कान दुखणे हे असे दुखणे आहे की त्याची तीव्रता बघणाऱ्याला कळत नाही आणि ज्याला त्रास होत असतो त्याला ते दुखणे सहन होत नाही.
एकदा कान दुखायला लागला की अशा वेदना होतात की खाणे, पिणे, झोपणे अशक्य होऊन बसते.
कानदुखी अगदी तीव्र आणि टोचल्यासारख्या वेदना देणारी असते. कानदुखी होण्याची कारणे अनेक असू शकतात.
कानात खूप मळ साठणे, दातात कीड होणे, सायनस चा त्रास असणे, टॉन्सिल्स वाढणे ही त्यापैकी काही कारणे.
आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे कानाच्या मध्यभागी इन्फेक्शन होणे. ह्यामुळे कानाचा मधला भाग सुजतो, लाल होतो तसेच कानाच्या पडद्यामागे पाणी/पू साठतो आणि तेथे तीव्र वेदना होतात.
कानदुखी बरोबरच इन्फेक्शन मुळे ताप येणे, कमी ऐकू येणे आणि फ्लू सदृश लक्षणे दिसून येतात.
लहान मुलांमध्ये अनेकदा कानदुखी चा त्रास आढळून येतो. सर्दी/पडसे झाले की कानदुखी होऊ शकते.
तज्ञ डॉक्टरांच्या मते मूले किंवा प्रौढ कोणाचाही कान दुखत असताना वेदना कमी करण्याचे प्रयत्न करावेत, एकदम अँटी बायोटिक्सचा मारा करू नये.
कारण बरेचदा अँटी बायोटिक्स चा अतिरेक झाला की कानदुखी त्यामुळे बरी होत नाही. इन्फेक्शन वाढते.
जर कानदुखीचा संबंध दातांच्या किडण्याशी असेल तर अर्थातच दातांच्या डॉक्टर कडे जाणे आवश्यक आहे परंतु जर इन्फेक्शन मुळे कान दुखत असेल तर कानदुखी वर अतिशय प्रभावी ठरतील असे घरगुती उपाय उपलब्ध आहेत.
आपल्या स्वयंपाक घरात हजर असणाऱ्या वस्तु वापरुन आपण कानदुखी वर मात करू शकतो. कसे ते जाणून घेऊया.
कानदुखीवरचे घरगुती उपाय
१. लसूण
लसूण हा कानदुखीवरचा खात्रीशीर उपाय आहे. आपल्या घरात सहज उपलब्ध असणारा लसूण कानाच्या इन्फेक्शनवर प्रभावी आहे.
लसणाच्या २ पाकळ्या ठेचुन २ चमचे मोहोरीच्या तेलात उकळून घ्याव्यात. हे मिश्रण थंड झाल्यानंतर दुखणाऱ्या कानात एकावेळी २ थेंब असे दोन तीनदा घालावे.
ह्यामुळे इन्फेक्शन कमी होऊन कान दुखणे थांबते. असेच मिश्रण लसूण आणि तिळाच्या तेलाचे देखील करता येते. ते देखील कानदुखीवर अत्यंत प्रभावी आहे.
२. तुळस
आयुर्वेदात सांगितलं आहेच की तुळस ही अनेक आजारांवर अत्यंत गुणकारी आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये तुळशीचा वापर केला जातो.
कानदुखी वरही तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या पानांचा रस काढून तो गळून घ्यावा.
तो रस २ ते ३ थेंब दुखऱ्या कानात घालावा. तसेच तो रस खोबरेल तेलात मिसळून कानात घातला तर जास्त उपयोग होतो. हा कानदुखी वरचा अगदी साधा परंतु प्रभावी उपाय आहे.
३. मोहोरीचे तेल
अनेकदा कानात मळ साठल्यामुळे कान दुखण्यास सुरुवात होते. अशा वेळी कानात हेअर पिन पेन्सील इत्यादी घालणे धोकादायक असते त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते.
तसेच इअर बडस मुळे कानातील मळ बाहेर न येता आत ढकलला जाऊ शकतो. कानातील मळ काढून टाकून कानदुखी थांबवण्यासाठी मोहोरीचे तेल उपयुक्त आहे.
एका कानात २, ३ थेंब कोमट मोहरीचे तेल घालून ते तेल फार आत न जाता वरच्यावर राहील अशा रीतीने पडून रहावे. त्यामुळे कानाच्या बाहेरच्या भागातील साठलेला मळ बाहेर निघून येतो व कान स्वच्छ झाल्यामुळे कानदुखी थांबते.
मात्र हा उपाय काळजीपूर्वक तसेच कानाला इजा होणार नाही अशा बेताने करावा.
४. ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर हे अँटी बॅक्टरीयल आणि अँटी फंगल आहे. ते कानाचा पीएच बॅलन्स बदलते त्यामुळे कानात कोणतेही बॅक्टरीया किंवा फंगस जिवंत राहू शकणार नाहीत असे वातावरण तयार होते.
त्यामुळे इन्फेक्शन ची तीव्रता कमी होऊन कान दुखणे कमी होते. ऍपल सायडर व्हिनेगर हे कापसाच्या बोळ्याने अथवा इअर बड ने कानाच्या आतील भागात लावावे.
तसेच तो कापूस किंवा बड तिथेच ५ मिनिटे ठेवावे त्यामुळे ऍपल सायडर व्हिनेगरचा परिणाम होऊन कानाचे इन्फेक्शन कमी होते व कानदुखी थांबते.
५. मीठ
तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही परंतु मीठ देखील कानदुखीवरचे औषध आहे. थोडेसे मीठ मंद आचेवर गरम करून घेऊन त्यात एक इअर बड बुडवावा.
संपूर्ण बड ला मीठ नीट लागेल असे पहावे आणि तो बड १० मिनिटे दुखऱ्या कानात धरून ठेवावा. मिठामुळे कानातील ओलसर द्रव/पाणी शोषले जाते आणि कान दुखणे कमी होते.
परंतु हा उपाय काळजीपूर्वक करावा. तसेच कानात कधीही मिठाचे पाणी घालू नये. बड वरच्यावर कानात धरून काढून घ्यावा. हा देखील कानदुखीवरचा खात्रीशीर उपाय आहे.
कानाच्या वेदनांवर एकदम वेदनाशामक औषधे घेण्यापेक्षा आपल्या आजी आईला माहीत असलेली ही घरगुती खात्रीशीर औषधे जरूर वापरून पहावीत. त्यामुळे नक्की गुण येतो.
याशिवाय जर सर्दीमुळे कान दुखत असेल तर नेसल ड्रॉप्स वापरावे.
विमान प्रवासात कानात दडे बसून कान दुखत असेल तर विशिष्ट प्रकारचे इअर प्लग मिळतात ते वापरावे. अशा प्रकारे कान दुखीवर एकदम अँटी बायोटिक्स न घेता घरगुती उपाय करता येऊ शकतात. ते जरूर करून पहा.
स्वस्थ रहा आनंदी रहा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.