मी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात “शेखचेल्ली” चा धडा होता. तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता. पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत. आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो.
१. बचत आणि गुंतवणूक: अनेकजण या दोन्हीची गल्लत करून आपण केलेल्या बचतीलाच गुंतवणुक असे समजतात. या दोन्हीही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असून गुंतवणुकीत जाणीवपूर्वक धोका (Calculated Risk) स्वीकारावा लागतो.
२. गुंतवणूक व कर्ज यांचे कागदपत्र नीट न पहाणे आणि ठेवणे: आपण केलेली गुंतवणूक आणि घेतलेली कर्ज या संबंधी सर्व कागदपत्र तपासून घेणे महत्वाचे आहे. आपण मान्य केलेल्या अटीप्रमाणे ते आहे की नाही हे पहावे आणि त्याप्रमाणे नसल्यास लगेच निदर्शनास आणून द्यावे. ही सर्व कागदपत्र व्यवस्थित नोंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. गुंतवणूकीवरील वारसनोंदी बरोबर आहेत का हे कटाक्षाने पहावे.
३. बचत आणि गुंतवणूक करण्यात उशीर करणे: अनेकजण खर्च करायला एका पायावर तयार असतात मात्र गुंतवणूक करण्यासाठी ते टाळाटाळ करतात. गुंतवणूकीची सुरूवात लवकरात लवकर करणे केव्हाही चांगलेच. त्यामुळे आपली गुंतवणूक चक्राकारगतीने वाढते. गुंतवणूकीचे विविध पर्याय आजमावून घेता येतात. उशीरा सुरूवात केलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करायला लागल्याने फारसे पर्याय आजमावता येत नाहीत.
४. कर्ज घेवून चैन करणे: सहज उपलब्ध होणारे व्यक्तिगत कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांमुळे अनावश्यक गोष्टी या आपल्या गरजा कधी बनतात ते समजत नाही. इतर कोणत्याही मार्गाने उपलब्ध असलेल्या कर्जापेक्षा यावरील व्याजदर सर्वाधिक असतो त्यामुळे आपण कर्जाच्या सापळ्यात कधी अडकतो ते समजत नाही.
५. कर्ज फेडण्याऐवजी गुंतवणूक करणे: एकाचवेळी कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे ही मोठीच तारेवरची कसरत आहे. आपल्याकडे अतिरिक्त रक्कम आली तर कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे यातील पर्यायांचा बारकाईने विचार करावा लागतो. दीर्घ मुदतीच्या कर्जाची अंशतः परतफेड करणे भवितव्याच्या दृष्टीने अनेकदा खूप फायद्याचे ठरते.
६. महत्वपूर्ण माहितीकडे कानाडोळा करणे: अनेकदा गुंतवणूक करताना आणि कर्ज घेतांना एक करार केला जातो. यात सर्व अटी आणि जोखिम याची माहिती असते. या अटी काय आहेत आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होवू शकतो याची जाणीव आपल्याला असणे जरूरी आहे. यामुळे स्वतंत्र निर्णय घेता येणे सोपे जाते. केवळ एजंट सांगतो त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये.
७. इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही: इन्शुरेन्स आणि गुंतवणूक ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. इन्शुरेन्स मधून कठीण प्रसंगी सुरक्षिततेची तरतूद पर्याय म्हणून पैशांच्या स्वरूपात करायची असते तर गुंतवणुकीतून महागाईवर मात करणारा आकर्षक परतावा मिळवायचा असतो. या दोन्हीही गोष्टी एकदम पूर्ण होवू शकत नाहीत. तेव्हा वेगळे असे सुरक्षा कवच घेवून अन्य गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा. दोन्हीही गोष्टी एकत्रित असणाऱ्या योजनातून आपली पूर्ण गरज भागू शकत नसल्याने अशा योजना घेवू नयेत.
८. अंदाजपत्र बिघडणे: आपल्या कुवतीपेक्षा खर्च जास्त होवू नये याची काळजी घ्यावी. “अंथरुण पाहून पाय पसरावे” असे म्हटले जाते अगदी तसेच नाही तरी अंथरुण पुरत नसेल तर ते मोठे कसे करता येईल त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे. ज्यायोगे आपल्या अल्प आणि दीर्घकालीन गरजांची पूर्तता आपल्या उत्पन्नातून करता येणे गरजेचे आहे.
या सर्व गोष्टी आपल्याला माहीत नाहीत असे नाही तरीही आपले पाऊल डगमगू शकते म्हणून परत एकदा ही उजळणी.
आर्थिक विषयांची सखोल माहिती देणारी पुस्तके खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.