वजन कमी करायलाच नव्हे तर एकूण आरोग्याच्या दृष्टीनेच जंक फूड, प्रोसेस्ड फूड न खाणे हे चांगले असते.
तुम्ही जर हे खाद्यपदार्थ तुमच्या जेवणातून कमी केले तर बऱ्याच आजारांपासून तुमचा बचाव होतो.
जंक फूडचे प्रमाण कमीत कमी ठेवणे, साखर, मैदा शक्य तितका टाळणे व त्याच्या ऐवजी आहारात जास्तीतजास्त ताज्या भाज्या, फळे, कडधान्य याचा वापर करून हेल्दी स्नॅक्स तयार करून खाणे याला क्लीन ईटिंग असे म्हणतात.
क्लीन इटिंगमध्ये प्रोसेसज्ड फूड, काबोर्हायड्रेट्स जास्त असलेले पदार्थ, दारू हे सुद्धा अगदी १०० टक्के बंद नाही शक्य तितके कमी केले जाते.
एखाद्या आजाराचे पथ्य किंवा वजन कमी करण्याची नितांत गरज असल्याशिवाय काही प्रमाणात अनहेल्दी पदार्थ, जसे की मिठाई, फरसाण, तळलेले इतर पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स हे खाल्ले जातातच.
आपल्या आहारातून अगदी १०० टक्के हे पदार्थ वर्ज करणे तसे शक्य नसते.
फक्त त्याचे प्रमाण किती हवे, ते खायचे ठराविक दिवस, कसे असावेत हे तुमच्या हातात असते.
खरेतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेतच.
तुम्ही कदाचित भरपूर वेळा जंक फूड कमी करायचे असे ठरवले देखील असू शकते पण दर वेळी काही कारणाने तुम्हाला पुन्हा याकडे वळावेच लागते.
असे होऊ नये, तुमचा निश्चय पक्का राहावा यासाठी काय करायचे हे आज या लेखात तुम्हाला समजणार आहे.
मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात आधी तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की हे पदार्थ तुम्ही खाता यामागे सगळ्यात मुख्य कारण आहे की या पदार्थांची तुम्ही खरेदी करता.
ऐन अडचणीच्या वेळेसाठी म्हणून घरात बऱ्याचदा चकली, शेव, फरसाण, चिवडा यासह इतर अनेक अशाप्रकारचे पदार्थ आणून ठेवले जातात.
ऐन भुकेच्या वेळी खायला म्हणून आणलेले हे पदार्थ मात्र घरात आहेत म्हणून उगीच खाल्ले जातात.
मग हे कमी करायला काय करावे? सोपे आहे.
अशा गोष्टींची खरेदी टाळावी. जर तुमच्या घरी फक्त हेल्दी गोष्टीच असतील तर त्यामुळे साहजिकच तुमचे जंक फूड खाणे कमी होईल.
पण मग घाईच्या वेळी जेव्हा जेवण तयार करण्यासाठी वेळ नसेल किंवा खूप जास्त भूक लागलेली असेल तर काय करायचे?
या लेखात अशाच वेळी कोणते पदार्थ तुमच्या उपयोगास येतील याची माहिती दिली आहे.
हे पदार्थ तुमच्या शॉपिंग लिस्टमध्ये असायलाच हवेत.
यामुळे तुम्हाला पटकन खायला काहीतरी सतत उपलब्ध असेल आणि तुमची जेवण तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा एकदम सोपी होईल.
१. सुकामेवा
खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर सुकामेवा सुद्धा शरीरासाठी हानिकारक असतोच पण संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यावर किंवा जर जेवायला उशीर झाला तर पटकन तोंडात टाकायला म्हणून चिप्स, चिवडा यापेक्षा हा अर्थातच एक चांगला पर्याय आहे.
काजू, बदाम, अक्रोड, किसमिस, मनुका, जर्दाळू याची छोटी पाकिटे घरात आणून ठेवावीत जेणेकरून अडचणीच्या वेळी पोटाला आधार मिळतो.
ही सुकामेवा विकत घेताना तो खारवलेला नसावा याची काळजी घ्यावी.
यामुळे शरीरात जास्तीचे मीठ जाणार नाही.
यामध्ये चांगले फॅट (जे आपल्या शरीराला आवश्यक असतात) ते मिळतात.
या व्यक्तिरिक्त सुक्यामेव्यात अनेक व्हिटामिन, मिनरल्स तसेच प्रोटीन्स असतात.
२. अंडी
प्रोटीन खूप जास्त प्रमाणात मिळवण्यासाठी अंडे हा एक उत्तम पर्याय आहे.
यामध्ये व्हिटामिन भरपूर प्रमाणात असतात.
एक अंडे पोटभरीचे सुद्धा होते.
घरात अंडी असतील तर ऐन वेळेच्या भुकेचा प्रश्न उत्भवतच नाही.
पटकन उकडून खाण्यापासून ते अंडे वापरून अनेक हेल्दी रेसिपीज करता येतात.
