संक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार

टीप :- हा लेख कोरोना विषाणूच्या साक्षात उपचाराचे मार्गदर्शन करणारा नसून स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व स्वस्थ राहण्यासाठी मार्गदर्शन पर आहे. येणाऱ्या काळात जीवनशैलीत ‘हे’ बदल करणे गरजेचे ठरणार आहे, हे मात्र नक्की.
येथे दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय म्हणून नाही, कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी.

मित्रहो! सूक्ष्मजीव हे मानव निर्मितीच्या आधीपासून सृष्टित उपस्थित होते. भूत, पिशाच्च आदिंमुळे उपसर्गकृत व्याधी होतात असे ग्रंथात म्हटले आहे. येथे भूत, पिशाच्च आदि म्हणजे सूक्ष्मजीवजंतु असे अपेक्षित आहे. (म्हणजेच बॅक्टेरीया, व्हायरस, इ.)

आयुर्वेदात बर्‍याच रक्षोघ्न (सूक्ष्मजीवजंतूंचा नाश करणारी द्रव्ये) द्रव्यांचा उल्लेख आला आहे. त्यांच्याशी लढणार्‍या बर्‍याच धूपांचा उल्लेख आयुर्वेदात आहे.

तुळस, निम्ब, मोहरी, वेखंड अशी औषधे यावर उपयुक्त आहेत.

शिवाय आहार विहारातील व आचरणातील काही नियम स्वस्थवृत्तात व सद्वृत्तपालनात सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल.

👉 रात्री लवकर झोपा व सकाळी किमान ५.०० वाजता उठा.

👉 रोज तिळ तेल कोमट करून सर्वांगाला अभ्यंग करा व हातापायाचे तळवे स्वच्छ करून म्हणजेच तेलकटपणा घालवून व्यायाम व योगासने करा.

👉 सुगंधी द्रव्यांचा अंघोळीपूर्वी शरीरावर लेप करावा (दुर्गंधीकडे सहसा सूक्ष्मजीवजंतु लवकर आकर्षित होतात व तेथे ते जोमाने वाढतात, याउलट सुगंधाकडे व स्वच्छतेकडे ते आकर्षित होत नाहित व वाढतही नाहित. स्वच्छता व सुगंध एकत्र असतात नि अजागळेपणा, गधडेपणा व दुर्गंध एकत्र असतात, हे काय शहाण्यांना वेगळे सांगायला नको.)

👉 उटणे लावून दोन वेळा अंघोळ करावी.

👉 केस, मिशी, अंगावरील लव व नखे इ. योग्य वेळी कापावीत.

👉 शरीर नित्य स्वच्छ ठेवावे.

👉 दोन्ही पाय व ज्यातून मल बाहेर पडतो अशा मार्गातील म्हणजेच डोळे, नाक, कान, तोंड, लघवी व शौचाच्या ठिकाणचा मळ स्वच्छ करावा.

👉 स्वच्छ वस्त्रे घालावीत.

👉 अंघोळीनंतर पूर्वीचेच कपडे वापरु नयेत. (कोणत्याही पृष्ठभागावर जास्त वेळ जीवंत राहणारे सूक्ष्मजीवजंतू पसरण्यास याने मज्जाव होईल.)

👉 सुगंधी द्रव्यांचे नैसर्गिक अत्तर वापरावे किंवा सुगंधी फुलांच्या माळा परिधान कराव्यात.

👉 तोंड झाकल्याखेरीज जांभई देणे किंवा शिंकणे टाळावे. हसतानाही थुंकी उडणार नाही असेच हसावे. (तोंड किंवा नाकातून पसरणारे इन्फेक्शन्स याने टाळता येऊ शकतात.)

👉 आपल्या सभोवताली पाहून चालावे. (कोणीही आपल्या जवळ शिंकत किंवा खोकत असल्यास खबरदारी घ्या व त्यांना रुमाल, मास्क इ. वापरण्याचा सल्ला द्या. किंबहुना सध्या कोणालाही हे सांगायची सुद्धा वेळ यायला नको.) प्रत्येकाने स्वतःची आणि इतरांची काळजी घेतली तर आजाराला पसरण्यापासून रोखता येऊ शकेल.

👉 छत्रधारण करावे (आता नक्की काय धारण करायचे म्हणून बुचकळ्यात पडू नका😅 पुढे वाचा.)

सूक्ष्मजीवांपासून म्हणजेच विषाणूंपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जे काही आपण धारण करतो. उदाः मास्क व ग्लोव्हज यांचा या छत्रधारणात समावेश होतो.

👉 मन प्रसन्न ठेवावे. (सतत नकारात्मक विचार करुन स्वतःला व इतरांना घाबरवू नये.) आणि नकारात्मकता झटकून देण्यासाठी तुमच्याबरोबर आहे मनाचेTalks!!

