महिन्यातल्या त्या चार दिवसात काय करायचे काय नाही याबद्दल आपल्याकडे वेगवेगळी मते ऐकायला मिळतात. यामुळे मुलींचा गोंधळ उडालेला असतो. जर मासिक पाळीत ओटीपोट, कंबर दुखीचा त्रास होत असेल तर या गोंधळात अजूनच भर पडते. जर पाळीत पोट आणि कंबर दुखत नसेल तर रोजची कामे कशीबशी केली जातात पण बहुतांश वेळा या दिवसात आराम करण्यावरच भर असते. विशेषतः जर रक्तस्त्राव आणि दुखणे खूप जास्त असेल तर जास्त वेळ पडून, झोपून राहावे असे वाटत असते. या दिवसात व्यायाम करायचा ही कल्पना सुद्धा करवणार नाही.
शरीराला या दिवसांमध्ये विश्रांतीची गरज असते हे खरे आहे कारण रक्तस्त्राव, दुखणे यामुळे अशक्तपणा आलेला असतो पण त्याचबरोबर जर शरीराची अजिबातच हालचाल झाली नाही तर त्यामुळे दुखणे अजूनच वाढते.
पाळीत होणाऱ्या त्रासांवर हलका व्यायाम हा उपाय आहे. व्यायामाने पाळीत होणारे ओटीपोटाचे दुखणे, डोकेदुखी, मूड स्विंग्स , थकवा असे अनेक त्रास दूर होतात. खरेतर पाळी सुरु असताना बायकांच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात, हार्मोनचे प्रमाण कमी जास्त होत असते. काहींना खूप जास्त रक्तस्त्राव होत असतो. या सगळ्यामुळे या दिवसात थकवा, मरगळ, चिडचिड यासारखे त्रास होतात.
व्यायामामुळे शरीरातील रक्तपुरवठा सुधारतो. पाळीत होणारे हार्मोनल बदल यामुळे मूड स्विंग्स होत असतात पण व्यायामामुळे या हार्मोनची पातळी नियंत्रणात राहते. व्यायामामुळे एनडोरफिन्स नावाचे हार्मोनचे उत्पादन होते, दुखणे कमी होते आणि मूड स्विंग्स होत नाहीत.
म्हणूनच मैत्रिणींनो, या दिवसात पोट दुखत जरी असले तरी नुसते पडून राहणे योग्य नाही. एरवी सारखेच व्यायामाचे महत्व मासिक पाळी सुरु असताना ही आहे. व्यायाम करायचा म्हणजे आपण एरवी करतो तसा नाही. आपल्या तब्येतीला झेपतील असेच व्यायाम या दिवसात करावेत. मग असे कोणते व्यायाम आहेत जे मासिक पाळी सुरु असताना केले तर आपल्या शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी चांगले ठरतात?
आजच्या या लेखात आम्ही याच व्यायाम प्रकारांबद्दल सांगणार आहोत जेणेकरून महिन्यातले मासिक पाळीचे चार दिवस तुम्हाला सुसह्य होतील.
१. चालणे
चालणे हा एरवी सुद्धा जसा उत्तम व्यायाम आहे तसा तो पाळीच्या दिवसांत करण्यासाठी सुद्धा एक चांगला व्यायाम आहे. यामुळे तुमच्या कॅलरी घटवल्या जातात आणि मूड सुद्धा चांगला व्यायला मदत होते. पाळी सुरु असताना किमान २० मिनिटे ते अर्धा तास चालल्याने फायदा होतो. या दिवसात आवर्जून वेळ काढून बाहेर जाऊन चालून यावे. तुमचे जर पहिल्या-दुसऱ्या ओटी पोट किंवा कंबर जास्त दुखत असेल तर अगदी हळूहळू, चालले तरी चालते. या हलक्या व्यायामाने शरीरात हॅपी हार्मोन्स स्त्रवली जातात.
२. धावणे
अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो तेव्हा पळणे शक्य नसले तरी चौथ्या, पाचव्या दिवशी जेव्हा पोटदुखी सुद्धा कमी असते आणि रक्तस्त्राव सुद्धा कमी असतो तेव्हा धावण्याचा व्यायाम करायला काहीच हरकत नसते. धावताना मात्र एरवी सारखे सलग न धावता, सुरुवातीला थोडे हळू पळून, वाटले तर मध्ये थांबून धावले पाहिजे. या दरम्यान घोट घोट पाणी प्यावे. धावल्यामुळे कंबरदुखी सुद्धा कमी व्हायला मदत होते. पण तुम्ही जर एरवी धावत नसाल तर पाळीच्या दिवसात मुद्दाम धावणे बरोबर नाही. याच्या ऐवजी मग तुम्ही तुम्हाला हवा तो दुसरा व्यायामप्रकार निवडू शकता.
