उन्हाळ्यात,जास्त धावपळ केल्याने अंगाला घाम येतो. ते साहजिकच आहे.
पण कधीकधी काही कारण नसताना आपल्या तळहाताला व तळपायाला सुद्धा प्रचंड प्रमाणात घाम येतो.
कोणताही ऋतू असुदेत, तळपायाला किंवा तळहाताला घाम येण्याचा त्रास तुम्हाला सुद्धा होत असेल तर हा लेख जरूर वाचा.
यामध्ये तळहाताला, तळपायाला घाम का येतो, त्यामागे काय कारणे असू शकतात आणि त्यावर कोणते घरगुती उपाय प्रभावी ठरतात.
तसेच हा त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती दिली आहे.
तळपाय व तळहाताला घाम येण्याची कारणे काय आहेत?
बऱ्याचदा जर हाता-पायाला जास्त प्रमाणात घाम येत असेल तर त्यामागे अनुवांशिक कारणे असू शकतात.
काही लोकांमध्ये मुळातच घाम यायचे प्रमाण खूप जास्त असते.
कधीतरी हवेतील उष्णतेमुळे, ताप, काही इन्फेक्शन, गरम व उबदार कपडे यामुळे सुद्धा हाताला आणि पायाला जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो.
तुम्ही नर्व्हस असाल, कसली भीती किंवा दडपण असेल तरीही तळ हाताला जास्त प्रमाणात घाम येतो.
तळपायाला घाम येण्याचे मुख्य कारण म्हणजे मोज्यांची चुकीची निवड. खूप जाड कापडाचे मोजे घातले तर पायाला अजिबात हवा लागत नाही.
त्यामुळे पायाला घाम येण्याचे प्रमाण वाढते. याचप्रमाणे उन्हाळ्यात लेदरचे बूट घातल्याने सुद्धा पायाला घाम येण्याचे प्रमाण वाढते.
हातापायाला घाम येण्याची इतरही काही कारणे खाली दिली आहेत.
१. आहारात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स घेणे
आहारात जर कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असेल तर घाम येण्याचे प्रमाण वाढते.
यामुळे नेहमीच समतोल आहार घेणे गरजेचे आहे.
आहारात प्रोटीन्स, फॅट आणि फायबर हे सगळे व्यवस्थित प्रमाणात घेतल्याने घाम येण्याचे प्रमाण कमी होते आणि घामाची दुर्गंधी सुद्धा येत नाही.
२. अस्वच्छता
विशेषतः तळपायाच्या बाबतीत स्वच्छता फार महत्वाची आहे.
रोजच्या रोज मोजे बदलणे, दिवसभर जर बूट घालावे लागत असतील तर घरी आल्यावर स्वच्छ पाण्याने, साबणाने पाय धुणे, घाम आलेले बूट उन्हात ठेवणे यासारख्या गोष्टी केल्या पाहिजेत.
३. हार्मोनल बदल
गरोदर महिलांमध्ये तसेच वाढत्या वयातील मुला-मुलींमध्ये हार्मोनचे प्रमाण सतत बदलत असते.
तळहाताला व तळपायाला घाम येण्यामागचे हे महत्वाचे कारण आहे.
तळपायाला येणाऱ्या घामाचा जास्त त्रास होतो, शिवाय त्यामुळे घामाचा एक प्रकारचा उग्र दुर्गंध सुद्धा येतो.
हात-पायाला घाम येऊ नये यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत?
१. बेकिंग सोडा
एक चमचा बेकिंग सोडा पाण्याच्या अर्ध्या बादलीत घालावा.
त्यात रोज १५ मिनिटे पाय बुडवून बसावे. असे एक आठवडा केल्याने पायाला घाम येण्याचे प्रमाण कमी होते.
बेकिंग सोड्यामुळे पायाला आलेल्या घामामध्ये जीवाणूंची वाढ होत नाही.
यामुळे घामामुळे येणारी दुर्गंधी सुद्धा कमी होते.
मोजे घालताना मोज्यात थोडा बेकिंग सोडा भुरभूरवंला तरी सुद्धा पायाला घाम येण्याचे प्रमाण कमी होते.
२. लव्हेंडर ऑईल
लव्हेंडर ऑईलचा वास सुंदर असतोच पण त्याचा अजून एक महत्वाचा फायदा असा आहे की त्यामुळे फंगसची वाढ होत नाही.
यामुळे घाम येण्याचे प्रमाण व घामाला येणारी दुर्गंधी कमी होते.
बाजारात मिळणाऱ्या लव्हेंडर ऑईलचे काही थेम्ब एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात घालावे.
यामध्ये साधारण २० मिनिटे पाय बुडवून बसावे. नियमितपणे हा उपाय केल्याने पायाला घाम येण्याचे प्रमाण कमी होते.
