माहित करून घ्या मॉर्फ व्हिडीओ, डॉक्टर्ड व्हिडीओ बनवणारं तंत्रज्ञान ‘डिपफेक’

असं म्हणतात की, आजच्या युगात मानव तंत्रज्ञानाची नवनवीन शिखरे सर करत असताना  इतक्या वेगाने प्रगती करतोय की ही प्रगती आहे अथवा अधोगती आहे यातला फरकच दिसून येत नाहीय. 

तंत्रज्ञान हे एका दुधारी शस्त्राप्रमाणे असते. त्याची एक बाजू जितकी चांगली तितकीच दुसरी बाजू वाईट असते.

अश्याच एका नवीन तंत्रज्ञानाचा धोका सध्या जगभर निर्माण झालाय… आणि अर्थातच हे काळेकुट्ट वादळ भारतात सुद्धा येऊन पोहोचले आहे… डीपफेक!

आपल्याला फेक माहीत आहे, पण डीपफेक हा शब्द नवीनच ऐकत असणार. काय आहे डीपफेक? त्याचे दुष्परिणाम काय आहेत? आणि त्याचा सर्वात मोठा धोका महिलांना कश्याप्रकारे आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात या लेखातून.

डीपफेक म्हणजे खोटे व्हिडीओ अथवा ऑडिओ रेकॉर्डिंग जे अगदी खऱ्याप्रमाणे भासतात. आपण पाहतोय ते खरे आहे की खोटे यातला फरक समजू शकत नाही आणि त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो.

हा धोकादायक प्रकार म्हणजे डीपफेक! यातली सर्वात काळजीची बाब म्हणजे हे डीपफेक व्हिडीओ तयार करण्याचे विविध सॉफ्टवेअर्स आणि ऍप्स कुणीही डाउनलोड करू शकतो आणि वाट्टेल त्याचा/तिचा खोटा व्हिडीओ तयार करू शकतो.

आतापर्यंत डीपफेक हे काही लोकांपुरते मर्यादित होते. त्याचा वापर करून काही अश्या गोष्टी केल्या जात होत्या ज्यामुळे कुणाची तरी बदनामी व्हावी.

एखाद्या महिलेचा खोटा सेक्स व्हिडीओ तयार करणे, एखाद्या पॉर्न व्हिडीओ मधील मॉडेलवर प्रसिद्ध सेलेब्रिटीचा चेहरा लावणे, एखाद्या राजकारणी व्यक्तीच्या तोंडी मजेशीर किंवा तेढ निर्माण करणारी वाक्ये घुसडणे, निवडणुका जवळ आल्यावर असा व्हिडीओ पसरवणे की जेणेकरून उमेदवाराची बदनामी व्हावी, खोटा व्हिडीओ तयार करून ठरलेले लग्न मोडणे वगैरे वगैरे… ही झाली काही सामान्य उदाहरणे.

या अश्या प्रकारांमुळे आतापर्यंत अनेक व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य हरवले आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याच्या निवडणुकीत उभे असणाऱ्या मार्को रुबीओ यांना याचा फार त्रास सहन करावा लागला. त्यानंतर खोट्या व्हिडीओ विषयी स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हंटले की, “एखाद्या देशाला अंतर्गत कमजोर करायचे असेल तर पूर्वी बॉम्बवाहू विमाने, रणगाडे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे यांची गरज असायची.

आता या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात त्यांची जागा नवीन अण्वस्त्रांनी घेतली आहे. फक्त एक व्यक्ती, एक इंटरनेट असलेला कॉम्प्युटर आणि डीपफेक साठी लागणारी सॉफ्टवेअर्स एवढेच संपूर्ण देशाला खिळखिळे करण्यास सक्षम आहे.” आपल्याकडेही काही मीडियाहाऊसकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये ‘डॉक्टर्ड व्हिडीओ’ हा एक शब्द आपण बरेचदा ऐकतो.

डीपफेक कसे काम करते :

‘प्रत्यक्ष पाहून विश्वास ठेवा’ ही आपल्याला दिलेली जुनी शिकवण आहे. पण आता सध्याच्या काळात ही शिकवण कितपत अंगिकारायची याबाबत शंकाच आहे. कारण, इथे प्रत्यक्ष पाहूनही पाहिलेले खरे आहे असे छातीठोकपणे सांगता येत नाही.

माणूस प्रत्यक्ष पाहून विश्वास ठेवण्याच्या ऐवजी विश्वास ठेवून पाहण्यात जास्त फसतो. हीच मानवी प्रवृत्ती डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तींकडून ‘हॅक’ केली जाते.

आपण पाहतोच की या चटकन विश्वास ठेवून पाहण्याच्या प्रवृत्तीमुळे अफवा, फेक न्यूज वाऱ्याच्या वेगाने पसरून भरून न येणारे सामाजिक नुकसान होत असते. काही काळानंतर बातमी चुकीची होती हे समजते पण ते झालेले नुकसान नंतर भरून निघत नाही.

डीपफेक तंत्रज्ञान याच प्रवृत्तीचा वापर कसे करते पाहूया… या सॉफ्टवेअर मध्ये दोन लर्निंग मॉड्युल्स असतात.

