करोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी मास्क हे सध्या आपले शस्त्र बनले आहे. कुठेही बाहेर जाताना नाक आणि तोंड पूर्णपणे झाकून घेईल असा उत्तम प्रतीचा मास्क लावणे हे सध्या अनिवार्य झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटना, मोठमोठे डॉक्टर हे गर्दीच्या ठिकाणी जाताना, कोणालाही भेटताना मास्कचा वापर आवर्जून करा असे सांगत आहेत.
परंतु नुसते मास्क वापरणे पुरेसे नाही. आपण कोणता मास्क वापरतो, कशा पद्धतीने वापरतो हयाकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.
अयोग्यरित्या वापरलेला मास्क आपल्याला करोनापासून वाचवू शकेल का नाही ते सांगता येणार नाही, पण इतर काही श्वसनाचे आजार मात्र नक्की देऊ शकतो. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
१. करोनापासून संरक्षण मिळावे म्हणून मास्क वापरणे आवश्यक आहे परंतु जर तोच तोच मास्क पुन्हा पुन्हा वापरला, स्वच्छ केला नाही तर अशा घाणेरड्या मास्कमुळे आपल्याला वेगवेगळे श्वसनाचे विकार, घसा खवखवणे, निरनिराळे पोटाचे विकार अशा समस्या उद्भवू शकतात.
२. मास्क स्वच्छ असताना तो लावूनही श्वास घेण्यास काही अडचण होत नाही परंतु जर मास्क अस्वच्छ असेल, त्याची छिद्रे घाणीने भरलेली असतील तर मात्र अशा मास्कमधून श्वास घेण्यास अडचण येऊ शकते.
गुदमरल्यासारखे वाटून शरीरातील ऑक्सिजनची लेवल कमी होऊ शकते. हे अतिशय धोकादायक आहे.
३. वारंवार अस्वच्छ मास्क वापरत राहिलो तर त्या मास्कच्या छिद्रात अडकलेले जंतु शरीरात प्रवेश करून आपल्या फुफ्फुसांना संसर्ग देऊ शकतात. दुर्लक्ष झाल्यास ह्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
कोणता मास्क किती दिवस वापरावा?
१. कापडी, पुन्हा वापरता येणारा मास्क जास्तीत जास्त ३ महिने वापरावा. त्यानंतर तो बदलावा.
२. N ९५ हा मास्क पुन्हा वापरता येणारा असेल तर तो जास्तीत जास्त २ महिने वापरावा.
३. N ९५ डिस्पोजेबल मास्क दर दिवशी बदलावा.
४. सर्जिकल डिस्पोजेबल मास्क दर ३, ४ तासांनी बदलावा.
कोणताही पुन्हा वापरण्याचा मास्क योग्य प्रकारे स्वच्छ केल्याशिवाय वापरू नये. तसेच खूप जास्त काळ तेच तेच मास्क वापरण्याचा अट्टाहास करू नये. वेळोवेळी नवा मास्क वापरावा.
नवीन मास्कसाठी होणारा खर्च हा कोणत्याही आजारपणापेक्षा कमी आणि परवडणारा नक्कीच असतो.
मास्क स्वच्छ कसा करावा?
आपण जर पुन्हा वापरता येण्याजोगा कापडी मास्क वापरत असू तर त्याची स्वच्छता फार महत्वाची आहे.
कापडी मास्क वापरुन झाल्यावर नुसता धुणे पुरेसे नाही. मास्क कमीतकमी १० मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवावा.
त्यानंतर तो साबणाने स्वच्छ धुवून उन्हात वाळवावा. वाळलेला मास्क जिथे वारंवार हात लागणार नाही अशा स्वच्छ ठिकाणी ठेवावा.
धुतलेला मास्क हाताळताना व लावताना हात सॅनीटाईझ केलेले असावेत. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र मास्क असावेत. एकमेकांचे मास्क वापरणे अत्यंत धोकादायक आहे.
सध्या आरोग्य यंत्रणांनी तीन लेयर असणारे मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे, तसेच हे देखील सांगितले आहे की अस्वच्छ मास्क वापरणे हे मास्क न वापरण्यापेक्षा सुद्धा जास्त धोकादायक आहे.
त्यामुळे लेखात सांगितलेल्या माहितीचा उपयोग करून योग्य आणि स्वच्छ मास्क वापरा. आणि करोनापासून आणि खराब मास्कमुळे उद्भवणाऱ्या इतर रोगांपासून स्वतःचे रक्षण करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.