३. योगासने
योगासने, प्राणायाम यामुळे तुमचा मूड पटकन सुधारतो. पाळीत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होत. योगासनांमुळे सगळ्या अवयवांची हालचाल होते आणि संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. यामुळे शरीरात होणारा रक्तपुरवठा सुद्धा सुधारतो. योगासनांमुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होते. यामुळे जशी शरीराची हालचाल झाल्यावर दुखणे-खुपणे कमी होते त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य सुद्धा सुधारते आणि चिडचिड, राग कमी होतो.
शरीराला जास्त त्रास न देता, जी आसने जमतील ती हळूहळू करावीत.
४. वेट लिफ्टिंग
पाळीच्या दिवसात अनेकांना जिममध्ये जाणे शक्य होत नाही. काहींना खूप जास्त प्रमाणात दुखत असते त्यामुळे चालायला जाणे सुद्धा शक्य होत नाही.अशावेळी घरच्याघरी थोडी वजने उचलून मसल्सना व्यायाम दिल्याने फायदा होतो. यामध्ये हवे असेल तर फक्त कंबरेच्या वरच्या भागांचे व्यायाम सुद्धा करता येऊ शकतात.
५. स्ट्रेचिंग
घरातल्या घरात हात, पाय, मान, कंबर याचे वेगवेगळे स्ट्रेच केल्याने तिथले मसल्स रीलाक्स होतात आणि दुखण्याचे प्रमाण कमी होते. पाळीच्या दिवसात सकाळ, संध्याकाळ थोडेफार स्ट्रेचिंग केले पाहिजे. जर तुम्ही चालायला जाणार असाल तर चालण्यापूर्वी सुद्धा मसल्स रीलाक्स करायला स्ट्रेचिंग केले पाहिजे.
६. डान्स
डान्समुळे शरीराची हालचाल होऊन सगळ्या अवयवांना व्यायाम तर होतोच, कॅलरी घटवल्या जातात पण यामुळे तुमचा मूड सुद्धा पटकन सुधारतो. पाळी सुरु असताना जर चिडचिड होत असेल, अकारण रडू येत असेल तर थोडासा डान्स केल्याने मूड लगेच सुधारतो. यासाठी तुम्हाला एरवी सुद्धा शक्य असेल, वेळ असेल तर तुम्ही एखादा डान्स क्लास लाऊ शकता. नाहीतर फक्त पाळीच्या दिवसात तुमच्या आवडीची गाणी लाऊन घरच्याघरी डान्स करून तुमचा मूड सुधारू शकता. Youtube वर सुद्धा अनेक डान्सच्या प्रकारांचे व्हिडीओ आहेत, त्यात बघून तुम्ही या दिवसांचा सदुपयोग करून एखादा नवीन डान्सचा प्रकार शिकू सुद्धा शकता.
७.पोहणे
पाळी चालू असताना पोहणे! ही कल्पना सुद्धा करवणार नाही, हो न? पण मैत्रिणींनो, पाळी सुरु असताना पोहण्याचा व्यायाम फायदेशीर आहे. यामुळे शरीराला थकवा येत नाही. पोहताना रक्तस्त्राव झाला तर काय करायचे? खरेतर पाण्यात असताना, जर रक्तस्त्राव जास्त होत नसेल पाण्याच्या प्रेशरमुळे रक्तस्त्राव होणार नाही त्यामुळे जेव्हा पाळीच्या तिसऱ्या, चौथ्या दिवशी तुम्ही अगदी निश्चिंत मनाने पोहायला जाऊ शकता. पोहताना टॅम्पून किंवा मेंस्त्रुअल कपचा वापर करणे या चांगला पर्याय आहे.
पाळी सुरु असताना तुम्ही सगळ्याच एरवी करत असलेल्या गोष्टी करत राहिल्या पाहिजेत. आराम म्हणून नुसते पडत राहणे हे योग्य नाही पण याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की या दिवसात शरीराला जास्त ताण देणे सुद्धा योग्य नाही, विशेषतः जर रक्तस्त्राव खूप होत असेल तर. त्यामुळे तुमच्या शरीराला बळजबरी व्यायाम न देता, जेवढा शक्य असेल, जेवढा झेपेल तेवढाच द्यावा. व्यायामाबरोबरच चौकस आहार, भरपूर फळे, भरपूर पाणी या दिवसात घेतले पाहिजे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.