सर्वसामान्य माणसाचे ‘फायनानशिअल लाईफ’ कसे असते, त्यात काय चूक आणि काय बरोबर ते वाचा या लेखात
असे म्हणतात की सर्वसामान्य, म्हणजेच मध्यमवर्गीय लोकं आपल्या इच्छा मारून जगत असतात.
तडजोड या शब्दाशी जणू त्यांची गाठच बांधली गेलेली असते.
अशी जी सर्वसामान्य लोकं असतात त्यांना त्यांच्या वाडवडीलांकडून वारसा हक्काने फार काही मिळालेले नसते.
अशी माणसे स्वकष्टाने, स्वकर्तृवाने वर आलेली असतात.
यामुळेच कदाचित त्यांच्या पैशांबद्दलच्या आणि बचतीबद्दलच्या संकल्पना वेगळ्या असतात.
त्यांना गरजे व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी खर्च करणे जीवावर येते.
हौस-मौज जास्त झाली नाही तरी चालेल पण अडीअडचणीला पैसे बँकेच्या खात्यात असलेच पाहिजेत अशी त्यांची समजूत असते.
काही अंशी ते बरोबर सुद्धा आहे.
आपल्याला महिन्याच्या सुरुवातीला मिळणारे पैसे, आपले खर्च, त्यातील गरजा, चैन आणि आपली होणारी बचत याचा काहीतर ताळमेळ असलाच पाहिजे.
पैसे कमावणे जितके महत्वाचे आहे तितकीच महत्वाची पैशांची बचत, गुंतवणूक सुद्धा आहे.
बचतीचे आणि गुंतवणुकीचे महत्व सांगणारे अनेक लेख यापूर्वी मनाचेTalks वर प्रकाशित झाले आहेत.
खरेतर महिन्याच्या सुरुवातीला जमा आणि खर्चाचा हिशोब मांडून, आपल्या गरजा भागवून, काही रक्कम हौसेसाठी खर्च करून एक ठराविक रक्कम बचतीसाठी बाजूला काढणे हे इष्ट आहे.
पण बहुतेकदा असे होत नाही. काही जणांना अति खर्च करायची सवय असते.
भविष्याचा विचार न करता आजचा क्षण मजेत घालावण्याकडे यांचा कल असतो तर काही याच्या अगदी उलट.
सतत भविष्याचा विचार, पैशांची बचत आणि नियोजन यामुळे ते आजचा क्षण पुरेसा आणि मनासारखा जगू शकत नाहीत.
अशी लोकं त्यांच्या कितीतरी आवडीनिवडींना मुरड घालून फक्त आणि फक्त बचतीचाच विचार करत असतात.
या लेखात आपण ही नाण्याची दुसरी बाजू बघणार आहोत.
म्हणजे काय? तर दर वेळेला आम्ही तुम्हाला बचतीचे महत्व पटवून देतो.
बेसुमार खर्च, विनाकारण खर्च कसे टाळायचे याबद्दल मार्गदर्शन करतो.
पण या इतकेच धोकादायक आहे ते सतत केवळ बचत करणे आणि त्यामुळे आपल्या आवडीनिवडी, हौस-मौज न करणे ते अगदी मुलभूत गरजा कमी करायला बघणे.
खरेतर हल्लीच्या तरुण पिढीचे विचार काहीसे वेगळे असू शकतात, पण त्यांच्यावर सुद्धा हा बचतीचा पगडा असतोच कारण लहानपणापासून ते याच संस्कारात वाढलेले असतात.
त्यामुळे कित्येकदा बक्कळ पैसा कमवत असले, तरी त्यांना चैनीसाठी खर्च करताना विनाकारण एक अपराधीपणाची भावना येते.
कारण गरजा कमी करणे आणि गरजेशिवाय खर्च न करणे हीच शिकवण लहानपणापासून त्यांना मिळत गेली असते.
