नमस्काssर मित्रांनो, असं म्हणतात की सध्या कालखंडाचं चौथं युग म्हणजे कलियुग सुरू आहे.
या कलियुगाविषयी हिंदू धर्मशास्त्रामध्ये बरीच माहिती नमूद केलेली आहे.
जसं-जसं हे कलीयुग शेवटाकडे जाईल धरतीवरून धर्माचा नाश होईल आणि माणसांचं आयुष्यही कमी होत जाईल.
शेवटी पुन्हा भगवान विष्णु कल्की रूपात अवतरतील आणि पुन्हा एकदा धर्माची स्थापना करतील असंही मानलं जातं.
पण तुम्हाला हे माहिती आहे का? महाभारतात कलियुगामध्ये ज्या गोष्टी घडतील त्याविषयी आधीच भाकित केलेलं होतं आणि आजच्या जगामध्ये त्या गोष्टी ख-या ठरताना दिसतात.
त्या कोणत्या गोष्टी आहेत? ज्या श्रीकृष्णाने महाभारतामध्ये सांगितल्या होत्या, चला आज जाणून घेऊया.
कौरव आणि पांडव यांच्यातल्या युद्धाची गोष्ट म्हणून महाभारताकडं पाहिलं जातं.
खरंतर महाभारतामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यांचा नीट अभ्यास केला गेला तर मानवाला जीवनाविषयी पुर्ण ज्ञान प्राप्त होईल.
पांडव द्यूतात हरून वनवासात निघाले, तेंव्हा युधिष्ठिरानं श्रीकृष्णाला विचारलं की “द्वापार युगाचा शेवट जवळ आलेला आहे हे आम्हांला माहिती आहे, पण यानंतर जे युग येणार आहे ते कलियुग, ते कसं असेल? त्या विषयी आम्हांला सांग “
श्रीकृष्ण हसून म्हणाले “तुम्ही सगळे आधी वनात जा, तिथं पहिल्यांदा जी गोष्ट तुम्हाला दिसेल ती येऊन मला सांगा, मग मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देईन.”
पांडव वनाकडे निघाले, तिथून ते सगळे वेगवेगळ्या दिशेला गेले.
तिथं जे जे पाहिलं ते त्यांनी संध्याकाळी येऊन श्रीकृष्णाला सांगितलं.
युधिष्ठिर म्हणाला “श्रीकृष्णा, मी दोन सोंडेचा हत्ती पाहिला. मला तर आश्चर्यच वाटलं की एकाच हत्तीला दोन सोंडी कशा असतील? याचा नेमका अर्थ काय?”
श्रीकृष्ण म्हणाले, “याचा अर्थ असा की कलियुगामध्ये असे लोक असतील जे बोलतील काहीतरी वेगळं पण त्यांच्या मनात मात्र काही तरी वेगळेच असेल.
कलियुगाचे जे शासक असतील ते जनतेची काळजी करणार नाहीत. त्यांना फक्त राज्य करायचं असेल.”
अर्जुनाने सांगितलं “हे नारायणा, जंगलात मी एक पक्षी पाहिला ज्याच्या पंखावरती वेदांमधल्या ऋचा लिहिलेल्या होत्या, पण तो एका मेलेल्या जनावराचे मांस भक्षण करत होता.”
श्रीकृष्णानं, याचा अर्थ सांगितला “कलियुगामध्ये ज्ञानी लोकांचं वागणं हे असं असेल, म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान प्रचंड असेल पण वागणं, वृत्ती असुरी-राक्षसी असेल.
प्रचंड ज्ञान असूनही दुसऱ्यांच्या वाईटावर, पैशावर डोळा ठेवून हे ज्ञानी लोक समाजामध्ये वावरतील.”
त्यानंतर भीमाची पाळी आली, भीम म्हणालास “मी बघितलं की एका गाईंनं नुकतचं एका बछड्याला जन्म दिलेला, पण या बछड्याला तिनं इतकं चाटलं, इतकं चाटलं की त्यामुळे त्या वासराला जखमा होऊन ते वासरू रक्तात न्हाऊन निघालं.
एक आई आपल्या मुलाशी असं कसं वागू शकते? याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं.”
श्रीकृष्णानं याचा अर्थ विशद करताना सांगितलं “कलियुगातली आई आपल्या मुलांवर इतकी माया करेल, की तिचं मूल स्वतःचं कर्तृत्व दाखवू शकणार नाही, आणि त्यामुळे ही मुलं मोहात अडकून त्यांच्या आयुष्याचं प्रचंड नुकसान होईल.”
त्यानंतर सहादेवानं सांगितलं “नारायणा, मी ६ ते ७ विहिरी बघितल्या, बाजूच्या विहिरींमध्ये भरपूर पाणी होतं, मात्र मधल्या विहिरीत अजिबात पाणी नव्हतं.
तसं पाहायला गेलं तर ती विहीर खोल होती पण तरीही त्या विहिरी मध्ये अजिबात पाणी नव्हतं.”
याविषयी सांगताना श्रीकृष्णांनं असं सांगितलं “कलियुगातले श्रीमंत, पैसेवाले लोक लग्नामध्ये, त्याच्या समारंभामध्ये, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये लाखो रुपये खर्च करतील पण समाजातल्या गरिबांना पोटभर अन्न मिळावं म्हणून एक रुपयाचीही मदत करणार नाहीत.
एकाच जागी प्रचंड असमानता कलियुगामध्ये दिसून येईल.”
नकुल सांगायला लागला “मला असं दिसलं की डोंगरावरून एक मोठा दगड सगळ्या झाडांना तोडत, फोडत घरंगळत येत होता, मोठ्या वृक्षांनाही हा दगड थांबवता आला नाहीच, पण आजूबाजूच्या दगडांमुळे ही हा दगड थांबला नाही.
मात्र मला एक आश्चर्याचा धक्का बसला की एका छोट्याशा रोपाच्या स्पर्शानं मात्र दगड जागच्या जागी थांबला.”
याविषयी सांगताना श्रीकृष्णाने सांगितलं की “हा दगड म्हणजे मनुष्याचं जीवन रसातळाला चालल्याचं प्रतिक, वेगाने खाली घसरणारा जो दगड पैशांच्या दगडाने थांबला नाही, सत्तेचे वृक्ष त्याला थांबवू शकले नाहीत तो दगड नामस्मरणानं मात्र एकाच जागी थांबला.
कलियुगामध्येसुद्धा परमेश्वराचं नामस्मरण करूनच लोक तरुन जातील. जो नामस्मरण करील त्याची नौका पार होईल, बाकीच्यांचे मात्र हाल हाल होतील.”
तर मित्रांनो श्रीकृष्णानं महाभारताच्या काळामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या तंतोतंत घडताना आज आपण आपल्या आजूबाजूला बघतो आहोत.
महाभारताच्या कथांमधली सत्या-सत्यता किती? हा जरी कळीचा मुद्दा असला तरी, त्या आपल्याला खूप काही शिकवून जातात. हे मात्र खरं!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.