सध्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात करोना नावाचे वादळ आले आहे.
सर्वच जण ह्या महामारीने ग्रासले गेले आहेत आणि भीतीच्या सावटाखाली आहेत.
ह्यातून लहान मुलांची देखील सुटका नाही. आत्ताची करोनाची जी दुसरी लाट आहे त्यात लहान मुले देखील मोठ्या प्रमाणावर आजारी पडताना दिसत आहेत.
अशा परिस्थितीत आपल्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात.
आज आपण त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करुया.
प्रश्न १ : करोनाच्या दुसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका का आहे ?
उत्तर : करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मुलांना इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्त आहे ही गोष्ट खरी आहे.
त्याचे महत्वाचे कारण म्हणजे हा करोना वायरस सतत स्वतःचे स्वरूप बदलतो आहे.
हा नवीन करोना विषाणू जास्त संसर्गजन्य असून त्याचे संक्रमण मुलांमध्ये जास्त प्रमाणात होत आहे.
पण सुदैवाने मुलांना होणारे इन्फेक्शन हे सौम्य स्वरूपाचे असून त्यांना जास्त लक्षणे देखील दिसून येत नाहीत.
तसेच मुलांचे बरे होण्याचे प्रमाण देखील सर्वाधिक आहे.
प्रश्न.२ : मुलांमध्ये करोनाची कोणती लक्षणे आढळत आहेत ?
उत्तर : लहान मुलांमध्ये करोनाची खालील लक्षणे आढळतात….
१. ताप
२. खोकला
३. नाक गळणे
४. उलट्या
५. जुलाब
६. पोटदुखी
७. अंगदुखी
८. डोळे लाल होणे
९. अंगावर पुरळ येणे
१०. डोकेदुखी
अर्थात वरील सर्व लक्षणे ही साध्या फ्लूची देखील असतात.
त्यामुळे आपल्या मुलांमध्ये अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना संपर्क करून खात्री करून घ्यावी.
प्रश्न.३ : माझ्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये वरीलपैकी काही लक्षणे आढळल्यास मी काय करावे ?
उत्तर १. सर्वप्रथम घाबरून जाऊ नका. ताबडतोब घरच्याघरी करण्याचे उपचार सुरु करा.
२. मुलाची आणि तुमची काळजी घ्या.
३. घरी बनवलेले ताजे सकस अन्न मुलांना द्या आणि त्यांना भरपूर द्रवपदार्थ आणि पाणी देखील द्या.
४. मुलाला/मुलीला घरातल्या घरात खेळायला, ऍक्टिव्ह रहायला उद्युक्त करा. जेणेकरून तो/ती कंटाळून निराश होणार नाही.
५. दिवसातून किमान २० मिनिटे मुलाला/मुलीला सूर्यप्रकाशात न्या.
६. दर ६ तासांनी मुलाचा/मुलीचा ताप मोजा. जर ताप १०० F च्या वर असेल तर कोमट पाण्याने मुलाचे/मुलीचे अंग पुसून घ्या. गार पाण्याने आंघोळ घालू नका.
७. मुलाची/मुलीची ऑक्सिजन लेवल ऑक्सिमिटरच्या मदतीने तपासत रहा. जर ती ९४ पेक्षा कमी आली तर त्वरित डॉक्टरांना भेटा.
८. कोणतीही औषधे स्वतःच्या मनाने देऊ नका. फक्त डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधेच द्या.
९. मुलाच्या एकूण प्रकृतीवर सतत लक्ष ठेवा. काही बदल वाटल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
प्रश्न. ४ मुलाची कोविड तपासणी केव्हा करावी ?
उत्तर १. जर वरीलपैकी बरीच लक्षणे दिसत असतील तर
२. जर ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप येत राहिला तर
३. जर मुलामध्ये लक्षणे असतील तर कुटुंबातील इतर सदस्यांची देखील तपासणी करा.
प्रश्न. ५ मूल कोविड पॉजिटिव असेल तर हॉस्पिटलमध्ये न्यावे का? केव्हा न्यावे?
उत्तर जर मुलाला
१. १०२ F ताप असेल तर
२. १०० F पेक्षा जास्त ताप सलग येत असेल तर
३. मुलाला धाप लागत असेल तर डॉक्टरांना संपर्क करा.