दुपारच्या जेवणानंतर रात्री जेवेपर्यंत संध्याकाळी जी भूक लागते त्यासाठी अंड्यांचा वापर केला जाऊ शकतो.
तुम्ही जर मांसाहारी असाल तर तुमच्या फ्रीजमध्ये अंडी नेहमी असलीच पाहिजेत.
३. बटाटे
बटाट्यामध्ये पोटॅशीयम जास्त प्रमाणात आढळतात.
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी पोटॅशीयम गरजेचे असते.
बटाटा खाऊन पोट सुद्धा लगेच भरते.
एका मध्यम आकाराच्या बटाट्यात साधारण ७५ कॅलरी असतात.
तुमच्या घरी जर नेहमी बटाटे असतील तर ऐन भुकेच्या वेळी पटकन बटाटा उकडून खाता येतो.
तसेच जेवण तयार करताना जर भाजी कमी पडत असेल बटाटा कोणत्याही भाजीत घालून भाजीचे प्रमाण वाढवता येते.
अडीअडचणीच्या वेळेस घरात बटाटा असला तर त्याचे अनेक फायदे होतात.
तुम्ही जर अंडी खात नसाल तर तुमच्यासाठी बटाटा अजूनच जास्त चांगला पर्याय आहे.
अचानक भूक लागली, तर बटाटा नुसताच बटाटा उकडून त्यावर मीठ तिखट घालून खाता येतो.
काहीतरी चटपटीत खावेसे वाटले तर बटाटा उकडून त्यावर तिखट, मीठ, हिरवी चटणी, चिंचेचे पाणी घालून चाट सुद्धा तयार करता येतो.
४. खजूर
यामध्ये फायबर, पोटॅशीयम खूप जास्त प्रमाणात आढळतात.
पचनशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा खजुराचा उपयोग होते.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर उपयुक्त आहे.
खजुरात साखरेचे प्रमाण जास्त असते यामुळे खजूर खाल्ल्यावर लगेच एनर्जी मिळते.
तुम्हाला साखर टाळायची असेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही खजूर वापरू शकता.
भूक लागल्यावर तोंडात टाकायला सुद्धा खजुराचा फायदा होतो.
घरात लहान मुल असेल तर त्यालाही संध्याकाळी दुधाबरोबर दोन खजूर दिल्यास पोट भरते.
तुम्ही भुकेच्या वेळी जेव्हा सुकामेवा खाल तेव्हा त्यात एखादे खजूर सुद्धा खाऊ शकता.
५. ओट्स
ओट्सचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते तुम्ही या लेखात सविस्तर वाचू शकता.
ओट्स तुमच्या घरात नेहमी का असायला हवेत हे तुम्हाला समजेल.
बहुगुणी ओट्सचे आरोग्यासाठी फायदे
यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतात. ओट्स हे पोटभरीचे अन्न असते.
थोड्या प्रमाणात ओट्स खाल्ले तरी तुमचे पोट जास्त वेळेपर्यंत भरलेले राहते.
भूक लागल्यावर अरबट चरबट खाल्ले जाते त्याला हा एक उत्तम पर्याय आहे.
ओट्स वापरून तुम्ही वेगवेगळ्या टेस्टी रेसिपीज सुद्धा करू शकता. तुमच्या महिन्याच्या शॉपिंग लिस्टमध्ये ओट्स नेहमी असलेच पाहिजेत.
६. दही
दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतात.
भुकेच्या वेळी दही किंवा ताक प्यायल्याने भूक शमते व शरीरावर अतिरिक्त कॅलरीचा मारा सुद्धा होत नाही.
दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस असतात. हे आपली पचनशक्ती सुधरवतात.
घट्ट दही, म्हणजेच योगर्ट फळांच्या गराबरोबर मिक्सर मधून फिरवून स्मूथी सुद्धा करता येते.
ताकात सैंधव मीठ, जिरेपूड घालून मसाला ताक करून पिता येते.
बाजारात वेगवेगळ्या फ्लेव्हरचे योगर्ट सुद्धा विकत मिळतात.
पण यामध्ये जास्तीची साखर असण्याची शक्यता असते त्यामुळे ती टाळण्यासाठी प्लेन योगर्ट किंवा दही घेतलेलेच बरे.
रोज दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
७. डार्क चॉकलेट
कधीतरी गोड खायची खूप इच्छा होते.
पण समजा आठवड्यातील तुमचा एक चीट-डे (म्हणजे अरबट-चरबट खाण्याची स्वतः ला मुभा दिलेला दिवस) झाला आहे, ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणारा गोड पदार्थ खाल्ला आहे तर परत गोड खावेसे वाटल्यावर काय करायचे?
यासाठी पर्याय म्हणून घरात डार्क चॉकलेट आणून ठेवावे.
गोड खायची इच्छा झाली की थोडेसे डार्क चॉकलेट खावे. यामुळे तुमचा मूड सुद्धा सुधारतो.
मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला पर्याय उपलब्ध असतो.
१०० टक्के डायट फूड खाणे अवघड असते पण आपल्या आरोग्यासाठी आपण असे क्लीन इटिंग तर नक्कीच करू शकतो, हो ना?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.