डोळे हा आपल्या शरीराचा महत्वाचा आणि अत्यंत नाजुक अवयव आहे.
डोळ्यांमुळेच हे सुंदर जग आपण पाहू शकतो.
त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे, त्यांना कोणताही संसर्ग होऊ न देणे हे आपले परम कर्तव्य आहे.
डोळ्यांना होणाऱ्या आजारांपैकी डोळ्यांना संसर्ग होणे ही सर्वात कॉमन गोष्ट आहे.
हा संसर्ग वेगवेगळे बॅक्टीरिया, वायरस किंवा फंगस मुळे होऊ शकतो.
इतरही काही कारणांमुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.
कोणत्याही वयात डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो आणि एकावेळी एकाच किंवा दोन्ही डोळ्यांना देखील संसर्ग होऊ शकतो.
आणि अर्थातच हे संसर्गजन्य असते. म्हणजेच एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.
डोळ्यांना होणारा संसर्ग म्हणजे नक्की काय
डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे म्हणजे डोळ्यांना संसर्ग अथवा इन्फेक्शन होणे.
डोळ्यांना इन्फेक्शन हे मुख्यतः cornea म्हणजेच डोळ्यांचा बाहेरील पारदर्शी भाग आणि conjunctiva म्हणजेच पापण्यांखालील ओलसर भाग इथे होते.
डोळ्याच्या संसर्गाची लक्षणे
डोळ्यांना संसर्ग झाला की खालील लक्षणे दिसून येतात.
१. डोळ्यांना सूज येऊन डोळे लाल होणे आणि डोळे दुखणे
२. पापण्याना हात लावला की दुखणे
३. डोळ्यांना पिवळसर रंगाची घाण येणे/ पू येणे
४. सकाळच्या वेळी घाण येऊन पापणी बंद होणे.
५. धूसर दिसणे
६. डोळ्यातून सतत पाणी वाहणे
७. डोळ्यांची जळजळ होणे.
८. डोळ्याना प्रकाश सहन न होणे.
९. रांजणवाडी सारखा फोड येऊन तो दुखणे
डोळ्यांना संसर्ग होऊ नये याकरिता काय काळजी घ्यावी
१. आपल्या नकळत आपल्या हातांचा स्पर्श डोळ्यांना अनेक वेळा होतो.
त्यामुळे वारंवार हात धुवून ते स्वच्छ ठेवणे हा डोळ्यांचा संसर्ग टाळण्याचा प्रमुख उपाय आहे.
२. आपला टॉवेल, रुमाल आणि आय ड्रॉपस कोणाबरोबरही शेयर करू नका.
३. प्रखर ऊन आणि धुरळ्यापासून डोळ्यांचे संरक्षण करा.
४. वारंवार डोळे चोळू नका.
५. कुठलेही केमिकल किंवा तीव्र वासाचे द्रव पदार्थ डोळ्यांजवळ नेऊ नका.
६. उन्हात जाताना गॉगल जरूर वापरा.
७. कॉनटॅक्ट लेन्स चा कमीतकमी वापर करा.
आपल्या जीवनशैली आणि आहारात काही बदल केले तरीही आपण डोळ्याना होणारा संसर्ग रोखू शकतो.
कसे ते पाहूया.
१. डोळ्यांचे स्वास्थ्य राखण्याकरिता भरपूर फळे व भाज्या यांचे सेवन करा.
२. गोड पदार्थ कमी प्रमाणात खा.
३. योग्य प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ऍसिडचे सेवन करा हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. अक्रोड, flaxseed, शेंगदाणे आणि मासे ह्यामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड मुबलक असते.
४. भोजनात मिठाचा अतिरिक्त वापर टाळा.
५. हात स्वच्छ धुवून मगच डोळे स्वच्छ करा. अस्वच्छ हातांचा डोळ्यांना स्पर्श टाळा.
६. प्रखर उन्हात जाताना नेहेमी गॉगल लावा.
७. विटामीन सी युक्त पदार्थांचे सेवन करा. आवळा, संत्री, मोसंबी, आणि लिंबू ह्यात विटामीन सी असते.
८. बाहेरून आल्यानंतर आणि सकाळी उठल्यानंतर डोळे गार पाण्याने स्वच्छ धुवा.
९. सलग खूप वेळ कम्प्युटर वर काम करणे किंवा खूप वेळ वाचन करणे टाळा. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो.
डोळ्यांच्या संसर्गावर घरगुती उपाय
१. मध व गुलाबपाणी– डोळ्यांच्या इन्फेक्शन ला मध आणि गुलाब पाणी ह्यांचे मिश्रण करून लावले तर खूप फायदा होतो.
२. ऍपल सायडर विनिगर– ऍपल सायडर विनिगर हे बॅक्टीरिया मुळे होणाऱ्या इन्फेक्शनवर प्रभावी आहे. त्यामुळे एक कप पाण्यात एक चमचा ऍपल सायडर विनिगर घालून कापसाने ते मिश्रण डोळ्यांना लावले असता इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
३. तुळस– ३/४ तुळशीची पाने चुरडून त्यांचा रस एक कप पाण्यात मिसळून त्या पाण्याने डोळे धुतले असता इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
४. आवळा– आवळा हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान आहे. एक कप आवळ्याच्या रसात २ चमचे मध घालून पिण्यामुळे खूप फायदा होतो.
५. बडीशोप– ५० ग्रा बडीशोप एक कप पाण्यात उकळून गार झाल्यावर त्या पाण्याने डोळे धुवावेत.
६. कोथिंबीर– वाळलेली कोथिंबीरीची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने डोळे धुतले की डोळ्यांची सूज आणि जळजळ कमी होते.
७. हळद– गरम पाण्यात हळद मिसळून ते पाणी कापसावर घेऊन त्याने डोळे पुसावे. इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
८. बटाटा– बटाट्याच्या चकत्या करून त्या १५ मिनिटे डोळ्यांवर ठेवल्या असता खूप फायदा होतो.
९. पालक आणि गाजर– पालक आणि गाजर ह्यांचा रस काढून तो नियमित पिण्याने इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
१०. गुलाब पाणी– गुलाब पाण्याचे २, ३ थेंब डोळ्यात दिवसातून ३ वेळा घाला, ह्यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होऊन आराम मिळतो.
डॉक्टरां ना कधी भेटावे
डोळे हा आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांच्या संसर्गाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. वरील उपाय करूनही जर काही फरक पडला नाही तर लगेच डॉक्टरांना दाखवून डोळे तपासून घ्या. आणि त्यावर योग्य ते उपचार करा.
स्वस्थ रहा आनंदी रहा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.