सकाळचा सहाचा गजर झाला तसा तिने गजर बंद करून आता उठायलाच हवं म्हणून उठली, पण डोकं खूप ठणठणत होतं.
पुन्हा झोपावे का? हा प्रश्न मनात आला पण “नाही…! उठायलाच हवं कारण ऑफिस ला जायचं..” या विचाराने डोळ्यांवर आलेली झापड उडाली.
काय रोज रोज जायचं अगदी वैताग येऊन गेलाय.. बाकी लोकं मात्र या लॉकडाऊन मध्ये मस्तपैकी घरी आहेत आणि आम्हाला रोजच जावं लागतं. रोज रोज संध्याकाळी डोकं धुवून धुवून आता दुखायला लागलंच..
एकदम डोक्यात कळ आली तसं तिने डोकं दोन्ही हातानी दाबून धरलं. आता पेनकीलर घ्यावीच लागेल पण उपाशीपोटी कशी घ्यायची हा प्रश्न. म्हणून ती उठली, फ्रेश झाली आणि चहा ठेवला.
चहा सोबत ब्रेड भाजला आणि खाऊन गोळी घेतली.. थोड्या वेळाने बरे वाटायला लागलं.
असंच किती दिवस चालणार का कुणास ठाऊक? ही जीवघेणी स्वच्छता करुन करुन अगदी कंटाळा आलाय.. रोज रोज तेच तेच….
आज वेळ झाल्यामुळे तिने प्राणायामही केला नाही.. वैतागून पटापटा कामं करुन आंघोळ वगैरे उरकून स्वयंपाकाला लागली कारण हल्ली या कोरोनामुळे भीती वाटत होती आणि ती तर लॅबमध्ये काम करणारी…!
रिनाचे कुटुंब चौकोनी.. दोन मुले आणि नवराबायको…. एका मुलाचे लग्न झाल्यामुळे ते बाहेर गावी होते… रिना ही मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होती तर तिचे पती प्रायव्हेट प्रॅक्टिशनर म्हणजेच दोघेही आरोग्य विभागात….
दुसरा मुलगा बाहेर ठिकाणी शिक्षणासाठी होता. अचानक हे कोरोनाचे सावट आले. सर्व जागच्या जागी खिळून गेले..
माणसांची साखळी तोडायची म्हणून सर्वत्र प्रयत्न.. बाकी लोकांना कधी न मिळणाऱ्या सुट्या या सक्तीच्या होऊन गेल्याय..
घरात बसून जनता कंटाळली.. काही तर डिप्रेशन मध्ये सुद्धा जायला लागलीत.. कारण कोरोना वाढतच असल्यामुळे लॉकडाऊन सुद्धा वाढतच आहे..
अशातच रिनाचा लहान मुलगा लॉकडाऊन जाहीर होताच घरी आला.. रिनाचे ऑफिस सुरूच होते आणि तिचे मिस्टर क्लिनिक बंद असल्यामुळे घरीच होते पण अचानक त्यांना तीन चार दिवसातच क्लिनिक सुरू करण्याचे आदेश मिळाले.
नाही केले तर रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार त्यामुळे त्यांना जावेच लागत होते इकडे रिनाचे ऑफिस म्हणजे लॅबमधील ऍडमिट असलेल्या रुग्णाचे आलेले नमुन्याची चाचणी करणे.
भरिस भर म्हणजे त्याच विभागात कोविड-19 चाचणीची सुरुवात झाली होती.. मग सर्व टेक्निशियनची सॅम्पल कलेक्शनला मदत म्हणून कुठेही (क्वारंटाईन सेंटर) ला जाण्याकरिता सर्वांच्या नावाची लीस्ट बनली त्यात रिनाचे सुद्धा नाव..
तिची चिडचिड सुरू झाली कारण सर्व संताप जनक घडत होते.. हे आता तिथे पाठविण्याचे माझे वय आहे? हे बॉस ला समजत नाही का?
आणि वरून तिला एलर्जी.. सर्दीचा त्रास रहायचा पण बॉस मानायला तयार नाही.. आणि विशेष म्हणजे वय…
कारण आता तिला फक्त 2 वर्ष रिटायरमेंटला होते.. वाटत होते सोडून द्यावी नोकरी कारण काम पुरतं पण बॉस चे हे असे जीवघेणे निर्णय नकोय…
पण रोजचे काम तर होतेच त्यासाठी रोज बाहेर पडावेच लागत होते.. रोजचेच ऑफिस एकही दिवस सुटी नाही. बाहेर निघायचं म्हटलं की या विचारांनीच कसंतरी व्हायला लागतं.
विशेष म्हणजे वापस आल्यानंतर आधी सर्व टिफिनबॅग, पर्स, चष्मा, गाडीची चावी, कपडे सॅनिटाईझ करून आंघोळ हे सर्व करता करता इतका वेळ होऊन जातो की घरात आल्यानंतर कुठलंही काम करावेसे वाटत नाही पण नाईलाजाने करावच लागत होतं परत दोघेही बाहेर जाणारे असल्यामुळे याला हात लावला, हातच धुतले नाहीत, सॅनिटायझरच लावले नाही म्हणून घरात सारखे नवरा बायकोचे वाद..