हे दोन्ही प्रकार खरेतर धोकादायकच.
याचा सुवर्णमध्य गाठता येणे, म्हणजे गरजा-खर्च-हौस याचा समतोल साधणे हे महत्वाचे आहे.
एकदा का हे साध्य झाले तर जगण्याची कला अवगत झाली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
भविष्याची तरतूद करून आपणच कष्टाने कमावलेल्या पैशांच्या उपभोग घेता यायला हवा.
याचा अर्थ बचतीचे महत्व कमी केले पाहिजे, असे नाही.
तर भविष्याच्या चिंतेमुळे जर तुम्ही तुमचा आज मन मारून जगत असाल तर काहीतरी कुठेतरी चुकते आहे.
तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेलच. पण तुम्ही अस एकटे नाही याची खात्री बाळगा.
सर्वसामान्य लोकांचा हाच अनुभव असतो.
असे सर्वसामान्य माणसाचे काय चुकते? तेच या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एखाद्या सर्वसाधारण, मध्यमवर्गीय घराचे उदाहरण घेतले तर लहानपणापासून काय शिकवले जाते हे आपण आधी बघूया.
१. गरजा कमी करण्याला प्राधान्य देणे
आपल्याकडे एक म्हण आहे, ‘अंथरूण पाहून पाय पसरावे.’
या म्हणीप्रमाणेच गरजा उगाचच वाढवून ठेऊ नये हे जरी खरे असले, तरी पैसे असताना गरजा कमी सुद्धा करायचा प्रयत्न करू नये.
एखादे वेळी बचतीची सबब देऊन एखादी चैन कमी केली, किंवा ती सुद्धा कमी न करता काही काळासाठी टाळली तर ते समजण्यासारखे असते.
पण खर्च कमी व्हावा म्हणून मुलभूत गरजा कमी करणे हे चुकीचे आहे.
काही वेळा हीच शिकवण घरातील लहान मुलांना सुद्धा दिली जाते.
पैशांचे महत्व समजावून सांगताना खर्च आणि बचत याचे गणित समजावून न सांगता फक्त बचतीचे महत्व अधोरेखित केले जाते त्यामुळे मुले सुद्धा पैसे खर्च करताना दहा वेळा विचार करतात- अगदी गरजेच्या खर्चांना सुद्धा.
आयुष्य असेच असते अशी त्यांची समज होते.
यामुळे पैसे आले की त्यांची बचत करायची अशी सवय लागते आणि ऐपत असताना सुद्धा विनाकारण गरजा कमी करून मन मारून राहायची सवय लागते.
बचत करून, आर्थिक गणित सांभाळून सुद्धा किंग साईझ आयुष्य जगणं, ही पण एक कला आहे.
आणि त्याची शिकवण लहानपणी दिली जाणच कधीही सोयीस्कर!!
२. चैनीसाठी खर्च न करणे
सगळ्या गरजा भागून, बचतीसाठी पैसे बाजूला काढल्यानंतर सुद्धा जी रक्कम खात्यात उरते ती आनंदासाठी वापरली, घरच्यांच्या, मुलांच्या हौसेसाठी खर्च केली तर त्यात अपराधी वाटण्यासारखे खरेतर काही नसते.
पण मनाचे अशाप्रकारे ट्रेनिंग झाले असते की गरज नसलेली कोणतीही गोष्ट, केली तर फार खर्च झाला आहे अशी समजूत होऊन विनाकारण अपराधी वाटायला लागते.
३. मुलांच्या भविष्याची तरतूद
कित्येक पालक हे स्वतःचे कर्तव्य समजतात. पालक म्हणून मुलांसाठी पैसे बाजूला ठेऊन, ते त्यांच्या अडीअडचणीला देता यावेत यासाठी सोय करणे हे जरी प्रत्येक पालकाचे कर्तव्य असले, तरी ते एकच त्यांचे कर्तव्य आहे असा अर्थ होत नाही.
