ह्या लेखात आपण आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ताक पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
दही हे अत्यंत गुणकारी आहे आणि दहयाचे सेवन करणे हे अतिशय आरोग्यदायक आहे हे आपण सर्व जाणतोच.
पण ते दही थोडे पाणी घालून घुसळून त्याचे ताक केले असता ते जास्त गुणकारी आहे हे आपणास माहीत आहे का? कसे ते जाणून घेऊया
दहयात पाणी मिसळून ते चांगले घुसळले की त्याचे ताक तयार होते. अनेक घरांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात ताक हे आवडीने प्यायले जाते.
ताकाचे प्रकार
दहयाच्या आंबटपणानुसार ताकाचे गोड ताक, आंबट ताक आणि खूप आंबट ताक असे प्रकार आहेत.
शिवाय सायीला विरजण लावून केलेल्या ताकाचे देखील प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे-
१. केवळ दही घुसळून पाणी न मिसळता केलेल्या ताकास ‘घोल‘ असा शब्द आहे.
२. दहयाच्या एक चतुर्थांश प्रमाणात पाणी मिसळून ताक केले असता त्यास ‘तक्र’ असे नाव आहे.
३. दहयाच्या अर्ध्या प्रमाणात पाणी मिसळून ताक केले की त्यास ‘ उदश्वीत’ असे म्हणतात
४. लोणी काढून झाल्यावर खाली राहते त्या ताकास ‘मथीत’ असे म्हणतात.
सामान्यपणे बोलीभाषेत आपण सर्व प्रकारच्या ताकाला “ताक” हाच शब्द वापरतो.
ताकाचे गुणधर्म
आयुर्वेदात ताकाचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. ताकात मधुर रस, आम्लता, पाचक रस आणि शरीराची पचन व्यवस्था स्वच्छ ठेवणारी तत्वे असतात.
जेवण झाल्यानंतर मीठ घातलेले ग्लासभर ताक पिण्याने अन्न पचण्यास खूप मदत होते. लोणी काढून झाल्यावर खाली राहणारे ताक हे अत्यंत गुणकारी, पाचक रस वाढवणारे आणि पथ्यकारक आहे.
तर लोणी न काढता केलेले ताक हे पौष्टिक परंतु पचण्यास जड व कफकारक आहे.
ताक पिण्याचे फायदे
नियमित ताक पिणे हे शरीराची पचनशक्ती सुधारण्याबरोबरच इतरही अनेक फायदे करून देते. कसे ते पाहूया
१. मूळव्याध – बद्धकोष्टता हे मूळव्याध होण्याचे प्रमुख कारण आहे. आणि त्यास आपल्या शरीराची कमकुवत पचनसंस्था कारणीभूत असते. परंतु नियमित ताक पिण्याने आपल्या शरीराची पचन शक्ति सुधारते आणि पर्यायाने मूळव्याधी बरी होते. आयुर्वेदात मुळव्याधीवर नियमित ताक पिणे हा घरगुती उपाय सांगितला आहे.
२. कफदोष – कफाच्या असंतुलनामुळे होणाऱ्या आजारांवर ही ताक गुणकारी आहे. ताकात सुंठ, काळी मिरी आणि पिप्पली घालून सेवन केले असता कफ दोष कमी होतो.
३. वात दोष – अदमुरे ताक सुंठ व सैंधव घालून सेवन केले असता वातामुळे होणाऱ्या आजारांवर उपयोग होतो.
४. पित्त दोष – गोड ताकामध्ये साखर घालून ते पिण्यामुळे पित्त कमी होते. गोड ताक हे पित्तशामक असते.
५. लघवी करताना होणाऱ्या वेदना – जर लघवी करताना वेदना होत असतील, लघवी सुरळीतपणे बाहेर टाकली जात नसेल तर ताजे , पातळ ताक पिण्याचा उपयोग होतो.
६. पंडूरोग – पंडूरोग म्हणजेच अनिमिया मध्ये ताक पिण्याचा खूप उपयोग होतो. परंतु हा एक गंभीर आजार आहे त्यामुळे केवळ घरगुती उपायांवर विसंबून न राहता तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
७. ताकामध्ये हिंग, जिऱ्याची पूड आणि सैंधव घालून सेवन केले असता खालील आजारांवर उपयोग होतो-
१. बद्धकोष्ठ
२. जुलाब
३. मुरडा
४. अपचन
ताक केव्हा प्यावे
दुपारचे जेवण झाल्या नंतर प्यायलेले ताक हे सर्वाधिक गुणकारी आहे. शिवाय सकाळी न्याहारी च्या वेळी घेतलेले ताक देखील प्रकृतीस उत्तम आहे.
ताक केव्हा पिऊ नये
पावसाळ्यात ताक पिण्याचे प्रमाण कमी असावे. तसेच अति आंबट झालेले ताक पिऊ नये.
तर हे सर्व आहेत नियमित ताक पिण्याचे फायदे. त्यामुळे योग्य प्रमाणात ताकाचे नियमित सेवन करा व ह्या फायद्यांचा जरूर लाभ घ्या.
घरगुती उपाय म्हणून ताक गुणकारी आहेच पण आजार जास्त वाढला तर तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
स्वस्थ रहा, आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.