सारखं मनावर दडपण ठेऊन वागणं.. नवरा पेशंटच्या सानिध्यात कारण पेशंट निगेटिव्ह आहे की पॉझीटीव्ह हे माहिती नसतं आणि रिना डायरेक्ट जरी नसली तरी सारखी त्याच वातावरणात रहात होती..
तिच्या कलीग्स कलेक्शन ला आणि कोविड लॅब मध्ये पण ड्युटी त्यामुळे त्यांच्या सतत संपर्कात आणि संशयित रुग्णाचे नमुन्याची चाचणी करणे, दिवसभर लॅब मधील काम आणि हॉस्पिटलमधील येणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात सतत येत असल्यामुळे सारखं मनावर दडपण असते आणि तिला सहजच वाटायला लागले, “मला काही झालं तर…” कारण या जॉबमध्ये खूप रिस्क आहे..
आणि तिचे या आधीचे बरेच अनुभव होते त्यावेळी सुद्धा तिने कसे कसे दिवस काढलेत आजही आठवलं की अंगावर शहारे येतात..
आजही तिची इच्छा कोविड मध्ये काम करण्याची आहे पण तब्येत नाजूक असल्यामुळे ती स्वतःलाच दोष देते.
‘आरोग्य कर्मचाऱ्यांना आज सगळीकडे देवदूत म्हंटल जातं, पण माझ्या या विचारांनी मी या भावनेच्या योग्यतेची नाही का?’ या विचारांनी पुन्हा ती अस्वस्थ सुद्धा होते. पण वास्तव हे आहे कि आज सगळ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांची हि अवस्था झाली.
कारण हा कोरोना इतका संसर्गजन्य आहे की, कुणीही इथे काम करण्यास सबबी सांगतात.. नाईलाजानी करावं लागतं ते वेगळं..
त्यांच्या दोघांपैकी कुणीतरी व्हायरस वाहक असू शकतं आणि घरात मुलगा.. लगेच मनात शंकेची पाल चुकचुकायची की आम्हाला काही झाले तर मुलाला कुठल्या क्वांरटाइन सेंटर ला नेतील?
खरं म्हणजे हा विचार करायला नको पण कितीही टाळले तरी मनात येतोच कारण घरी सर्व सोयी, स्वच्छता असून तिथे त्या ठिकाणी जायचं हे आठवूनच मन चलबिचल व्हायला लागतं त्यामुळे घरात सारखं टेंशन, चिडचिड, अस्वस्थता मनात घर करून रहाते..
तेच तेच विचार मनात डोकावतात परत संध्याकाळी मोठ्या मुलांचा फोन सारखी विचारपुस, बोलता बोलता वेळ होऊन जातो कारण दिवसभर त्यांचंही काम सुरू असतं.. रिनाला त्यांचीही काळजी कारण दोघंच घरात आणि तेही मुंबईला..
त्यामुळे तिच्या जीवात जीव नव्हता सारखं त्यांना सांगणं असं नका करू, तसं करा वगैरे… तिची नीट झोप पण होत नव्हती वरून थकवा…
आईचा झालेला त्रागा बघून तो इकडे येण्यासाठी बघत होता पण तिने सरळ सांगितले, “आहे तिथेच घरात रहा बाहेर निघू नका.. मी माझं मॅनेज करून घेईल” कारण ते इथे आले की, आमच्यापासूनच त्यांना धोका आणि एकत्र म्हटले की परत बाकी गोष्टी..
कारण सर्वांचेच ऑफिस, त्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ हाताशी कामवाली बाई नाही. मग काय तर अजूनच छुप छुप दुसरं महायुद्ध होईल की काय ही भीती कारण हल्ली रिना खूप चिडचिड करायचीय..
एकत्र असलं की भांड्याला भांडं लागायची भीती कारण या लॉकडाऊनची काही शाश्वती नव्हती.. तसं आजपर्यंत काही घडलं नव्हते कारण दोघी सासू सुना छान रहात होत्या..
या कोरोनानी आता वेगवेगळं सुद्धा रहायला शिकवलं.. अगदी सोशलच काय घरात सुद्धा अंतर ठेऊन राहायचं म्हणून सर्वांनी सक्तीने वेगवेळ्या रूममध्ये राहून वापरण्याचे जिन्नस अगदी स्वतंत्र करून घेतले. जणू या कोरोनाने आपल्याच घरात वेगळाचार करून राहायची सवय आपल्याला लावून टाकली. आता घर मोठं असेल तर ठीक नाहीतर, ती हि समस्या..!
डोकं, नाकतोंड बांधून स्वयंपाक करुन ठेवत होती.. त्यांनी घरीच असे विलगिकरण करून घेतले पण तिला भीती वाटते मुलाच्या डोक्यावरून हात फिरवावा की नाही हा विचार करूनच मन दुःखी होते.
हे असंच किती दिवस चालणार कोण जाणे? कुटुंबासाठी किती तडजोड करावी लागत होती तिला…! या कोरोनानी काय काय शिकवलं.
दिवसेंदिवस कोरोनाच संकट वाढतच आहे पूर्ण जगाला त्यानी विळखा घातला हा घट्ट झालेला विळखा केव्हा सैल होणार कुणास ठाऊक?
Image Credit: health.com
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.