प्रवास करणे कोणाला आवडत नाही? सहलीला जाणे, नवीन ठिकाणी फिरायला जाणे सगळ्यांनाच आवडते. शिवाय काहींना कामानिमित्त देखील प्रवास करावा लागतो. हौस मौज असो किंवा गरज असो प्रवास करणे काही टाळता येत नाही.
सध्याच्या पॅनडेमीकच्या काळात आपण कुठे सहलीसाठी जात नसलो तरी काही कामासाठी प्रवास करावा लागणार असेल तर मात्र काही पर्याय उरत नाही.
जर आपल्याला काही आजार असेल तर असे प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
मधुमेह हा असाच एक आजार आहे.
मधुमेह असलेल्या व्यक्तीला प्रमुख काळजी घ्यावी लागते ती खाण्याच्या आणि औषधांच्या वेळा पाळण्याची. आणि प्रवासात नेमके तेच जमत नाही.
प्रवासात असताना खाण्याच्या वेळा चुकणे, औषधे बरोबर नसणे, डीहायड्रेशन होणे किंवा खूप थकवा येणे अशा कारणांमुळे तुमची ब्लड शुगर लेव्हल कमीजास्त होऊ शकते.
त्यामुळे मधुमेही लोकांनी प्रवासात स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
ह्या ब्लड शुगर लेव्हल कमीजास्त होण्याला घाबरून अनेक मधुमेही लोक प्रवास करण्याचे टाळतात.
परंतु आता असे करण्याची गरज नाही. काही पूर्वतयारी करून आणि विशेष काळजी घेऊन मधुमेह (diabetes) असणारे लोक सुद्धा सहजपणे प्रवास करू शकतात.
कसे ते आपण पाहूया.
तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही प्रवास करताना काय काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
प्रवास करणे म्हणजे अर्थातच नवीन जागांना भेट देणे. आपल्या नेहेमीच्या जागेपेक्षा दूर दुसरीकडे जाणे. नवीन अनोळखी प्रदेश, अनोळखी माणसे अवतीभोवती असताना सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेही लोकांनी तर विशेष काळजी घ्यावी.
१. तुमचे सध्याचे औषधांचे प्रिस्क्रिप्शन जवळ ठेवा
प्रवास करायचा आहे हे ठरल्यावर सर्वप्रथम डॉक्टरांकडे जा. सध्या चालू असलेली औषधे योग्य आहेत ना ह्याची खात्री करून घ्या. काही बदल असतील तर ते लिहून नवीन प्रिस्क्रिप्शन घ्या.
तसेच काही तपासण्या करणे आवश्यक असेल तर त्या जरूर करून घ्या. प्रवासात असे लेटेस्ट प्रिस्क्रिप्शन आणि तपासण्यांचे रिपोर्ट जवळ ठेवा. तसेच त्यांच्या झेरॉक्स काढून त्याही जवळ ठेवा.
म्हणजे काही एमर्जन्सि आलीच तर तुमचे लेटेस्ट प्रिस्क्रिप्शन पाहून तुम्हाला उपचार मिळू शकतील. परदेशी जाणार असाल तर तुमच्या डॉक्टरांकडून मेडिकल भाषेत तुमची कंडिशन समजावून सांगणारे पत्र लिहून घ्या आणि ते प्रवासात जवळ ठेवा.
२. तुमची पुरेशी औषधे जवळ ठेवा
तुम्ही जितके दिवस प्रवास करणार आहात त्यापेक्षा दुप्पट प्रमाणात औषधे घेऊन ती प्रवासात जवळ ठेवा. औषधे कमी पडण्यापेक्षा जास्त असलेली केव्हाही चांगले. ह्याचे महत्वाचे कारण हे की ज्या ठिकाणी तुम्ही प्रवास करून जाणार आहात तेथे तुमची औषधे मिळतीलच ह्याची खात्री नाही.
त्यामुळे पुरेसा (थोडा जास्तच) औषधांचा साठा जवळ असणे प्रवासात योग्य ठरेल. विमानाने प्रवास करणार असाल तर तुमची औषधे तुमच्या जवळच्या बॅगेत ठेवा. विमानाने प्रवास करत असाल तर चेक इन लगेजमध्ये औषधे देऊ नका. एकतर ती तुम्हाला विमानात गरज पडली तर मिळू शकणार नाहीत आणि दुसरे म्हणजे तिथे सामान हाताळताना औषधे खराब होऊ शकतात.