👉 दान करावे. म्हणजेच जमेल तशी मदत करावी. (परोपकारी वृत्ती जोपासावी. दुसर्‍याचे भले होण्यासाठी आपणास शक्य त्या मार्गाने व समोरच्यास उपयोगी ठरेल असे त्यास सहाय्य करावे.)

👉 सदाचारी वागावे. (आपल्या जवळ राहणार्‍या व्यक्तिस एखादा संक्रामक रोग झाल्यास त्यास घृणास्पद, अपमानास्पद वागणूक देऊ नये, कि जेणेकरुन तो आत्महत्या करेल. त्यापेक्षा तुम्ही त्यांच्या पासून लांब व सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा, कारण कोणीही स्वखुषीने संक्रामक व्याधी मागवून घेत नसतो, कृपया त्यास गुन्हेगार घोषित करु नका.)

👉 सत्याची कास धरा. (सत्य लपवू नये. संक्रामक व्याधीचा संसर्ग झाला असल्यास किंवा अशा व्याधीचा प्रसार झालेल्या देशातून दुसर्‍या किंवा स्वतःच्या देशात आपण आगमन केले असल्यास, ते न लपवता योग्य ठिकाणी कळवा. कारण यामुळे आपण इतरांना आजार पसरवू शकतो व इतरांच्या जीवास सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो व अशा आजाराचा प्रसार आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेच्या पलिकडे गेल्यास आरोग्य आणीबाणी येऊ शकते, म्हणून जागृत नागरीकाप्रमाणे वागावे.)

👉 कालाय तस्मै नमः आयुर्वेदात काळास अनन्यसाधारण महत्व दिले आहे. योग्य निर्णय उशीरा घेतल्यास व जिथे थांबावयास हवे तिथे घाई केल्यास बर्‍याच समस्या ओढवू शकतात, हे सर्वज्ञात आहेच. म्हणून Quarantine गांभीर्याने घ्या अन्यथा अतिगंभीर अवस्था ओढवू शकते.

👉 निर्धारीत समयापेक्षा अधिक वेळ कोणत्याही कार्यात घालवू नये. (उदाः सध्या अगदिच महत्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागत असेल तरी अधिक वेळ बाहेर घालवू नये अन्यथा आपण सूक्ष्मजीवजंतूंना सोबत घेऊन येऊ शकता. संचारबंदिकाळात अगदिच बाहेर न जाणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.)

👉 नियमांचे उल्लंघन करू नका. (Lockdown/Quarantine कालावधीत अधिक काळ बाहेर जाणे, अधिक लोक जमा होणे, फिरणे यांसारख्या नियमबाह्य गोष्टि करू नका. याने तुम्हाला स्वतःला संक्रमण होऊ शकते किंवा तुम्ही ते दुसर्‍याकडे नेण्यास निमित्त ठरु शकता. राजकीय मतभेद विसरुन सर्वांनी विचारांनी एकत्र या.)

👉 भयभीत झालेल्यांना आश्वस्त करा..

👉 कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नका.

👉 आपल्या सेवकांना योग्य वेळी वेतन द्या. ज्यांना शक्य असेल त्यांना पगारी रजा द्या.

👉 फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करू नका.

👉 दुसर्‍यांना दुःख देणारा आचार विचार करु नका.

पूर्वी बैठी घरे असायची, घरांना अंगण असायचं. अंगणात हात पाय धुण्यासाठी नळ असायचा व हात, पाय, तोंड इ. स्वच्छ धुवूनच आपण घरात प्रवेश करायचो.

आता शहरीकरणामुळे सगळे बदलल्याने, आपण चपला बाहेर काढून घरातल्या वाॅशरूम पर्यंत जाईपर्यंतचा जमिनीचा भाग व तोपर्यंत आपल्याला स्पर्श करणार्‍या लहान मुलांसारख्या व्यक्ति व आपण स्वतः तिथे जाण्याआधी जिथे जिथे स्पर्श करतो त्या सर्व वस्तू या सूक्ष्मजंतूंनी संक्रमित करु शकतो.

म्हणून हाता, पायाला सॅनिटायजर लावून आत जाईपर्यंत हाताच्या पंजाने अधिक वस्तूंना स्पर्श न करता बाथरूममध्ये जावे व स्वच्छ होऊन बाहेर यावे.

सर्व सहा रसांनी युक्त व अधिक तिखट तेलकट नसलेला आहार सेवन करा.

  • जेवताना दूध अथवा फळे खाऊ नका.
  • जेवणानंतर लगेच फळे खाऊ नका.
  • फळे फक्त नाष्ट्याऐवजी खाऊ शकता.
  • आंबट व फ्रिज मधील फळे खाऊ नका.

सर्दी, खोकला होणार नाही याची दक्षता घ्यावी व झाल्यास लगेच रजिस्टर्ड डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरघुती उपाय व सोशल मीडिया वरील स्वयंघोषित डॉक्टरांचे अथवा अर्धवट ज्ञान पाजळणाