सध्याच्या काळातला मुलांच्याच काय पण मोठ्यांच्याही बाबतीत सर्वात जास्त आढळून येणारा त्रास म्हणजे दात किडणे.
वरवर अगदी साधा वाटणारा हा त्रास प्रत्यक्षात बरेच गंभीर परिणाम करतो. किडणाऱ्या दातांवर करावे लागणारे उपचार अत्यंत खर्चीक तर असतातच पण अत्यंत वेदानादायक पण असतात.
एका सर्वेमध्ये असे आढळून आले आहे की वय वर्षे २ ते ११ पैकी ४२ % तर वय वर्षे ६ ते ११ पैकी २१ % मुलांचे दांत किडलेले असतात.
म्हणजेच पुढे त्रास देणाऱ्या ह्या समस्येची सुरुवात अगदी लहानपणापासून होते. त्यामुळे ह्या समस्येवर जितक्या लवकर लहानपणापासून तोडगा काढला जाईल तेवढं दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे.
कारण लहान मुलांचे दात जरी दुधाचे असले, पडून जाणार असले तरी त्यामुळे हिरड्या आणि नंतर येणाऱ्या नवीन दातांवर परिणाम होऊ शकतो.
तसेच तोंडाच्या आरोग्यावर ही परिणाम होऊ शकतो.
म्हणूनच आपण दातांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे सविस्तर पाहूया.
१. लहान मुलांच्या दातांची काळजी अगदी सुरुवातीपासून घेतली पाहिजे. अगदी दात यायला सुरुवात होण्याआधीपासून. कसे ते पाहूया.
अगदी लहान बाळांच्या हिरड्या स्वच्छ ठेवणे, त्यांनी काही खाल्ले, दूध प्यायले की त्यांचे तोंड स्वच्छ ठेवणे ह्यामुळे येणारे दात निरोगी येतील ह्याची काळजी जाते.
झोपताना दुधाची बाटली तोंडात ठेवून झोपायची सवय लागू देऊ नये. त्यामुळे बराच काळ दुधाचा अंश तोंडात राहून तेथे जंतूंची लागण होऊ शकते.
लहान लहान दात यायला लागले की बाळांचे दात पालकांनी बोटात घालायचा मऊ ब्रश मिळतो, त्या ब्रश च्या मदतीने साफ करावेत.
काहीही खाऊ घातल्यावर किंवा दूध प्यायल्यावर हे करावे. त्यामुळे मुलांना अगदी नकळत्या वयापासून दातांच्या स्वच्छतेची सवय लागते.
वयाच्या २ ऱ्या वर्षांपासून मुलांना स्वतःच्या हाताने दात घासायला शिकवावे. सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपायच्या आधी दात घासलेच पाहिजेत असा नियम करावा.
मुलांना दात घासायला उद्युक्त करण्यासाठी त्यांच्या आवडीचा ब्रश तसेच पेस्ट वापरू द्यावी. तसेच स्वतः देखील मुलांच्या बरोबरीने दात घासून ते स्वच्छ ठेवावेत.
मुले साधारण ८ ते १० वर्षांची होईपर्यंत त्यांच्या ह्या सवयीकडे लक्ष द्यावे लागते. मग त्यांची त्यांना सवय लागून ह्या गोष्टीचे महत्त्व देखील लक्षात येते.
मुलांना जीभ आणि हिरड्या स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व देखील समजावून सांगावे.
दुधाचे दात पडून येणाऱ्या कायमस्वरूपी दातांचे महत्त्व मुलांना समजावून सांगावे. त्या दातांची काळजी कशी घ्यायची हे सांगावे.
म्हणजे मग मुले आयुष्यभर दात स्वच्छ ठेवण्यास शिकतात आणि पुढे होणाऱ्या दाताच्या समस्या कमी होतात.
२. दातांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून नियमित दंतवैद्यांना भेट देऊन आपले दात तपासत राहणे आवश्यक आहे. लहानपणापासून म्हणजे अगदी मूल १ वर्षाचे झाले की दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला की पुढे येऊ शकणाऱ्या दातांच्या समस्या टाळता येतात.
तसेच मुलांमध्ये वेडेवाकडे येणारे दात, किडलेल दात, अंगठा/बोटे चोखणे ह्यासारख्या सवयी ह्यावर वेळीच सल्ला मिळू शकतो.
दातांच्या डॉक्टर कडे वर्षातून किमान दोन वेळा जाणे ही सवय मोठेपणीही ठेवावी म्हणजे पक्के दात, दाढा व्यवस्थित येणे, पुढे उद्भवणाऱ्या दातांच्या समस्या न येणे ह्यासाठी मदत मिळू शकते.
३. आपल्या दातांवर एनामेलचे आवरण असते ज्यामुळे दातांचे संरक्षण होत असते. फ्लूओराईड ह्या घटकद्रव्यामुळे ह्या दातांच्या आवरणाचे म्हणजेच टुथ एनामेलचे संरक्षण केले जाते.
हे फ्लूओराईड प्लाक आणि लाळेत मिसळून दातांचे रक्षण करते. म्हणून दातांचे डॉक्टर फ्लूओराईड युक्त टुथपेस्ट वापरण्याचा सल्ला देतात.
तसेच फ्लूओराईड युक्त जेल आणि माऊथ वॉश मिळतात ते वापरण्याचा सल्ला देतात. त्यामुळे दात चांगले राहण्यास मदत होते.
४. कुठलाही गोड किंवा चिकट पदार्थ खाल्ला की तो दातांवर चिकटून राहतो.
त्यामुळे दात लवकर किडण्याची शक्यता असते. लहान मुलांमध्ये चॉकलेट मुळे ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते.
त्यामुळे गोड किंवा चिकट पदार्थ मुळात कमी खावेत आणि खाल्ले तरी त्यानंतर दात ताबडतोब स्वच्छ करावेत. लहानपणापासून तशी सवय लावून घ्यावी.
५. दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक असणारे पदार्थ म्हणजेच चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे, चहा, कॉफी, यांचे सेवन अत्यंत कमी प्रमाणात करावे. तसेच मद्यपान, धूम्रपान, तंबाखू खाणे हे अत्यंत हानिकारक असून ते अजिबात करू नये.
६. आपला टुथब्रश दर २ ते ३ महिन्यांनी बदलावा. तसेच फार मऊ किंवा फार कडक ब्रिसल असणारा ब्रश वापरू नये. नेहेमी चांगल्या प्रतीचा ब्रश व पेस्ट वापरावी.
तर अशा प्रकारे आपण आपल्या दातांची काळजी घेऊन आयुष्यभर चांगले दात टिकवू शकतो. दंत वैद्यांकडे होणाऱ्या वेदनादायक उपचारांपासून स्वतःला दूर ठेवू शकतो. ह्या लेखातील माहितीचा जरूर लाभ घ्या आणि आपल्या दातांचे आरोग्य सांभाळा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.