मित्रांनो, ओमिक्रोन व्हॅरिएंटने जगभर थैमान घालायला सुरुवात केली तशी भारतातही त्याची भीती वाढली, आज कर्नाटकात ओमिक्रोनचा पहिला रुग्ण आढळला. त्यामुळे सध्या आपल्या डोक्यावर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. अन त्या पेक्षाही भयंकर म्हणजे आज बऱ्याच जणांना उत्पन्नाचा स्रोत बंद होईल कि काय याची भीती आहे.
आणि विषाणूचा हा उद्रेक थोडावेळ अजून असाच राहिला तर काही जणांचा उत्पन्नाचा स्रोत लवकरच बंद होईल किंवा कमी होईल. हि स्थिती येऊ नये म्हणून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नियमांचं पालन करणे हेच या घडीला आपल्या हातात आहे. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक आघाडी नीट सांभाळण्याचं शिवधनुष्य प्रत्येकाला पेलायचे आहे.
अशा परिस्तिथीत, आज आम्ही आर्थिक नियोजन केलेल्या बऱ्याच ग्राहकांनी आम्हाला, आम्ही सांगितलेल्या आपात्कालीन द्रव्य निधी ज्याला आपण Emergency Fund असे म्हणतो, त्याचे महत्व आज लक्षात आले असा अभिप्राय (feedback) दिला.
काय आहे इमर्जन्सी फंड?
इमर्जन्सी फंड हा वैयक्तिक अर्थसंकल्प असतो जो भविष्यातील दुर्घटना किंवा अनपेक्षित खर्चासाठी आर्थिक सुरक्षा राखीव म्हणून ठेवला जाते.
म्हणजे भविष्यात कोणताही अनपेक्षित खर्च उभा राहिला तर अशा खर्चासाठी जमा करून ठेवलेली तजवीज.
आर्थिक नियोजन करतानाची सर्वात आधीची आणि महत्वाची पायरी म्हणजे इमेर्जन्सी फंड ते कसे ते आपण पाहू. आर्थिक नियोजन करताना खालील वैयक्तिक उद्देश्यांचे खालील क्रमाने प्राधान्य देणे आवश्यक आहे.
- विमा (जीवन विमा- Term insurance), आरोग्य विमा (Health Insurance)
- इमर्जन्सी फंड
- रिटायरमेंट प्लॅंनिंग
- मुलांचा शैक्षणिक खर्च
- स्वतः साठी पहिले घर
- भविष्यात येणारा मोठा खर्च जसे की मुलांचे लग्न ई.
- इतर इच्छा आकांक्षा जसे की 4 व्हिलर, परदेश सहल, दौरा ई.
अर्थातच जसे जसे आपले उत्पन्न वाढत जाते तसे तसे आपण ह्या उद्देश्यांसाठी वर दिलेल्या क्रमाने गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
पण बऱ्याच वेळी हे पाहावयास मिळते की हा क्रम उलटा अवलंबला जातो जसे की इच्छा आकांक्षांपासून सुरवात होऊन रिटायरमेंट प्लॅंनिंग, इमर्जन्सी फंड, आणि विमा ह्यास शेवटचे प्राधान्य दिले जाते.
मित्रांनो, भविष्यात येणारे धोके आपणास माहित नसतात आणि त्या साठी इमर्जन्सी फंड आणि विमा हे अत्यंत महत्वाचे असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कसा जमवावा इमर्जन्सी फंड?
अत्यंत महत्त्वाचा असा हा फंड कसा जमवावा हे आपण पाहू.
इमर्जन्सी फंड जमावण्या आधी तो किती असावा हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. ते कसे माहित करून घेता येईल हे आपण पाहू.
प्रथम आपण आपल्यास महिन्याला किती खर्च लागतो ते आपण पाहावे. ह्या मध्ये आपले लोन चे हफ्ते, मुलांच्या ट्युशनच्या दर महिन्याच्या फीस, इ. पकडावे, तसेच जो वार्षिक खर्च लागतो त्यास १२ ने भागून महिना किती ते काढावे. वार्षिक खर्च जसे की विम्याचे वार्षिक हप्ते, शाळेची वार्षिक फीस, Gym membership ची वार्षिक फीस इ.