३. तुरटी
तुरटी पाण्यात घालून त्या पाण्यात हात व पाय थोड्यावेळ बुडवून ठेवल्याने घाम येण्याचे प्रमाण कमी होते.
हाताला व पायाला तुरटीची पावडर लावल्याने सुद्धा फायदा होतो.
४. चहा
चहामध्ये असलेल्या टॅनिक ऍसीडमुळे जीवाणूंची वाढ कमी व्हायला मदत होते.
यासाठी चार चमचे चहा, दोन कप पाणी घेऊन उकळून घ्यायचे.
बादलीत थंड पाणी घेऊन त्यात हा काळा चहा घालायचा.
या चहाच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसल्याने फायदा होतो. हा उपाय आठवड्याभरासाठी रोज केल्याने लगेच फरक दिसून येतो.
५. बोरिक पावडर
बाहेर जाण्यापूर्वी बोरिक पावडर मोज्यांमध्ये व बूटाच्या आत थोडी पसरवून टाकावी.
यामुळे पायाला येणारा घाम कमी होईल. बोरिक पावडरमुळे इन्फेक्शन्स सुद्धा होत नाहीत.
त्यामुळे घामामुळे येणारी दुर्गंधी सुद्धा कमी व्हायला मदत होते.
६. आले
आल्याची पेस्ट करून घ्यावी. एक चमचा आले पेस्ट एक वाटी पाण्यात घालून १५ मिनिटे ठेऊन द्यावी.
नंतर हे मिश्रण गाळून घ्यावे व त्या गाळलेल्या पाण्याने हात व पाय धुवून घ्यावेत झोपण्यापूर्वी हा उपाय केल्याने हाताला व पायाला येणारा घाम कमी व्हायला मदत होते.
७. कॉर्न फ्लार
कॉर्न फ्लार हे घाम शोषून घ्यायला फायदेशीर ठरते.
यामुळे आलेला घाम टिपला जातो. यासाठी हाताला व पायाला कॉर्न फ्लार चोळून लावावे.
८. गुलाब पाणी
गुलाब पाणी हाताची व पायाची स्वच्छता राखण्यासाठी उपयुक्त असते.
यासाठी गुलाब पाण्यात कापूस बुडवून त्याने रोज दोनदा हात व पाय पुसून घ्यावेत.
यामुळे घाम येण्याचे प्रमाण बरेच कमी होईल. पायाला घाम येण्याचा त्रास होत असेल तर त्यासाठी बूट व मोजे घालण्यापूर्वी, तसेच मोजे काढल्यावर गुलाब पाण्याने पाय पुसून घ्यावेत.
९. लिंबू
लिंबामध्ये असलेले सायट्रिक ऍसीड जीवाणूंची वाढ थांबवते.
लिंबामुळे हाताच्या व पायाच्या त्वचेला सुद्धा फायदा होतो, घाम येण्याचे प्रमाण हमखास कमी होते.
यासाठी लिंबाच्या रसात मीठ घालून ते हाताला व पायाला व्यवस्थित चोळून घ्यावे. हे मिश्रण हाताच्या व पायाच्या त्वचेमध्ये शोषले जाईल. यामुळे घाम येण्याचे प्रमाण लगेचच कमी होईल.
१०. टोमॅटोचा रस
टोमॅटोचा रस शरीराचे तापमान कमी करण्यासाठी उपयुक्त असते.
उष्णतेमुळे जर घाम येण्याचे प्रमाण वाढले असेल तर हा एक प्रभावी उपाय आहे.
यासाठी टोमॅटोचा रस थोड्या थंड पाण्यात मिसळून घ्यावा. या पाण्यात हात व पाय १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावेत. नंतर साबणाने हात, पाय धुवून घ्यावेत.
घाईच्या वेळेत टोमॅटोचा काप त्वचेवर चोळल्याने सुद्धा फायदा होतो.
हातापायाला घाम येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?
१. हातापायाची, विशेषतः तळपायाची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. बाहेरून आल्यावर पाण्याने हात पाय धुणे गरजेचे आहे. यामुळे आलेला घाम धुतला जाईल व त्यात जीवाणूंची वाढ होऊन इन्फेक्शन होणार नाही.
२. नेहमी एकच बूट वापरू नये. दर आठवड्यानंतर रोजच्या वापरातले बूट काही वेळ उन्हात ठेवावेत.
३. शक्यतो कॉटनचे मोजेच वापरावेत व ते रोज बदलावेत.
४. दारू व सिगारेटच्या सेवनाने घाम येण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे यापासून दूर राहिलेलेच चांगले.
५. उन्हाळ्यात पाय मोकळे राहतील, हवा खेळती राहील अशा चप्पल/बुटांची निवड करावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.