मुलांची झोप नीट होत नाही ही चिंता सतावत असल्यास ह्या ७ ट्रिक्स करून पहा.

झोप हि सगळ्यांची अत्यंत आवडीची क्रिया.. विज्ञान सांगते प्रत्येक व्यक्तीला दिवसभर प्रसन्न वाटण्याकरता रात्रीची किमान ८ तास झोपेची आवश्यकता असते.

नाहीतर दिवसभर चीड चीड, डोकेदुखी, आळस चढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात..

लहान मुलांना, वयात आलेल्या मुलांना आणि तरुणांना एकूणच सगळ्यांना उत्तम झोपेची नितांत आवश्यकता असते. त्यातही लहान मुलांनी किमान ९ ते १० तास झोपणे उत्तम.

कारण हल्लीच्या मुलांना खूप जास्ती मेहनत घ्यावी लागते.. शाळांचे वाढलेले तास, अभ्यासाचे तास, खेळ, क्लासेस, इतर ऍक्टिव्हिटीज ह्यामध्ये मुलांची खूप एनर्जी वापरली जाते.. जी योग्य आहार आणि शांत झोप ह्यानेच भरून निघू शकते..

ज्या मुलांची नीट झोप होत नाही त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. अभ्यासात, वर्गात लक्ष न राहणे, खेळात उत्साह न वाटणे असे त्रास होऊ शकतात..

इतकेच काय तर तरुण मुले सुद्धा anxiety, चिडचिड, शीघ्रकोप ह्या समस्यातून जातात.. वयाच्या एकविशी बावीशीतच कार्यक्षमता निम्म्याच्या वर येऊन पोचते. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर ह्याचा वाईट परिणामही होतो.

आपल्या मुलांची अशी अवस्था कोणत्या पालकांना आवडेल..?? मुलांची झोप होऊन ते दिवसभराचे काम करण्यास ताजेतवाने राहावेत.

त्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून आई वडिलांना कायम काळजी असते. आणि ह्या सगळ्या साठी सगळ्याच वयोगटातल्या मुलांना साऊंड आणि क्वालिटी स्लीप म्हणजेच शांत आणि उत्तम झोप लागलीच पाहिजे.

त्यातही आजकाल बऱ्याच मुलांना रात्री ऑनलाईन गेम खेळण्याची सवय आल्याची बऱ्याच पालकांची तक्रार असते.

हल्लीच्या लाईफ स्टाईलमुळे झोपेकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष व्हायला लागले आहे.. जी एक धोक्याची घंटा आहे आणि तिच्याकडे कानाडोळा करता कामा नये.. त्यामुळे खालील काही ट्रिक्स तुम्ही आजपासूनच सुरू करा..

१. मुलांना टाईम टेबल वर काम करण्यास शिकवा:

सुट्टीचा दिवस मुलांचा.. मात्र एरवी रुटीन असले पाहिजे. मानवी स्वभावाला रूटीनची सवय नसल्यास तो माणूस खुशाल चेंडू सारखा वागतो..

त्यामुळे मुलांना अगदी बाळ असल्यापासून रात्री ठराविक वेळेत दिवे मालावून झोपण्याची सवय लावा..

लहानपणी मुले ऐकतात मात्र मोठी झाल्यावर त्यांना शिंग फुटतात हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे त्यांना एक छानसे रूटीन लावून द्या.. त्या रुटीन मध्ये वेळेला महत्व असले पाहिजे.

समजा शाळेला जायला सकाळी ६:३० उठावे लागत असेल तर किमान ९:३० तास झोप झाली पाहिजे.. मग जर रात्री ९ वाजे पर्यंत जेवण सुद्धा आटोपले नसेल तर मुलांना दोष देण्यात काय अर्थ आहे..??

आधी आपलेही रूटीन छान सेट करा. संध्याकाळी ७:३० पर्यंत मुलांचा अभ्यास आणि खेळ झाला पाहिजे..

म्हणजे पुढचे २ तास ते कुटुंबाबरोबर घालवतील.. जेवण वेळेत करून, दात ब्रश करून साडे नऊला रोज झोपी जातील.. मग सकाळी साडे सहाला उठणे त्यांना ‘नक्को’ वाटणार नाही.

