लग्न झाल्यावर आपल्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतात ह्यात काही शंका नाही. आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते.
परंतु हे ही तितकेच खरे की आपल्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला, आपल्या बरोबरीने संसार करायला एक व्यक्ति देखील आपल्या आयुष्यात येते. आपल्या पत्नीच्या रूपाने.
पत्नी भलेही नोकरी करणारी असो अथवा गृहिणी ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला मदतच करत असते.
कमावणारी पत्नी असेल तर ती आर्थिक भार उचलतेच, पण गृहिणी असणारी पत्नी देखील असंख्य कामे घरात स्वतः करून, सामान आणताना घासाघिस करून पैसे वाचवून आपला आर्थिक भार हलका करायचा प्रयत्न करत असते.
तर अशी ही सर्व सुखदुःखात साथ देणारी पत्नी आपला इन्कम टॅक्स वाचवायला देखील मदत करू शकते. कसे ते आपण सविस्तर पाहूया
१. जॉइंट होम लोन अकाऊंट
आजकाल घर घ्यायचं झालं तर होम लोनला म्हणजेच गृहकर्जाला पर्याय नाही.
अशा वेळी तुम्ही गृह कर्ज घेताना जर पत्नीला देखील कोऍप्लिकन्ट आणि कोबॉरोअर बनवले आणि जॉइंट होम लोन अकाऊंट उघडले तर इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळू शकते.
इन्कम टॅक्सच्या सेक्शन ८० सी ह्या कलमानुसार पती व पत्नी ह्या दोघांना मिळून प्रत्येकी १.५ लाखापर्यंत सूट मिळू शकते सेक्शन तसेच २४ बी ह्या कलमानुसार पती व पत्नी दोघांनाही प्रत्येकी २ लाखापर्यंत सूट मिळू शकते.
म्हणजेच दुहेरी फायदा होतो. तसेच जर पती एकटाच गृहकर्जाचे हप्ते भरत असेल तर तो एकटा ही संपूर्ण दुहेरी सूट मिळवू शकत नाही. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स सवलत मिळवणे शक्य आहे.
२. हेल्थ इन्शुरन्स
सध्याच्या काळाइतके हेल्थ इन्शुरन्सचे महत्व केव्हा समजणार? सध्या करोनापेक्षाही त्यावर होणाऱ्या खर्चाच्या बिलाची लोकांनी धास्ती घेतली आहे.
अशा वेळी हेल्थ इन्शुरन्स काढणे हे अगदी शहाणपणाचे ठरत आहे. हेल्थ इन्शुरन्समुळे इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळते हे तर सर्वश्रुत आहेच.
पण त्यातही आपण जर संपूर्ण कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स काढला तर फॅमिली फ्लोटरचा फायदा मिळू शकतो. इन्कम टॅक्सच्या सेक्शन ८० डी कलमानुसार आपल्याला हेल्थ इन्शुरन्सपोटी रु. २५०००/- इतकी सूट टॅक्समध्ये मिळू शकते.
३. जीवन विमा
जीवन विमा ही देखील सध्या काळाची गरज बनली आहे. आपल्यामागे आपले कुटुंब सुरक्षित रहावे ह्यासाठी प्रत्येकाने जीवन विमा काढणे आवश्यक आहे.
जीवन विमा काढल्यावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. परंतु बरेच जणांना हे माहीत नसते की आपल्या पत्नीबरोबर जॉइंट जीवन विमा काढणे देखील शक्य आहे.
असे केल्याने दोघांनाही संरक्षण तर मिळतेच. शिवाय कमी प्रीमियममध्ये जास्त रकमेचा विमा मिळणे देखील शक्य होते. तसेच इन्कम टॅक्सच्या सेक्शन ८० सी नुसार टॅक्समध्ये सवलत देखील मिळते. तर अशा प्रकारे दोघांचा मिळून जीवन विमा असणे फायदेशीर आहे.
तर मित्रांनो, ह्या तीन प्रकारे तुमची पत्नी तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळवून देऊ शकते. ह्या सर्व गोष्टींचा जरूर विचार करा. गृहकर्ज, हेल्थ इन्शुरन्स आणि जीवन विमा काढताना ह्या गोष्टी लक्षात घेऊन जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.