बऱ्याचदा आजारपणात किंवा आजारपणातून उठल्यावर सुद्धा काही दिवस तोंडाची चव जाते.
आजारपण किंवा दुसऱ्या एखाद्या कारणाने तोंडाची चव गेली तर काय उपाय करावेत यासाठी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तोंडाची चव गेली असेल तर खायची इच्छा उरत नाही. भूक लागत नाही.
पण आजार लवकर बरा व्हावा, शरीराच्या सगळ्या हालचाली पूर्ववत व्हायला हव्या यासाठी खाणे महत्त्वाचे आहे.
आजारपणात आलेला अशक्तपणा भरून काढायचा असल्यास, आजारपणातून उठल्यावर चौरस आहार घ्यायला हवा.
त्यासाठी भूक वाढावी या करता प्रयत्न केले पाहिजेत.
इतर अनेक कारणांमुळे सुद्धा भुकेवर परिणाम होऊन भूक लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
कधीकधी काही मानसिक व्याधी सुद्धा यासाठी कारणीभूत असतात.
अनेकदा टेन्शन, स्ट्रेस या कारणांचा सुद्धा भुकेवर परिणाम होतो.
पण जास्त जेवण जात नसेल, किंवा भूकच लागत नसेल तर मात्र ती काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.
जर बरेच दिवस तुमची भूक कमी होऊन तुम्हाला व्यवस्थित जेवण जात नसेल तर तुमचे वजन कमी होण्याची शक्यता असते.
अशा तऱ्हेने वजन कमी होणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते.
याचबरोबर तुमच्या शरीराला अनेक महत्वाच्या पोषक तत्वांची कमतरता भासण्याची शक्यता असते.
यामुळे अशक्तपणा येऊन अजून आजार होण्याची शक्यता असते.
ज्यांचे वजन मुळातच कमी असते, त्यांना तर याचा जास्तच त्रास होऊ शकतो.
अशा व्यक्तींनी तर ही गोष्ट अधिकच गंभीरपणे घेण्याची गरज आहे.
म्हणूनच जर भूक लागत नसेल तर त्यावर काहीतरी उपाय केले पाहिजेत.
या लेखात भूक वाढावी, भूक लागत नसेल तर त्यासाठी काय करावे यासाठी काही सोपे घरगुती उपाय दिले आहेत.
तुम्हाला जर भूक लागत नसेल, जेवण जाण्याचे प्रमाण कमी झाले असेल तर, हे उपाय तुम्ही करून बघू शकता. यामुळे तुम्हाला व्यवस्थित भूक लागायला मदत होईल.
१. दिवसभर थोडे थोडे खात राहा
तुम्हाला आधीच भूक लागत नसेल आणि तुम्हाला जर एकावेळेस दोन पोळ्या, भाजी, वाटीभर भात आणि आमटी कोणी खायला दिली तर साहजिकच ते जाणार नाही.
पण दिवसभरातून तुम्हाला तितके खायला ही हवेच ते सुद्धा तितकेच खरे आहे.
यावर सोपा उपाय म्हणजे जर भूक लागत नसेल, जेवण जात नसेल तर तुम्हाला जमेल तितके, जमेल तेवढे दिवसभर थोडे थोडे करून खावे.
भूक लागलेली नसताना समोर जेवणाचे ताट आले तर ते संपवायचे टेन्शन येऊ शकते किंवा कदाचित त्याकडे बघून अजूनच भूक मरू शकते.
म्हणून तुमची दोन जेवणे ही थोडी थोडी विभागून तुम्ही चार किंवा पाच वेळा सुद्धा दिवसातून खाऊ शकता.
मग हळूहळू जशी तुम्हाला भूक लागायला सुरुवात होईल तसतशी तुम्ही जेवणाच्या वेळा कमी करून एका वेळी जेवायचे प्रमाण वाढवू शकता.
२. चौरस आहार घ्या
जर तुम्हाला भूक लागण्याचे प्रमाण मी झाले असेल तर बऱ्याचदा असे होण्याची शक्यता असते की तुम्ही काहीतरी थोडे खाऊन घेता.
खूप भूक लागली नाही म्हणू जेवण करायचे टाळून कधी चिवडा खाल्ला, कधी भेळ खाल्ली, कधी बिस्किटे खाल्ली असे केले जाण्याची शक्यता जास्त असते.
पण यामुळे होते काय? शरीराला गरजेच्या असणाऱ्या कॅलरी तर मिळतात पण पोषण अजिबात मिळत नाही.
नुसत्या कॅलरीजमुळे वाढलेले वजन हे कधीच आरोग्यपूर्ण नसते.
त्यामुळे भूक लागली नसेल तरी शक्यतो वेळ मारून नेण्यासाठी अशा अरबट चरबट खाण्यापासून लांब राहिलेलेच चांगले असते.
कितीही कमी भूक लागली असेल तरीही त्यासाठी योग्य, चौरस आहारच घेतला पाहिजे असे केल्याने शरीराला योग्य खाण्याची सवय होते.
यामुळे हळूहळू भूक वाढायला मदत होते.
३. जेवताना तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा
तुम्हाला जर भूक लागत नसेल, जेवण जात नसेल तर जेवणाच्या वेळी शक्यतो चार-चौघात मिसळल्याचा फायदा होतो.