आणि दिवसही आनंदात जाईल.

वेळ पाळायची सवय आयुष्यभर कामी येते हे लक्षात ठेवा.. लहानपणीच नाही तर मोठेपणी अगदी म्हातारवयापर्यंत मुले वेळेची पक्की होतील.. आणि त्याचे श्रेय पालक म्हणून तुम्हाला मिळेलच..

२. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा:

सगळ्या पालकांची एक तक्रार असते. माझी मुले तासंतास टीव्ही, मोबाईल किंवा कॉम्प्युटर वर वेळ घालवतात.. ऐकतच नाहीत..

पण हा विचार करा त्यांना ह्याची सवय लावली कुणी..? आपल्याला मुलांनी डिस्टर्ब करू नयेत म्हणून आपणच त्यांना मोबाईल हातात घ्यायला शिकवला.

तुमच्या लहान बाळाला भरवताना त्याच्या हातात मोबाईल देता का तुम्ही?

टीव्हीवर कार्टून लावून देऊन एकट्यालाच खेळायला सोडले.. मग आता ही सवय लागल्यावर लगेच कशी सुटेल..??

हा स्क्रीन टाईम अतिप्रमाणात वाढला तर तो डोळ्यांना इजा पोहचवतो आणि मेंदूला निष्क्रियता आणतो हे माहीतच आहे आपल्याला. पण शरीरातील ते हार्मोन्स (मेलॅटोनिन) जे झोपेचे कारक असतात त्यांनाही डॅमेज करतो.

त्यामुळे आपल्या मुलांच्या चांगल्यासाठी काही कठोर पावले उचलावीत लागतात.. स्क्रिन टाईम चा काही विशिष्ट काळ ठरवावा..

झोपायच्या आधी तर नकोच.. दिवसभरातून दोन तासांच्या वरती स्क्रीन टाईम देऊ नये. हवे तर हा फॅमिली नियम बनवा.. आणि तुम्ही सुद्धा आचरणात आणा..!!

https://manachetalks.com/11703/how-to-take-care-of-eyes-while-learning-online-marathi/

३. जंक फूड ची मात्रा खाली आणा:

आपण सगळेच जंक फूडच्या आहारी गेलो आहे. आणि हि सवय सगळ्यांना सगळ्याच दृष्टीने घातक आहे. ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा वाढणे हा मोठा धोका ह्या जंक फूडमुळे होत आहे..

चटकदार आणि दिसायला भारी असणाऱ्या ह्या जंक फूड मध्ये कित्येक शरीराला हानिकारक घटक असतात. जे आपली तब्येत बिघडवायला कारणीभूत असतात..

त्यामुळे एकंदर शारीरिक सुदृढता ठेवायला आणि झोपेची तक्रार दूर ठेवायला ताजे आणि सकस अन्न रोज खाल्ले पाहिजे.

मुलांना काही चवींची सवय लहानपणापासून सुरू ठेवा.. म्हणजे सगळ्या प्रकारच्या चवींची ‘टेस्ट डेव्हलप’ होऊन मोठेपणी देखील मुले सगळ्या भाज्या, सगळे घरगुती पदार्थ चवीने खायला शिकतात..

आठवतंय ना? पूर्वी पानात जे वाढले जाईल ते संपवायची आपल्याला सक्त ताकीद असे..

नाहीतर कडक शिस्तीच्या आजोबांशी, काकांशी, बाबांशी गाठ असे.. हे थोड्या माईल्ड प्रमाणात का होईना, आत्ताही लागू करा..!

४. मुलांना बालपणापासूनच चांगली झोप घ्यायची सवय लावा:

व्यवस्थित जेवण, व्यवस्थित अभ्यास, भरपूर शारीरिक व्यायाम झाल्यावर झोपही भरपूर हवी. आणि त्यासाठी मुलांना वेळेत झोपण्याची सवय हवी.

बाळ लहान असताना खूप जागरण करायला लावते असे बऱ्याच पालकांचे अनुभव असतात. पण त्या नकळत्या वयातच बाळाला आपण सवयी लावू शकतो.