एकदा का हा महिन्याचा खर्च आपणास समजला कि त्यास ३ ते ६ ह्या अंकाने गुणावे म्हणजे ३ ते ६ महिने पुरेल एवढी रक्कम आपल्या कडे जमा असावी.
ज्याचा business आहे किंवा उत्पन्न हे अनियमित आहे अशांनी ६ महिने तर इतरांनी ३ ते ६ महिने आपापल्या उत्पन्नाच्या किंवा नोकरीच्या अनिश्चिततेच्या मानाने ही रक्कम किती येते ह्याची गणना करा.
म्हणजे समजा एक नोकरी गेली किंवा सोडावी लागली तर दुसरी किती दिवसात मिळेल ह्या अंदाजाने किती महिन्याचा इमर्जन्सी फंड असावा हे काढावे.
एकदा का हा फंड किती असावा हे कळले की आपण आर्धी लढाई जिंकलो. त्यानंतर हे उद्दिष्ट समोर ठेवून तो कसा आणि कुठे जमवावा हे आपण पाहू.
आज प्रत्येकाकडे एक पेक्षा अधिक बँक खाते आहे. सहा माहिन्यांपैकी, एक महिन्याचा इमर्जन्सी फंड हा एक किंवा दोन बँक खात्यात विभागून जमा करावा.
ही खाती आपल्या सॅलरी अकाउंट पेक्षा वेगळी असणे गरजेचे आहे.
अशा बँक खात्यातून आपल्यास एटीएम द्वारे किंवा online बँकिंग द्वारे पैसे जेव्हा हवे तेव्हा लगेच मिळतील.
उरलेल्या २ ते ५ महिन्याचा इमर्जन्सी फंड हा लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये ठेवावा.
लिक्विड म्युच्युअल फंड हे सर्वात कमी जोखमीचे फंड असतात. लिक्विड फंडा मध्ये, भांडवल जतनावर (capital preservation) वर अधिक भर दिला जातो त्या मुळे ते इतर म्युच्युअल फंडाच्या मानाने अत्यंत कमी जोखमीचे असतात.
त्यात आपल्यास परतावा हा ५ ते ७% वार्षिक दरा पर्यंत मिळू शकतो.
शिवाय आपण रक्कम काढण्याचे निर्देश दिल्यानंतर एका कार्यालयीन दिवसा मध्ये पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतात. काही लिक्विड फंड हे ₹५०,००० पर्यंत ची रक्कम अर्ध्या तासात खातेधारकाच्या खात्यात जमा करतात. आज लिक्विड फंडांना नव्या युगाचे बचत खाते असेही म्हणले तर वावगे ठरणार नाही.
दर महिन्याला थोडी थोडी रक्कम प्राधान्य देऊन इमर्जन्सी फंड म्हणून जमा करणे आवश्यक आहे. शिवाय एकरकमी मिळालेले उत्पन्न जसे की incentive किंवा बोनस किंवा बक्षीस, किंवा जुन्या वस्तू विकून आलेली रक्कम ई. मधील काही रक्कम ही इमर्जन्सी फंड कडे वळती करणे आवश्यक आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे आपण इमर्जन्सी फंड जमा करून भविष्यात येणाऱ्या अनिश्चिततेवर मत करून आपले आर्थिक आयुष्य उध्वस्त होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो.
मित्रांनो, हा काळ तर नक्कीच निघून जाईल आणि सर्वांची झालेली आर्थिक हानीही हळूहळू भरून निघेल. पण या लेखाचा उद्देश हाच कि इथून पुढे आपण इमर्जन्सी फंड ची तजवीज करण्याची सवय लावून घेऊ.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
लेखन: तुषार संघई
लेखक आर्थिक सल्लागार असून गेल्या १० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.
संबंधित इतर लेख:
श्रीमंत होण्यासाठी तुमची संपत्ती नाही तर ‘अर्निंग ऍबिलिटी’ वाढवा
तीस दिवस या गोष्टी करा आणि श्रीमंतीकडे/समृध्दीकडे वाटचाल करा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
मनःपूर्वक आभार छान विचार मांडले.
खुप महत्वाची व उपयुक्त माहिती.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.