भूक लागत नसताना कधीकधी एकट्याने जेवण तयार करण्याचा आणि जेवणाचा जास्तच कंटाळा येऊन भूक लागण्याचे प्रमाण अजून कमी होऊ शकते.
अशावेळेला तुम्ही जर तुमच्या मित्रमैत्रिणींना जमवले, त्यांच्याबरोबर जेवण केले तर त्यांच्या सोबतीने तुम्हाला चार घास जास्त जाण्याची शक्यता असते.
जर तुम्हाला जेवताना टीव्ही बघायला आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता.
थोडक्यात जेवताना जर तुम्ही तुमचे मन रमेल, तुम्हाला आवडेल अशा गोष्टी केल्या तर तुम्हाला त्या नादात जेवण जायला मदत होईल.
याचबरोबर जर जेवणात तुमच्या आवडीचे पदार्थ असतील, तरी सुद्धा तुम्हाला जेवण जास्त जाण्याची शक्यता असते.
यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या पद्धतीचे जेवण, वेगवेगळे मसाले वापरून वेगवेगळ्या चवीचे जेवण तयार करू शकता.
तुमचा जेवणातला ‘इंटरेस्ट’ वाढवा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
अशावेळेला तुम्ही दर जेवणात तुमच्या आवडीचा एकतरी पदार्थ करू शकता जेणेकरून तुम्हाला खायची इच्छा होईल.
जर तुम्ही तुमची भूक वाढवायचा प्रयत्न करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे.
४. जेवणाच्या वेळा ठरवून घ्या
सहसा भूक लागल्यावर आपण जेवतो आणि सवयीचा भाग म्हणून भूक आपल्याला काही ठराविक वेळेलाच लागते.
मग भूक लागली की आपण जेवण, नाश्ता असे करतो.
पण तुम्हाला जर भूकच लागत नसेल तर या वेळा ठरवणार कशा?
अशावेळेला जेवणाची वेळ ठरवण्यासाठी भुकेवर अवलंबून राहणे बरोबर नाही.
तुम्हाला भूक लागत नसली तरीही तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा निश्चित केल्या पाहिजेत.
भूक लागली नाही तरी जेवायची वेळ झाल्यावर जेवायचे असा, जर तुम्ही नियम स्वतःला घालून घेऊन त्याचे पालन केले तर तुमच्या पोटात तुम्हाला आवश्यक असलेल्या कॅलरी सुद्द्धा जातील आणि यामुळे तुम्हाला भूक लागण्याचे प्रमाण वाढण्यासाठी सुद्धा मदत होईल.
५. नाश्ता कधीच टाळू नका
तुम्हाला भूक लागली नसेल तरी सकाळी उठल्यावर नाश्ता केला पाहिजे.
सकाळचा नाश्ता केल्याने दिवसभर जास्त कॅलरी घटविण्यासाठी मदत होते ज्यामुळे भूक लागण्याचे प्रमाण वाढते.
तुम्ही जर तुमची भूक वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर सकाळी नाश्ता केला पाहिजे.
६. आहारात फायबरचे प्रमाण कमी करा
फायबर हे पचनासाठी गरजेचे असतात त्यामुळे ते आहारातून पूर्णपणे वर्ज्य करता येत नाहीत.
पण तुम्हाला जर भुक लागण्याचे प्रमाण वाढवायचे असेल, तर आहारातील फायबरचे प्रमाण कमी केल्याने फायदा होईल.
आहारात जर फायबर जास्त प्रमाणात असेल, तर त्यामुळे पोट लवकर भरते व जास्त वेळासाठी भरलेले राहते.
यामुळे वजन कमी करण्यासाठी फायबर जास्त प्रमाणात घेणे गरजेचे असते पण, ते जर वाढवायचे असेल तर फायबरचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे.
पांढऱ्या भातात फायबर अत्यंत कमी प्रमाणात असतात.
७. ड्रिंकच्या स्वरूपातून कॅलरी घ्या
दिवसाला तुम्हाला जितक्या कॅलरी घेणे गरजेचे आहेत तितक्या कॅलरी, जर तुमच्या पोटात खाण्यातून जात नसतील तर त्याच्या ऐवजी ज्यूस, मिल्कशेक इत्यादी पिऊन, त्या कॅलरी पोटात जातील याची खात्री केली पाहिजे.
सॉलिड जेवण करताना ते चावावे लागते.
जेवणाची इच्छा नसेल, भूक लागत नसेल तर बऱ्याचदा ही चावण्याची क्रिया होत नाही, घास तोंडातल्या तोंडात फिरल्या सारखा होतो आणि यामुळेच जेवण जात नाही.
पण कॅलरी योग्य प्रमाणात पोटात जायला हव्यात. यासाठी ज्यूस, मिल्कशेक हे अतिशय चांगले पर्याय आहेत.
काही कारणाने तुमची भूक कमी झाली असेल तरीही हे सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या शरीराला गरजेच्या असणाऱ्या कॅलरी घेतल्या पाहिजेत.
यामुळे भूक न लागण्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाहीत. योग्य प्रमाणात जेवण जाईल आणि हळूहळू भूक वाढायला सुद्धा मदत होईल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.