मुलांच्या भविष्याची चिंता करून अनेक पालक स्वतःचे मन मारत असतात.
पैसे असताना सुद्धा सुट्टीसाठी बाहेर जाणे त्यांना पटत नाही.
पण हे बरोबर आहे का?
मुलांसाठी अमुक एक रक्कम ठेवली तर उरलेले, स्वतः कमावलेले पैसे, स्वतःच्या आनंदासाठी का वापरू नये?
मुलांना सुद्धा त्याच्या जोरावर प्रयत्न करता यायला हवा.
त्यांना सगळे रेडीमेड मिळाले तर पैशांची किंमत राहणारच नाही.
तुमच्याकडून सुद्धा या चुका होत असतील तर लक्षात घ्या.
यामुळे तुम्ही तुमचे मन तर मारताच शिवाय तुमच्या मुलांना सुद्धा नकळत मन मारून जगायची शिकवण देत असता.
मग यात सुधारणा कशी करायची?
पैसे विनाकारण खर्च होऊ नयेत पण गरजेपेक्षा जास्त, मन मारून बचत सुद्धा होऊ नये कारण त्याचे पण तोटे असतात.
यासाठी काय करावे?
१. तुमच्या पैशांचे नीट नियोजन करा.
तुमचा खर्च जितका महत्वाचा तितकीच बचत सुद्धा.
जर तुमच्या बचत करण्यामागे काही ध्येय नसेल तर तुम्ही बचत केलेले पैसे तुमच्या खात्यात तसेच पडून राहतील.
न ते तुम्ही वापरू शकाल ना त्यांची बचत योग्य प्रकारे होईल.
२. तुम्हाला किती रक्कम बचतीसाठी राखून ठेवायची आहे, त्याची गुंतवणूक नेमकी कुठे करायची आहे याबद्दल तुमच्याकडे एक ठोस ‘प्लॅन हवा.
३. पैसे कमवण्याइतकीच बचत महत्वाची असते आणि बचती इतकेच महत्वाचे असते कमावलेल्या पैशांचा योग्य वयात उपभोग घेणे.
३. तुम्ही बचत करत असाल तर त्यामागचे कारण तुम्हाला माहित हवे, उदाहरणार्थ नवीन गाडी घेण्यासाठी बचत करत असाल तर तुमचा पगार, खर्च, गाडीची किंमत आणि त्यासाठी करावी लागणारी बचत याचा हिशोब करून बचतीची रक्कम ठरवायला हवी.
बचत करायची आहे म्हणून त्यासाठी जास्त पैसे बाजूला ठेवायच्या नादात इतर खर्च कमी करून चालणार नाही.
४. खर्च आणि बचत याचा समतोल हवाच. तसंच स्वतः नवीन गोष्टी शिकण्यासाठी केला गेलेला खर्च, हि स्वतः मध्ये गुंतवणूक असते. त्यामुळे वाढत्या वयात नवीन गोष्टी शिक्षण हे खर्चाकडे पाहून मागे टाकणं, हि आपल्याकडून सरसकट चूक होते.
५. तुमच्या नेहमीच्या खर्च्यांव्यतिरिक्त काही ठरविक रक्कम तुम्ही स्वतःसाठी बाजूला काढून ठेवली पाहिजे,
जीचा वापर तुमच्या हौसेसाठी, छंदांसाठी तुम्ही केला पाहिजे कारण शेवटी तुमचा आनंद हा सगळ्यात महत्वाचा आहे…
आणि तुमच्या पैसे कमवण्यासाठीचे एक महत्वाचे कारण सुद्धा..
या टिप्सचा वापर केलात तर तुम्हाला सुद्धा खर्च आणि बचत याचा सुवर्णमध्य साधता येईल आणि यामुळे तुमची फायनान्शिअल मॅनेजमेंट योग्य पद्धतीने होईल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.