तसेच
१. मूल निळसर किंवा निस्तेज दिसत असेल
२. हातपाय गार पडत असतील
३. तोंड कोरडे पडत असेल
४. जर ३, ४ तासापासून लघवी झाली नसेल
५. अन्न जात नसेल
६. आकडी किंवा फिट आल्यासारखे वाटत असेल
तर मात्र ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जा.
प्रश्न. ६ मुलांना कोविड होऊ नये म्हणून काय करावे ?
उत्तर १. मुलांना सोशल डिस्टंसिंग चे महत्व समजावून सांगा.
२. मुलांना मास्क घालूनच बाहेर जाण्यासाठी आग्रही रहा.
३. मुलांना नियमित हात स्वच्छ धुण्याची सवय लावा.
४. बाहेर असताना मुलांना कुठल्याही वस्तूला हात लावू देऊ नका.
५. बाहेरून आल्यावर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालण्याची सवय मुलांना लावा.
६. घरातील दाराचे हॅंडल, टेबल इत्यादि गोष्टी सतत सॅनीटाईज करा.
प्रश्न. ७. इन्फेक्शन झाल्यापासून करोनाची लक्षणे दिसायला साधारणपणे किती वेळ लागतो?
उत्तर. इन्फेक्शन झाल्यापासून लक्षणे दिसून यायला मोठी माणसे व लहान मुलांना साधारण सारखाच वेळ लागतो. साधारणपणे ४ ते ५ दिवसात लक्षणे दिसु लागतात.
प्रश्न. ८ ज्या मुलांना आधीच काही आजार असतील त्यांना करोनापासून संरक्षण कसे द्यावे?
उत्तर. ज्या लहान मुलांना आधीपासून हृदयविकार, श्वसनांचे त्रास, दमा किंवा लहान मुलांना होणारा मधुमेह आहे त्यांना ह्या काळात जास्त संरक्षण मिळणे आवश्यक आहे.
अशा मुलांना गर्दीत अजिबात जाऊ न देणे, त्यांची आवश्यक असलेली औषधे वेळेवर न चुकता देणे अशी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच करोनाबाबत घ्यायची इतर काळजी घेणे देखील आवश्यक आहे.
प्रश्न. ९ लहान बाळांना देण्यात येणाऱ्या इतर लसी देणे ह्या काळात सुरक्षित आहे का ?
उत्तर. हो, डॉक्टरांनी आणि भारतीय बालरोगतज्ञ समितीने सांगितलेल्या सर्व लसी ह्या काळात लहान मुलांना देणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
मुलांच्या लसीकरणाच्या तक्त्याप्रमाणे सर्व लसी त्यांना वेळोवेळी द्याव्यात. त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ति वाढण्यास मदत होते. हे सर्व लसीकरण सरकारी लसीकरण केंद्रात अथवा तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे करावे.
प्रश्न. १० आजारी पडलेल्या मुलाचे मनस्वास्थ्य कसे राखावे ?
उत्तर. सर्वप्रथम स्वतः घाबरून जाऊ नका, अथवा निराश, दु:खी देखील होऊ नका, तुमच्यामुळे मूल देखील घाबरून जाईल.
त्याऐवजी आपले मूल लवकरच बरे होणार आहे असा विचार करा आणि तोच विचार मुलापर्यंत पोचवा. ह्या काळात आपल्या मुलाचा मित्र बना, त्याच्याशी खेळा, भरपूर गप्पा मारा.
घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. त्यामुळे आजाराचा विसर पडून मूल आनंदी राहू शकेल.
तर ही आहेत आपल्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे. ह्याचा आपल्या सर्वांना करोनाचा सामना करताना नक्कीच उपयोग होणार आहे.
करोनावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे लसीकरण.
अजून १८ वर्षाखालील मुलांसाठी लस आलेली नाही, पण ती लवकरच येईल अशी आशा करुया.
ज्याना आता लस मिळत आहे त्या सर्वांनी लस घेऊन करोनापासून स्वतःचा यशस्वी बचाव करुया आणि मुलांची लस येईपर्यंत त्यांचेही ह्या रोगापासून संरक्षण करुया.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.