ऑनलाईन शिक्षण, टीव्ही, मोबाईल यांचा सततचा संपर्क… यातून आपल्या डोळ्यांचे आरोग्य अबाधित कसे ठेवायचे हे समजून घेण्यासाठी हा लेख वाचा आणि आपल्या मित्र परिवाराला स्वतःची काळजी घेण्यासाठी जरूर शेअर करा.
सध्या सर्वच ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. अगदि KG पासून ते PG पर्यंत सर्वच जण ऑनलाईन शिकत आहेत.
कुठेही बाहेर न जाता तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण सद्य परिस्थितीतही शिक्षण सुरू ठेवले आहे. हे खूपच प्रशंसनीय आहे.
सर्व मुले ऑनलाईन लेक्चर्स पाहणे/ऐकणे/प्रोजेक्ट पूर्ण करणे/अनेकविध सेमिनार/वेबिनार पाहून आपले ज्ञान वृद्धिंगत करत आहेत.
तर प्रध्यापक/शिक्षक लोक लेक्चर्स तयार करणे, व्हिडीओ रेकॉर्ड करणे, एडिटिंग करणे यासाठी कंप्युटर आणि मोबाईल चा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत.
या अमर्याद वापरामुळे सर्वात जास्त डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. सतत कंप्युटर/मोबाईल वापरणे, झोपून मोबाईल वापरणे, अंधाऱ्या खोलीत किंवा अगदीच मंद प्रकाशात काम करणे, भूक /तहान/शारीरिक वेग यांच्याकडे दुर्लक्ष करून काम सुरू असते.
यामुळे डोळे कोरडे पडणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे, डोके दुखणे, मान दुखणे, व्यवस्थित पचन न होणे, अम्लपित्त (ऍसिडिटी होणे), मलबद्धता होणे, उत्साह कमी होणे, झोप व्यवस्थित ना होणे, स्वभाव चिडचिडा होणे, धरसोड वृत्ती वाढीस लागणे- ही सर्व लक्षणे निर्माण होतात.
या सर्व लक्षणांवरून मोबाईल आणि कंप्युटर च्या अमर्याद वापराचे घातक परिणाम आपल्या लक्षात येतील. अशा प्रकारच्या सर्व अवस्थांमधील रुग्ण नेत्रतपासणी साठी येत आहेत.
शिवाय हे सर्व होवू नये या साठी कोणत्या प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी ही अनेक जण येत आहेत. त्यामुळे डोळ्यांबरोबर पूर्ण शरीराचा साकल्याने विचार करून उपाययोजना करावी लागते.
या सर्व ऑनलाईन शिक्षणामध्ये डोळ्यांची तसेच सर्व शरीराची काळजी कशी घ्यावी? या साठी लिहिलेला हा लेख.
१. सर्वप्रथम डोळ्यांना योग्य प्रकारे आराम द्या. व्यवस्थित झोप हाच यावरील रामबाण उपाय. रात्रीजागरण आणि दिवसाची झोप टाळावी.
२. डोळ्यांना व्यवस्थित पोषण मिळण्यासाठी संतुलित आहार घ्या. जेवणामध्ये स्निग्ध पदार्थांचा (तूप) वापर जरूर करावा. जंकफूड कटाक्षाने टाळावेत.
३. तहान लागली की पाणी प्यावे. एकाच वेळी जास्त पाणी पिणे टाळावे. तसेच इतर शारीरिक वेगांना (मल-मूत्र) टाळू नये.
४. काम करतांना बसण्याची जागा व्यवस्थित असावी. कंप्युटर डोळ्यांपासून दीड ते दोन फूट अंतरावर डोळ्यांच्या पातळीच्या खाली असावा.
५. काम करताना खोलीमध्ये पुरेसा प्रकाश आणि वायु संवाहन (व्हेंटिलेशन) असावे.
६. कंप्युटर आणि मोबाईल चा ब्राइटनेस व्यवस्थित ऍडजस्ट करून वाचतांना ब्लू लाईट फिल्टर जरूर वापरावा.
