तुम्ही लॅक्रिमेशन बद्दल ऐकले आहे का? जाणून घ्या लॅक्रिमेशन म्हणजे काय? त्यावर काय घरगुती उपाय करता येतात.
दुःखाच्या किंवा आनंदाच्या प्रसंगी डोळ्यातून पाणी येणे अगदी सहाजिक असते. परंतु असे पाणी येणे जेव्हा आजाराचे स्वरूप धारण करते तेव्हा त्याला लॅक्रिमेशन असे म्हणतात.
आज आपण लॅक्रिमेशनची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
लॅक्रिमेशनची कारणे
खोलीत उजेड कमी असणे, अशक्तपणा आलेला असणे, डोळ्यांना सूज आलेली असणे या कारणांमुळे डोळ्यातून पाणी येणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु त्या व्यतिरिक्त खालील कारणांमुळे जर डोळ्यातून पाणी येत असेल तर ती एक गंभीर समस्या असू शकते.
१. अश्रू नलिका सुजणे अथवा बंद होणे
लहान बाळांमध्ये अश्रू नलिका अविकसित असल्यामुळे डोळ्यातून पाणी येण्याचे प्रमाण जास्त असते. वय वाढते तसे या अश्रू नलिका विकसित होऊन ऊन डोळ्यातुन विनाकारण पाणी येण्याचे प्रमाण कमी होते. परंतु काही लोकांमध्ये या अश्रू नलिका तशाच अविकसित राहतात अथवा काही कारणांमुळे त्यांना सूज येते किंवा त्या बंद होतात. अशावेळी डोळ्यातून पाणी येण्याचे प्रमाण वाढते.
२. कंजंक्टीवायटिस म्हणजेच डोळे येणे
डोळे आलेले असताना डोळ्यातून जास्त प्रमाणात पाणी येणे ही समस्या आढळून येते. कोणत्याही बॅक्टेरिया अथवा फंगसचा डोळ्यांना संसर्ग झाला की डोळे लाल होणे, त्यातून जास्त प्रमाणात पाणी येणे तसेच पांढऱ्या रंगाची घाण बाहेर पडणे अशी लक्षणे दिसतात.
३. कॅराटायटिस
डोळ्यातील कॉर्निया या भागाला झालेल्या फंगल अथवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे हा आजार होऊ शकतो. या आजारात डोळे लाल होणे आणि डोळ्यातून जास्त प्रमाणात पाणी येणे ही लक्षणे दिसून येतात.
४. युवायटीस
डोळ्याच्या रेटिना आणि बुबुळाच्या पांढर्या भागाच्यामध्ये असणाऱ्या पडद्याला सूज आली असता हा आजार होऊ शकतो. ह्या आजारामध्ये डोळ्यातून पाणी येण्याबरोबरच धूसर दिसणे, डोळे दुखणे आणि लांबचे कमी दिसणे अशी लक्षणे दिसून येतात.
५. काॉर्निअल अल्सर
कॉन्टॅक्ट लेन्सच्या चुकीच्या किंवा अतिवापरामुळे डोळ्यांना दुखापत होऊन हा आजार होऊ शकतो. यामध्ये डोळ्यातून पाणी येणे, धूसर दिसणे आणि डोळे दुखणे अशी लक्षणे दिसतात.
६. ड्राय आय सिंड्रोम
या आजारांमध्ये डोळ्यातून जास्त प्रमाणात पाणी येऊन ते पाणी वाहून गेल्यामुळे नंतर डोळे कोरडे पडतात. तसेच डोळे लाल होणे आणि दुखणे ही लक्षणे देखील दिसून येतात.
७. आय हर्पिस
डोळ्यांना होणाऱ्या संसर्गामुळे हा आजार होतो. डोळ्यातून जास्त पाणी येण्याबरोबरच डोळे सुजणे, जळजळणे, डोळ्यातून पांढरी घाण येणे अशी लक्षणे दिसतात.
लॅक्रिमेशन होऊ नये म्हणून काय करावे?
१. टीव्ही अथवा कॉम्प्युटरचा वापर कमी करावा
टीव्हीच्या अथवा कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर फार जास्त वेळ घालवल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यातून पाणी येऊ लागते. आपला स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करावा, तसेच डोळ्यांना थंडावा मिळेल असे उपाय करून डोळ्यांची काळजी घ्यावी.
