या लेखात वाचा विनाकारण होणारा खर्च कमी करण्याच्या युक्त्या

विनाकारण खर्च करण्याची सवय खूप जणांना असते.

हे खर्च काही मुद्दामहून केले जात नाहीत पण नीट विचार न करणे, पैशांचे आणि खरेदीचे नियोजन न करणे यामुळे आपल्या नकळत आपण विनाकारण जास्तीचे पैसे खर्च करतो.

महिन्याचा हिशोब मांडायला बसलो की आपल्याला या जास्तीच्या आणि फारशी गरज नसताना केलेल्या खर्चाची जाणीव होते.

आणि आपण तेवढ्यापुरते ठरवतो सुद्धा की पुढच्या महिन्यापासून खर्च कमी करायचे पण तसे होत नाही, बरोबर ना?

दर महिन्याच्या शेवटी आपण काहीनाकाहीतरी खर्च गरज नसताना केलेलाच असतो.

असे का होत असेल?

एकतर आपले नियोजन व्यवस्थित नसते आणि दुसरे म्हणजे आपण सवयींचे गुलाम असतो.

पण आपल्या आयुष्यात सेव्हिंग्जला फार महत्व आहे.

तरुणपणी याची जाणीव झाली नाही तर उतारवयात यामुळे पश्चातापाची वेळ येऊ शकते.

सेव्हिंग म्हणजेच पैशांची बचत करण्याच्या आणि तो वाढवण्याच्या दोन पद्धती आहेत.

एक म्हणजे वेगवेगळ्या पण योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे आणि दुसरे म्हणजे आपले खर्च कमी करणे – म्हणजे जास्तीतजास्त पैसे कमवून कमीतकमी खर्च करणे.

पण खर्च कसा कमी करणार?

गरजेच्या वस्तूच तर आपण घेत असतो, कितीही प्रयत्न केले तरी खर्च कमी करता येत नाहीत अशा अनेकांच्या तक्रारी असतात.

माझीही तीच तक्रार होती. महिन्याच्या शेवटी अवाढव्य खर्च पहिला की डोळे पांढरे तर व्हायचेच, आणि पुन्हा हे पण वाटायचं की, अरे, खर्च करताना हे करणं गरजेचेच तर होतं…

पण यावर नीट विचार केला तेव्हा जाणवलं की, यातला निदान १५% खर्च तरी कमी होईल, अशा काही गोष्टी आपण नक्कीच करू शकतो.

त्या गोष्टी कोणत्या ते पुढे वाचा…

१. वर म्हटल्याप्रमाणे आपण सवयीचे गुलाम असतो.

आपल्याला आपल्या वाईट सवयी पटकन सोडता येत नाहीत.

एक मजेशीर उदाहरण द्यायचे झाले तर ज्याप्रमाणे वजन कमी करताना गोड सोडणे हे पटकन जमत नाही त्यासारखेच आपल्याला खर्चाला नाही म्हणणे जमत नाही.

आपण स्वतःला “आजच्या दिवस..” “वन लास्ट टाईम…” असे सांगत राहतो पण असे म्हणून सुद्धा आपली सवय पटकन जात नाही.

पण ही सवय मोडायला हवी. त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला नाही म्हणायला शिकले पाहिजे.

बऱ्याचदा असे होते आपल्याला एखादा खर्च विनाकारण करवासा वाटतो आणि तो विनाकारण खर्च आहे हे आपल्याला पूर्णपणे माहीत असून सुद्धा आपण स्वतःला रोखू शकत नाही.

अशावेळी स्वतःशीच कठोरपणे वागून खर्च टाळता आला पाहिजे. सेल्फ-कंट्रोल सगळ्यात महत्वाचा आहे.

२. आपल्यावर आपल्या नातेवाईकांचा, मित्रमैत्रिणींचा, शेजाऱ्यांचा खूप प्रभाव असतो.

इतरांनी कोणती नवी वस्तू घेतली तर आपल्याला सुद्धा ती हवीहवीशी असते.

हे एकप्रकारचे सोशल प्रेशरच असते. या प्रेशरमुळे आपण विनाकारण घरात गोष्टी साठवून ठेवतो आणि त्याच्यासाठी उगीच पैसे खर्च करतो.

यामुळे सर्वात आधी आपण हे सोशल प्रेशर घेणे बंद केले पाहिजे.

आपल्याकडे एखादी गोष्ट, एखादे फर्निचर, शो पीस नाही कारण आपल्याला त्याची गरज नाही ही इतकी साधी गोष्ट आधी स्वतः मान्य केली तर इतरांना सांगायला सोपी जाते.

३. खरेदीला जाताना आपण सोबत कोण घेऊन जातोय हे फार महत्वाचे असते.

