सीमा तिच्या मुलीला सारखीच सांगत असते, “मनाली, जेवणाआधी हात धुवून ये”. अर्पिताचा छोटा मुलगा एक दिवस खूप रडत होता, नीट जेवत नव्हता, सारखं पोट दुखायचं त्याचं. अर्पिताला काही सुचत नव्हतं. योग्य वाटतील ती औषधं देऊन बघितली.
पण फारसा फरक पडत नव्हता. नेहा म्हणाली तिच्या छोट्या मुलीला खाल्लेलं नीट पचतच नाही. चौदा वर्षांच्या रोहनचं पोट दुखत होतं. डॉक्टरांनी तपासलं आणि म्हणाले, “याला युरीन इन्फेक्शन झालंय”.
एकंदर या सगळ्या घटनांवरून आपल्याला काय लक्षात येतं, तर लहान मुलांमधे पोटाचा त्रास व्हायला एखादं मूळ कारण असणार. आणि ते आहेच.
ते म्हणजे लहान मुलांना हमखास पोटात होणारे जंत, कृमी किंवा तत्सम किडे.
ते मुलांना सहन न झाल्यामुळे नीट जेवत नाहीत, चिडतात, रडतात.
त्यांच्या रडण्याचं कारण पालकांना लगेच लक्षात येईलच असं नाही. म्हणून घाबरून न जाता पोटाचा काही त्रास होतोय का ते बघावं.
लहान मुलांना शौचास झाल्यावर त्यात पांढरे धाग्यासारखे किडे दिसले तर मुलाला पिनवार्मचा (pinworms) त्रास होतोय, म्हणजे जंत झालेत हे लक्षात घ्यावं.
शौचाच्याजागीसुद्धा असे किडे दिसून येतात. अशा वेळी काही घरगुती उपाय करून हा त्रास कमी करता येतो.
पिनवार्म हे परजीवी आणि पांढरट रंगाचे असतात आणि आतड्याच्या भागात त्यांचं इन्फेक्शन दिसून येतं.
वेळीच त्यावर उपचार केले नाही तर पुढे मुलांना युरीन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
पिनवार्म म्हणजे काय??
जठराग्नी मंदावल्यामुळे पिनवार्म होऊ शकतात. लहान मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. मोठ्या माणसांमध्ये हे प्रमाण कमी होतं.
पिनवार्म होण्याची कारणं….
१. दुषित पाणी हे पिनवार्म होण्याचं मोठं कारण आहे. पिनवार्म परोपजीवी असतात आणि ते दूषित पाण्यात नक्कीच असू शकतात.
असं पाणी प्यायल्याने लहान मुलांच्या आतड्याला इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे पोट दुखणं, शौचाच्याजागी खाज येणं, लाल चट्टे पडणं हे परिणाम होऊ शकतात.
२. काही मुलांना माती खाण्याची सवय असते. त्यामुळे जंतू पोटात जाऊन इन्फेक्शन होऊ शकतं. परिणामी पोट दुखणं, उलटी होणं हे प्रकार होऊ शकतात.
३. लहान मुलांची अंघोळ नियमीत होत नसेल आणि कपडे अस्वच्छ असतील तर पिनवार्मची समस्या होऊ शकते.
पिनवार्म झाल्याची लक्षणं :
पोट दुखल्यानं लहान मुलं रडतात. पण पोटदुखीचं कारण पिनवार्मच असेल हे ओळखण्यासाठी काही लक्षणं बघावी लागतात.
१. शौचाच्याजागी खाज येणं.
२. शौचाच्याजागी लाल चट्टे पडणं.
३. अचानक पोट दुखणं.
४. लहान मुलांची चिडचिड होणं.
५. उलटी होणं.
६. युरीन इन्फेक्शन होणं.
पिनवार्म होऊ नये म्हणून काय करता येईल??
पिनवार्म म्हणजे काय ते आपल्याला समजलं. Prevention is better than cure. ते होऊच नये म्हणून काय करता येईल ते आता पाहू…
१. पिनवार्म होऊ नयेत म्हणून आहारात नियमितपणे कोबी आणि गाजराचा समावेश करावा. या भाज्यांमध्ये गंधकाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पिनवार्म नष्ट व्हायला मदत होते.
२. घरात अँटिबायोटिक साबणाचा वापर करावा.
३. फळं, भाज्या बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून घ्याव्या.
४. मांसाहार शक्यतो टाळावा.
५. स्वयंपाक करण्यापूर्वी, जेवणाआधी हात स्वच्छ धुवावे.
६. लहान मुलांना जंकफूड चॉकलेटसारखे पदार्थ खायला देऊ नयेत.
७. हातापायाची नखं वेळच्यावेळी काढून हात पाय स्वच्छ ठेवावे.
पिनवार्मसाठी काही घरगुती उपाय :
पिनवार्मचा त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही घरगुती इलाज करता येतील.
१. लसूण :
पिनवार्मच्या नियंत्रणासाठी लसूण हा एक उत्तम उपाय आहे. लहान मुलांना हा त्रास होत असेल तर लसणाच्या तीन चार पाकळ्या सोलून थोड्या ठेचून घ्याव्या. हा लसूण मुलांच्या शौचाच्या जागी १५ मिनीटांसाठी ठेवून नंतर ती जागा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. असं दिवसातून दोन तीन वेळा करावं.
२. व्हिनेगर :
तीन कप पाण्यात अर्धा कप व्हिनेगर घालावं. मूल वॉशरूमला जाऊन आल्यावर त्याचं गुप्तांग या पाण्याने स्वच्छ करावं. एक गोष्ट लक्षात ठेवावी की पाणी न मिसळता व्हिनेगरचा वापर अजिबात करू नये. नाहीतर त्वचेला त्रास होऊ शकतो.
३. एरंड आणि खोबरेल तेल :
एरंड तेल आणि खोबरेल तेल एक एक चमचा समप्रमाणात एकत्र करावं. ते थोडंसं कोमट करून लहान मुलांच्या गुप्तांगावर लावावं. त्यामुळे त्या जागेची खाज कमी होते.
४. लवंग आणि खोबरेल तेल :
एक चमचा खोबरेल तेलात एक दोन चमचे लवंग तेल मिसळावं. रात्रभर ते गुप्तांगावर लावून ठेवावं. लवंगेच्या तेलात अँटिसेप्टिक आणि अँटिमायक्रोबॅक्टेरियल घटक असतात. पिनवार्म नियंत्रणात आणण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.
याव्यतिरिक्त जर शौचात मोठ्या आकाराचे किडे दिसले, गुप्तांगावर लाल चट्टे येऊन खाज येत असेल, दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस पोट दुखत असेल, जुलाब होत असतील, अचानक वजन कमी झालं, युरीन इन्फेक्शन झालं तर वेळ न घालवता त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप चांगली माहीती आपण लोकास पूर्वत आहात त्याबद्दल धन्यवाद / तुम्ही आमचा ब्लॉग ही पाहू शकतात आम्ही रोज भर्ती/नोकरी च्या जाहिरती प्रकाशित करत असतो