आणि अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
८. केसांचा रुक्षपणा कमी करते
प्रदूषण, वेगवेगळी केश प्रसाधने तसेच हेयर ड्रायरच्या जास्त वापराने केस कोरडे आणि रुक्ष दिसायला लागतात.
शिकेकाईमध्ये व्हिटामिन आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात ज्यामुळे अशा रुक्ष केसांना हवे असलेले पोषण मिळून त्यांची गेलेली रया परत येते.
शिकेकाईच्या नियमित वापराने केस आरोग्यपूर्ण दिसायला लागतात. अशा सॉफ्ट आणि सिल्की केसांमध्ये गुंता सुद्धा होत नाही त्यामुळे शिकेकाई वापरल्यानंतर कंडीशनर वापरायची गरज नसते.
९. स्प्लिट एन्ड्स होत नाहीत
केस कलर करताना किंवा ट्रीटमेंट घेऊन सरळ किंवा कुरळे करताना त्यावर वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात.
यामुळे केस कमकुवत होत जातात आणि हळूहळू केसांच्या खालच्या टोकाला अजून एक टोक येते.
याला स्प्लिट एंड असे म्हणतात. हे स्प्लिट एन्ड्स एकदा आले की केसांचा खालचा भाग कापण्याशिवाय काही पर्यायच उरत नाही.
अशामुळे केसांची वाढ थांबते.
पण शिकेकाईच्या नियमित वापराने केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळते ज्यामुळे केसांचे एकूण आरोग्य सुधारते आणि स्प्लिट एन्ड्स येत नाहीत.
१०. उवा लिखांना मारते
उवांचा त्रास विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलींना जास्त होतो.
एकमेकींच्या केसातून या उवा पसरतात आणि एकदा त्या डोक्यात आल्या की त्यांची संख्या झपाट्याने वाढते.
अशावेळी त्यांच्या केसांवर इतर कुठली उत्पादने वापरायला काही वेळा नको वाटते कारण त्याचे काहीतरी विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
शिकेकाईच्या नियमित वापराने या उवांची वाढ थांबते आणि तिचे काही विपरीत परिणाम सुद्धा होत नाहीत.
त्यामुळे उवांचा त्रास असेल तर शिकेकाई हा एक सुरक्षित उपाय आहे.
शिकेकाईचे हे इतके फायदे आपण वाचले पण त्याचा वापर कसा करायचा?
बाजारात शिकेकाई पावडर मिळते ती विकत आणून पाण्यात कालवून शाम्पू ऐवजी वापरू शकतो.
शिकेकाईची पावडर ही चांगल्या आयुर्वेदिक दुकानातून आणावी म्हणजे त्यातभेसळीची शक्यता नसेल.
शिकेकाईचा वापर करून हेयर पॅक, शाम्पू कसा तयार करायचा, कोरड्या आणि तेलकट केसांना शिकेकाईचा कसा वापर करायचा याबद्दल अधिक माहिती देणारा लेख तुम्हाला लवकरच वाचायला मिळेल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.