आपल्या सोबत उधळपट्टी करणारी व्यक्ती असली तर तिच्या संगतीने आपण पण विनाकारण खरेदी करतो.

कधी कधी असेही होण्याचीई शक्यता असते की आपल्याबरोबर असलेल्या व्यक्तीने कुठली गोष्ट घेतली की आपल्याला ही घ्यावीशी वाटते.

एखाद्या दुकानात जाऊन, बऱ्याच गोष्टी बघून काहीच आवडले नसले तरी आपण काहीच घेतले नाही तर आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला काय वाटेल असा ही विचार करून आपण गरज नसताना आणि मुख्य म्हणजे आवडलेली नसताना एखादी वस्तू घेतोच.

हे सुद्धा एकप्रकारचे सोशल प्रेशरच आहे. त्यामुळे आपले खर्च, आपली खरेदी याबद्दल मनात कोणताही गिल्ट न ठेवता वागले पाहिजे.

४. मुलांचे अवाजवी लाड पुरवणे हा जरी वेगळा विषय असला तरी तो आपल्या खर्चाशी निगडीत आहे.

मुलांना महागडी खेळणी घेऊन देणे, त्यांचे सगळे हट्ट पुरवणे हे चूक आहेच, पालक म्हणून आपण ते टाळले पाहिजे.

यामुळे आपला विनाकारण खर्च होत असतोच पण मुलांना सुद्धा वाईट सवयी लागतात.

या पेक्षा सुद्धा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलांना त्यांच्या खर्चासाठी बजेट घालून दिले तर आपला खर्च खूप प्रमाणात कमी होईलच शिवाय त्यामुळे त्यांना ही बचतीची सवय लागेल.

५. आपले मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक अनेक ठिकाणी पैसे गुंतवतात, कुठे जमीन घेऊन ठेवतात आणि आपल्याला भेटल्यावर त्या स्कीमबद्दल सांगतात आणि मग आपल्याला सुद्धा त्यात पैसे गुंतवण्याचा मोह होतो.

जर स्कीम चांगली असेल आणि आपल्याकडे गुंतवायला पैसे देखील असतील तर काही प्रश्नच नाही.

पण जर आपण विचार न करता केवळ मित्र म्हणतोय म्हणून एखादी गुंतवणूक करायला आपण तयार होत असू तर ते योग्य नाही.

आपल्याकडून अनवधानाने असे होत असेल तर आपण ते बंद करायला हवे.

कोणी कोणती इन्व्हेस्टमेंट स्कीम सुचवली तर त्याबद्दल नीट माहिती काढून, आपल्याला खरेच त्यातून फायदा होणार आहे का हे पडताळून त्यात गुंतवणूक केली पाहिजे.

६. आपण जेव्हा एखादी गोष्ट घेतो, किंवा आपल्याला एखादी गोष्ट घ्यावीशी वाटते यामागे आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे, का आपल्याला ती वस्तू हौसेसाठी हवी आहे हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.

बऱ्याचदा काही वस्तूंची गरज नसताना देखील केवळ हौसेपोटी आपण वस्तू जमवतो.

अशाने आपला खर्च वाढतो. पण मग असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की केवळ गरजेपुरतेच बघायचे का?

कारण हौसमौज पण तितकीच गरजेची असते, हो न?

म्हणूनच यावर सोपा उपाय म्हणजे आधी सगळ्या गरजांवर खर्च करून मग हौसेकडे वळायचे म्हणजे दोन्हीमध्ये योग्य समतोल राखला जातो.

७. खर्च करताना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा खर्च परवडण्यासारखा आहे का?

हा प्रश्न स्वतःला विचारणे.

भलेही एखाद्या गोष्टीची आपल्याला हौस नसून खरेच गरज असेल सुद्धा पण जर ती गोष्ट आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे तर त्यासाठी अजून काय करता येईल?

गरजेची गोष्ट असल्यामुळे ती खरेदी केलीच पाहिजे मग त्यात काही स्वस्त पर्याय आहे का?

असेल तर तो आपल्याला चालण्यासारखा आहे का?

किंवा अजून थोडे दिवस थांबणे आपल्याला शक्य आहे का?

या सगळ्या शक्यतांचा विचार केला पाहिजे.

पैसे कमावणे जितके गरजेचे आहे तितकीच बचत.. आणि बचत जितकी महत्वाची आहे तितकेच विनाकारण खर्च टाळणे सुद्धा…

या टिप्सचा वापर करून तुम्ही आजपासूनच विनाकारण खर्च टाळायची सुरुवात करू शकता.

https://manachetalks.com/12388/which-is-better-fd-sip-marathi-information-mutial-fund/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।