३. ग्लुकोमीटर जवळ ठेवा
ग्लुकोमीटर ह्या यंत्रामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण स्वतः मोजणे अतिशय सोपे झाले आहे. प्रवासात असताना असे ग्लुकोमीटर आणि त्याच्या पुरेशा स्ट्रिपस आणि सेल जवळ ठेवा. त्यामुळे तुम्हाला काही त्रास वाटल्यास ताबडतोब रक्तातील साखरेचे प्रमाण मोजणे शक्य होईल.
तसेच ग्लुकोमीटर, त्याच्या स्ट्रिपस, सेल इत्यादी गोष्टी एका पाऊचमध्ये घालून एकत्र ठेवा म्हणजे वेळेवर ते सापडणे सहज शक्य होईल.
४. काही खायचे पदार्थ जवळ ठेवा
मधुमेही लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी कधीकधी अचानक कमी होते. अशा वेळी गरगरणे, चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो. तेव्हा ताबडतोब काहीतरी खाणे आवश्यक असते. त्यामुळे मधुमेही व्यक्तीने स्वतःच्या पथ्याचे काही पदार्थ स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे.
अचानक काही त्रास झाल्यास असे पदार्थ खाऊन त्रास कमी करता येऊ शकतो. साखर, लिमलेटची गोळी सुद्धा जवळ ठेवावी. तसेच थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खाणे हे सुद्धा मधुमेही व्यक्तींना फायद्याचे ठरते. त्यामुळे स्वतःजवळ ड्राय फ्रुट्स, फळे, सँडविच असे पदार्थ आवर्जून ठेवावेत.
५. शरीराची हालचाल करत रहा
तुमचा प्रवास जर लांब पल्ल्याचा असेल तर प्रवासात हातापायांच्या बोटांची हालचाल, स्ट्रेचिंग असे व्यायाम करत रहा. तसेच विमान अथवा रेल्वे असेल तर थोड्या वेळाने उठून चालून या.
त्यामुळे तुमच्या पायांना सूज येणार नाही. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर नेहेमीच्या रुटीनचा हलका व्यायाम अवश्य करा. मॉर्निंग वॉक करा. म्हणजे अपचन, गॅस इत्यादि समस्या उद्भवणार नाहीत.
६. स्वतःला हायड्रेटेड ठेवा
प्रवासात आणि बाहेरगावी असताना सतत थोडे थोडे पाणी पित रहा. फार जास्त प्रमाणात चहा, कॉफी किंवा शितपेये पिणे टाळा. त्याऐवजी साधे पाणी किंवा नारळाचे पाणी प्या.
प्रवासात गाडीच्या एसीमुळे डीहायड्रेशन होण्याचा धोका असतो. तसे होऊ देऊ नका. तसेच मधुमेही लोकांनी मद्यपान न केलेलेच बरे. त्यामुळे सहलीला गेले असताना त्यावर कंट्रोल ठेवा.
७. आरामदायक पादत्राणे वापरा
प्रवासादरम्यान तुमचे चप्पल अथवा बूट हे अतिशय आरामदायक तसेच मजबूत असणे आवश्यक आहे. मधुमेही व्यक्तींना पायाला दुखापत होणे आणि ती लवकर बरी न होणे ह्याचा धोका असतो. त्यामुळे योग्य मापाचे, पायाला इजा होऊ न देणारे चप्पल, बूट कटाक्षाने वापरा.
फॅन्सि चपलांमुळे पायाला इजा होऊ शकते. त्याचा वापर टाळा. बाहेर असताना अनवाणी मुळीच फिरू नका. पायाला कोणतीही जखम अथवा इन्फेक्शन होऊ देऊ नका.
तर मित्रांनो, अशा प्रकारे काळजी घेऊन तुम्ही अगदी सहजपणे व सुरक्षितपणे प्रवास करू शकता. तेव्हा ही सगळी काळजी जरूर घ्या आणि सुरक्षित प्रवास करा. आणि हो, कोविड संदर्भातील काळजी घ्यायला विसरू नका. मास्कचा वापर जरूर करा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.