२. डोळ्यांना वारंवार हात लावू नये
वारंवार डोळ्यांना हात लावणे, डोळे चोळणे या सवयीमुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. म्हणून जाणीवपूर्वक डोळ्यांना हात लावणे टाळावे. शक्य असेल तर शून्य नंबरचा चष्मा वापरावा. तसेच डोळ्यांच्या मेकअपसाठी उत्तम प्रतीचे साहित्य वापरावे. कमी प्रतीच्या मेकअप साहित्यातून देखील संसर्ग होण्याची शक्यता असते.
३. एलर्जी
धूर, धुळ किंवा काही रासायनिक पदार्थ यांची बऱ्याच लोकांना ऍलर्जी असते. अशावेळी डोळे लाल होऊन डोळ्यातून पाणी येऊ लागते. धूर अथवा धुळीच्या संपर्कात येताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.
४. वारंवार सर्दी होऊ देऊ नये
वारंवार सर्दी आणि फ्लू होत असेल तर त्याचा डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांमधून जास्त प्रमाणात पाणी येणे तसेच डोळे सतत लाल होणे अशी लक्षणे दिसतात. वारंवार सर्दी होत असेल तर त्यावर कायमस्वरूपी औषधोपचार घ्यावेत.
५. आय ड्रॉप
एकाच प्रकारचे आय ड्रॉप खूप काळ वापरत राहिल्यामुळे डोळ्यांमधून पाणी येऊ शकते. असे ड्रॉप्स वापरताना डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
६. डोळ्यांची काळजी घ्यावी
कडक ऊन आणि प्रदूषणयुक्त वातावरणात जाताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. त्याशिवाय नियमितपणे संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. विटामिन ई आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड असणारे पदार्थ सेवन करावेत. धूम्रपान करू नये. उत्तम प्रतीचा गॉगल वापरावा.
लॅक्रिमेशनवर करण्याचे घरगुती उपाय
१. चहा पावडर
हर्बल किंवा ग्रीन टी च्या टी बॅग्स सहन होईल इतपत गरम पाण्यात बुडवून त्या टी बॅग्सनी डोळ्यांना शेक द्यावा. हा उपाय अतिशय फायदेशीर आहे परंतु हा उपाय करताना डोळ्यांची काळजी घ्यावी. अतिशय काळजीपूर्वक हा उपाय करावा.
२. मीठ आणि पाणी
एक ग्लास स्वच्छ आणि कोमट पाण्यात चमचाभर मीठ मिसळावे. एक स्वच्छ रुमाल त्या पाण्यात बुडवून ऊन पिळून घेऊन डोळ्यांना शेक द्यावा. हा उपाय दिवसातून तीन वेळा करावा. डोळ्यांना झालेल्या संसर्गावर हा उपाय प्रभावी आहे. डोळ्यांवर करण्याचे सर्व उपाय करताना अतिशय काळजी घ्यावी.
३. ओला रुमाल
डोळ्यात धूळ, धूर अथवा कचरा गेला असताना डोळा स्वच्छ करण्यासाठी तो कधीही चोळू नये. त्याऐवजी एक स्वच्छ रुमाल स्वच्छ गार पाण्यात भिजवून धुऊन घ्यावा. त्यानंतर तो रुमाल घट्ट पिळुन त्याने डोळा स्वच्छ करावा. असे करण्यामुळे इन्फेक्शन न होता डोळा स्वच्छ करता येतो.
४. गरम वाफेचा शेक
स्वच्छ रुमाल सहन होईल इतपत वाफेवर गरम करून डोळ्यांना शेक द्यावा. त्यामुळे डोळ्यांना झालेला संसर्ग कमी होतो तसेच डोळ्यांना आराम पडतो.
५. एरंडेल तेल
रुईचे पान किंवा स्वच्छ कापड एरंडेल तेलात बुडवून डोळ्यांवर ठेवावे. असे ठेवून अर्धातास डोळे मिटून पडावे. त्या व्यतिरिक्त एरंडेल तेलाचा बोटांनी डोळ्यांना हलका मसाज करणे देखील फायदेशीर ठरते.
तर हे आहेत लॅक्रिमेशन म्हणजेच डोळ्यातून जास्त प्रमाणात पाणी येणे या समस्येवर करण्याचे घरगुती उपाय. हे उपाय अवश्य करून पहा. परंतु डोळ्यांसारखा नाजूक अवयव यामध्ये निगडित असल्यामुळे दोन ते तीन दिवसात फरक पडला नाही तर डोळ्यांच्या डॉक्टरांना त्वरित दाखवावे. तसेच कडक ऊन आणि प्रदूषण यांमध्ये डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.