७. जर चष्मा असल्यास पुन्हा एकदा नेत्रतपासणी करून ब्लु ब्लॉक कोटिंग चा चष्मा घ्यावा. त्यामुळे डोळ्यांना अतिनील किरणांपासून संरक्षण मिळते.
८. 20-20-20 चा नियम कटाक्षाने पाळावा असे जागतिक दर्जाचे नेत्ररोगतज्ञ सुद्धा सांगत आहेत. काम करतांना दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी डोळ्यांना आराम देऊन बाहेरील 20 फुटावरील वस्तू पाहणे. यामुळे डोळयांच्या पेशींवरील ताण कमी होऊन डोळयांना आराम मिळतो.
९. अधूनमधून डोळयांच्या पापण्यांची उघडझाप करावी. त्यामुळे डोळयांचा ओलावा टिकून राहतो.
१०. अधूनमधून थंड पाण्याने डोळे धुवावेत. तोंडामध्ये पाणी भरून (गाल फुगवून) बंद डोळयांवर साधारण २१ वेळा पाणी शिंपडावे. नंतर तोंडातील पाणी थुंकून द्यावे.
यामुळे डोळ्यातील उष्णता कमी होऊन डोळे तजेलदार होतात. यालाच आयुर्वेदात नेत्रसेचन/नेत्रप्रक्षालन म्हणतात.
११. आयुर्वेदोक्त गंडूष क्रियेचा (Oil Pulling) वापर करावा. सकाळी दात घसल्यावर कोमट तीळतेल तोंडामध्ये साधारण १५ मिनिटे धरून ठेवावे व नंतर ते थुंकून देऊन गरम पाण्याने चूळ भरावी. यामुळे डोळ्यांना विशेष फायदा होतो.
१२. आयुर्वेदोक्त “अंजन” वैद्यकीय सल्ल्याने जरूर वापरावे. त्यामुळे डोळ्यातील विकृत दोष बाहेर येण्यास मदत मिळते.
१३. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी नवीन- नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावेत. त्यामुळे शिकताना आणि शिकवताना लागणारा वेळ वाचून डोळ्यांना आराम मिळेल.
१४. शिकवताना शिक्षकांनी स्वतः ब्रेक घेऊन मुलांना ही ब्रेक घेण्यास प्रवृत्त करावे. मानसिक ताण कमी करण्याच्या इमेजेस, एक्सरसाईझ, व्हिडिओ मुलांना जरूर दाखवावेत.
१५. काम करताना थोडी विश्रांती घेऊन, थोडे जागेवरून उठून पाय मोकळे करावेत. दररोज व्यायाम-योगसने – प्राणायाम यांचा अवश्य अवलंब करावा.
१६. डोळयांसाठी उपयुक्त असे eye exercises (डोळ्यांच्या हालचाली) करावेत. तसेच योगामधील त्राटक क्रिया करावी. डोळयांना आराम देण्यासाठी ‘Palming’ क्रिया करावी.
यामध्ये तळहात एकमेकांवर घासून बंद डोळ्यांवर जास्त जोर न देता ठेवावेत. यामुळे डोळ्यातील रक्ताभिसरण सुधारते.
या सर्व गोष्टींचा अवलंब ऑनलाईन शिकताना किंवा शिकवताना जरूर करावा. त्यामुळे डोळ्यांचे रक्षण होईल. तसेच काही तक्रार असल्यास नेत्ररोगतज्ञांचा सल्ला घ्यावा आणि योग्य वेळी उपचार घेऊन डोळयांचे, शरीराचे आणि मनाचे आरोग्य अबाधित ठेवावे.
लेखन: डॉ. निखिल माळी.
(लेखक आयुर्वेदीय नेत्ररोगतज्ज्ञ असून त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये शोधप्रबंध लिहिले आहेत)
आरोग्याशी संबंधित लेख:
- ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय
- बद्धकोष्ठतेच्या त्रासावर हे अत्यंत गुणकारी घरगुती उपाय करून पहा!!
- सांधेदुखी वर सोपे घरगुती उपाय आणि व्यायाम प्रकार वाचा या लेखात
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.