एक मॉड्युल हे चेहरा बदलून अथवा आवाज बदलून खोटा व्हिडीओ तयार करते आणि दुसरे मॉड्युल त्या व्हिडीओ मधील खोटेपणाचा शोध घेते. 

जेणेकरून बेमालूमपणे फेक व्हिडीओ तयार होईल. जर खोटेपणा आढळून आला तर पाहिले मॉड्युल त्यात सुधारणा करून परत नवीन व्हिडीओ तयार करते.

हे चक्र तोपर्यंत चालते जोपर्यंत दुसऱ्या मॉड्युलला खोटेपणा दिसू शकतो. ज्या वेळी पूर्णतः खरा वाटावा असा व्हिडीओ तयार होतो आणि दुसरे मॉड्युल त्यातला खोटेपणा ओळखू शकत नाही तेव्हाच व्हिडीओ आउटपुट म्हणून बाहेर येतो.

आहे ना गंभीर बाब? हे असे व्हिडीओ शक्यतो ज्यांची छबी नेहमी टीव्हीवर अथवा सिनेमात दिसते त्यांचे जास्त निर्माण होतात. कारण त्यांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असल्याने लोकांना त्याची सवय झालेली असते.

सिनेमातील नट नट्या आणि राजकारणी व्यक्ती या डीपफेकच्या मोठ्या प्रमाणात शिकार आहेत.

आता आणखी एक चिंताजनक बाब… हे डीपफेक बनवणारे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स अगदी मोफत उपलब्ध असून हे कुणीही डाउनलोड करून वापरू शकतो.

वापरण्यासाठी हे तितकेसे सोपे नसले तरी थोडाफार टेक्निकली जाणकार व्यक्ती हे आरामात शिकून घेऊ शकतो आणि वाटेल त्याचा, वाटेल तसा व्हिडीओ तयार करू शकतो.

उदाहरणार्थ, रस्त्याने दोन व्यक्ती सहज चालत जात असतील तर त्यांचा व्हिडीओ काढून त्यांना आगीमध्ये अथवा पाण्यावर चालताना दाखवता येऊ शकते अथवा त्यांच्या हातात बंदुक, तलवारी सारखी शस्त्रे देता येतात.

डीपफेक व्हिडीओ ओळखणार कसे?

डीपफेक ओळखणे हे अत्यंत कर्मकठीण काम आहे. पण काही गोष्टी निरखून पाहिल्या तर थोड्या प्रमाणात ओळखता येऊ शकते. जसे की डोळ्यांच्या पापण्यांची अनैसर्गिक हालचाल, प्रकाश आणि सावल्यांची बदललेली जागा, वगैरे.

परंतु, फारच थोड्या व्हिडीओ मध्ये या चुका आढळून येत असल्याने व्हिडीओ खरा की खोटा हे ओळखणे सध्या डोळ्यांनी अशक्य आहे.

या तंत्रज्ञानाला ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचीच मदत घ्यावी लागते. सध्यातरी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर भरवसा ठेवणे एवढेच आपल्या हाती आहे.

या फेक व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला तर प्रत्येक गोष्टीवर अविश्वास ठेवण्याची मानसिकता तयार होईल हा धोकाही आहेच.

आता सर्वात महत्वाचे, कुठलेही तंत्रज्ञान भारतात येण्यासाठी काही अवधी जावा लागतो. या डीपफेकने पाश्चात्य देशांमध्ये धुमाकूळ घातलाय आणि हे आता भारतात दाखल झाले आहे.

भारतातील काही विकृत बुद्धीचे लोक नेहमीप्रमाणे याचाही गैरफायदा घेणार हे निश्चित आहे. आपल्या देशात अफवा आणि बदनामी पसरण्याचा वेग इतर देशांपेक्षा जास्तच असल्याने या डीपफेकचे नुकसानदायक परिणामही जास्त होणार हे निश्चितच सांगता येऊ शकते.

तर महिलांनी आपले फोटो, व्हिडीओ सोशल मीडिया वर अपलोड करण्याआधी थोडासा विचार केलेला बरा राहील. आपला फोटो अथवा व्हिडीओ कोण डाउनलोड करून त्याचा कसा वापर करेल हे सांगता येत नाही.

आणि एकदा बदनामी झाल्यानंतर कितीही पश्चाताप केला तरी त्याचा फायदा नसतो हे आपल्याला माहीत आहेत.

दुसऱ्या बाजूने, जर आपल्यापैकी कुणाला असे व्हिडीओ फेसबुक, व्हाट्सअप्प वगैरे माध्यमातून येत असतील तर आपण ते फॉरवर्ड न करता तात्काळ डिलीट करणे हे समाजहितासाठी एक चांगले पाऊल ठरू शकते…

लक्षात ठेवा, बदनामी करणाऱ्यापेक्षा ती थांबवणाऱ्यामध्ये खरा ‘पुरुषार्थ’ आहे.

वाचण्यासारखे आणखी काही….

प्रासंगिक
आर्थिक
पालकत्व

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।