रात्री ८ किंवा ९ ला बत्ती गुल करायची सवय ठेवा.. बाळ कदाचित टकमक बघत बसेल. लवकर झोपणार नाही. काही दिवस त्रास देईल..

पण एकदा का अंगवळणी पडले की त्याला त्या रोजच्या वेळेत पडणाऱ्या अंधाराची सवय होते आणि ते आपसूकच लाईट बंद केले की झोपून जाते.. मग ही सवय कायमची राहते, जर आपण तशीच पद्धत सुरू ठेवली..

त्यामुळे असे शांत झोपणे मुलांना लवकरात लवकर शिकवा..

५. मुलांना चपळ करा:

बैठा अभ्यास, तासंतास बसून टीव्ही/मोबाईल पाहणे ह्यामुळे मुलांमध्ये भरपूर आळस भरतो. त्यामुळे त्यांना कोणतीतरी ऍक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे.

रोज व्यायाम शक्य असल्यास उत्तम.. चाळीस ते साठ मिनिटे मस्त व्यायाम करवून घ्या.

ते जमत नल्यास नृत्याचा क्लास, एखाद्या खेळाचा क्लास अशी ऍक्टिव्हिटी सुरू करून घ्या जेणे करून तासभर मुले शरीराची हालचाल करतील आणि चपळ राहतील.

तेही शक्य नसल्यास अंगणात पळापळी, लंगडी, बॅडमिंटन अशा प्रकारचे खेळ खेळुद्या. पण दिवसातून एखादा तास शरीराची जोरदार हालचाल झाली पाहिजे, हृदयाच्या ठोक्याची गती वाढली पाहिजे..

जेणे करून रक्ताभिसरण चांगले राहील आणि मुलांना दमल्यामुळे झोपही चांगली लागेल.

६. मुलांच्या झोपण्याच्या खोलीत शांतता ठेवा:

शक्यतो झोपण्याच्या खोल्यांमध्ये कोणत्याही प्रकारची गॅजेट्स नसावीत. खिडक्या दारातून कुठले बाहेरील आवाज येणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. डोळ्यावर उजेड पडणार नाही ह्याची व्यवस्था करावी..

एकंदर झोपण्यास अनुकूल अशी परिस्थितो निर्माण करावी..

एकदा का मुले झोपण्यास गेली तर तिथे जाऊन त्यांना डिस्टर्ब करू नये.. ती शांत झोपतील आणि उठल्यावर खूप फ्रेश होतील..

७. डॉक्टरांच्या सल्ल्याने मेलॅटोनिनची सप्लिमेंट द्या:

झोपेची जर खूपच तक्रार असेल तर मुलांना डॉक्टरांकरवी तपासून घ्या. झोपेला लागणारे हॉर्मोन मेलॅटॉनिन जर कमी पडत असेल तर त्याची सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू करा.

करण ह्याच वयात शरीरात बदल घडत असतात. शरीराची वाढ होत असते. आणि अशा वयाच्या टप्प्यावर झोप न होण्याने अजून इतरही समस्या उद्भवू शकतात.. त्यामुळे हे हॉर्मोन शरीरास योग्य प्रमाणात मिळाले पाहजे.

तर मित्रांनो, मुलांना ह्यापैकी कोणत्याही सवयी लावायच्या म्हणजे आपण स्वतः देखील तितकेच अप टू डेट असायला हवे.. आपणही हे नियम पाळले पाहिजेत. म्हणजे आपली मुले आपले योग्य अनुकरण करू शकतील.

रात्री जागून अभ्यास, रात्री टीव्ही बघणे, जागरण करणे ह्या मुलांना लागणाऱ्या सवयी आपल्याच वागण्यातून घेतल्या गेलेल्या असतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपणही उत्तम सवयी अंगिकरूया.. मुलेही पावलावर पाऊल ठेवत आपले अनुकरण करतील.. आणि ह्यामुळे त्यांच्या झोपेची समस्या आपण दूर करू शकू.. पालक म्हणून आपल्याला आणखी काय हवे..?!!

https://manachetalks.com/11656/3-ways-to-keep-hope-alive-during-the-tough-times-marathi/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।