कधीकधी भीतीची भावना चांगली असते कारण ती बऱ्याच चुकांना रोखते.
लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….
तसंच तुमच्यासाठी ही काही गोष्टींना घाबरणं गरजेचं आहे.
म्हणजे बघा एखाद्या मैदानी खेळात उतरताना लागण्याची खरचटण्याची, पडण्याची भीती दूर करूनच खेळलं पाहिजे.
पण खेळ म्हणजे निव्वळ स्पर्धा नाही, शारीरिक क्षमता वाढवण्याचा तो एक उत्तम पर्याय आहे आणि जिंकण्यासाठी शारीरिक फिटनेस महत्त्वाचा आहे हेही लक्षात घ्यायला हवं, म्हणजे हरण्याची भीती दूर करून आपली क्षमता वाढवण्याकडे लक्ष केंद्रित करायला सोपं जातं.
खेळाच्या बाबतीत सुरुवातीला सांगितलेली एक भीती ही समस्या सुद्धा होऊ शकते.
खेळताना पडण्याची हाड मोडण्याची भीती तुम्हाला खेळाच्या आनंदापासून वंचित ठेवू शकते काही शिकण्यापासून दूर ठेवू शकते.
या भीतीवर काही उपाय केले तर ही भीती हळूहळू कमी होऊ शकते.
भीतीमुळे अपयश येणं टाळण्यासाठी तुमची भीती योग्य जागी आहे याची खात्री करून घ्या.
कुठल्याही कामाला सुरुवात करताना तुम्हाला जर असं वाटत असेल की “तुमच्या हातून काही चूक तर होणार नाही ना? तुमचं बक्षीस हुकणार तर नाही ना?” तर विचार करा तुम्ही खरंच त्या कामात कधी यशस्वी व्हाल का ?
तुमचा प्रवास जर अशा दिशेने होत असेल तर नेमकं वास्तव तपासायची वेळ झालेली आहे.
यशस्वी होण्याची तुमची जी क्षमता आहे तिला तुम्ही स्वतःच सुरुंग लावत आहात.
भीती वर विश्वास ठेवायला तुम्हांला शिकावं लागेल.
शिवाय तुम्ही काय आहात हेही समजून घ्यावं लागेल.
नवं सॉफ्टवेअर शिकताना काही चुकेल का? काहीतरी गडबड होईल का? ही भीती करिअरमध्ये पुढे जाण्यापासून रोखू शकते.
चुकण्याची भीती असली तरी शिकण्याची आस कधीच सोडता कामा नये!!!
तुम्ही कोणते निर्णय घेतले आहेत हे वेळोवेळी तपासून घ्यायला पाहिजे, तुमचं वागणं भीतीच्या छायेखाली तर नाही ना? याची वारंवार खात्री करून घ्यायला पाहिजे.
भीतीच्या छायेखाली दबून जाऊन वावरणं एकदम चुकीचं आहे.
भीतीला बाजूला काढून तुम्ही तुमच्या निर्णयाप्रमाणे वागलं पाहिजे.
धैर्यानं घेतलेले तुमचे योग्य निर्णयच तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाणार असतात.
ट्रॅफिकच्या भीतीनं जर तुम्ही गाडीच शिकला नसता तर रोजचा तुमचा प्रवास खर्च प्रचंड झाला असता, आणि हे लक्षात घेऊनच तुम्ही गाडी शिकून आत्मविश्वासाने रोज प्रवासही करत असता.
भीतीला कुठपर्यंत किंमत द्यायची हे तुम्ही योग्य वेळेला योग्य पद्धतीने ठरवलं पाहिजे.
तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण असल्याची खात्री करून घ्या.
तुमच्या सानिध्यात सक्षम माणसं आहेत की नाही हे वारंवार तपासा.
कारण एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही लायक नाही किंवा तुम्हाला एखादी गोष्ट जमणार नाही ही भीती तुमच्या मनात कधीतरी दबा धरून बसलेली असते.
ही भीती तुमच्या मनाला व्यापून टाकण्याआधी तुम्हाला त्या भीतीचा सामना करावा लागतो.
आणि त्यासाठी तुम्हाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींची गरज असते.
तुमचा आत्मविश्वास वाढवतील अशा लोकांसोबत, जर तुम्ही रहात असाल तर तुमच्या मनातल्या भीतीशी तुम्ही मस्त लढाई करू शकता.
तुमच्या मध्ये भीतीशी दोन हात करण्याची ताकत असेल तरच चांगल्या व्यक्ती तुमच्या मित्र परिवारामध्ये आनंदाने सामील होतात.
पण तरीही भीतीचे सगळेच प्रकार वाईट नाहीत ना हो?
काही वेळेला ही भीती तुम्हाला योग्य दिशा देऊ शकते.
म्हणजे बघा की प्रचंड वेगाची भीती तुम्हाला अपघातापासून वाचवू शकते.
तुम्हाला वाटणारी भीती योग्य की अयोग्य आहे तुमचं तुम्हाला शोधता आलं पाहिजे, आणि यासाठी दोन्ही बाजूचा विचार करण्याची तुमची क्षमता असली पाहिजे.
मनामध्ये भीतीची एन्ट्री झाली आणि ही भीती तुम्हाला चांगल्या गोष्टींपासून रोखत असेल तर त्या भीतीला बाजूला काढण्याचा उपाय तुम्ही वेळीच शोधला पाहिजे.
जिथं अडथळा येतो तिथं पर्यायी मार्ग शोधला पाहिजे.
भीतीपायी तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे तर पडत नाहीये ना याची सुद्धा वेळोवेळी खात्री करून घ्यायला हवी.
इंग्रजीवर प्रभुत्व नाही म्हणून तुम्ही स्पर्धेमध्ये मागे पडाल अशी भीती जर तुम्हाला वाटत असेल तर इंग्लिश सुधारण्यासाठी क्लासचा पर्याय तुम्ही निवडू शकता, आणि तुमच्या भीतीवर तुम्ही मात करू शकता.
भीती वाईट कधी ठरेल जेव्हा ती तुम्हाला यशाच्या मार्गातून मागे खेचण्याचा प्रयत्न करेल.
पण जी भीती तुम्हाला नव्या क्षेत्रात नव्या दिशेला पाऊल टाकायला उद्युक्त करते ती मात्र उपयोगी ठरते.
आपण आऊटडेटेड होऊ या भीतीने जर तुम्ही नवनवीन स्किल शिकत गेलात तर तुमची प्रगती होणारच ना?
भीतीमुळे तुमची प्रगती होते आहे का आयुष्यात अडचणी वाढत आहेत ते नीट बघा.
अडचणी वाढवणारी भीती मनातून काढून टाकायचा प्रयत्न करा आणि आयुष्यामध्ये पुढं नेणारी भीती जपण्याचा प्रयत्न करा….
तुमच्या मनात कोणत्या गोष्टींची भीती आहे? त्या भीतीचा तुम्हांला फायदा होतो की तोटा हे आम्हांला कमेंटमध्ये नक्की सांगा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.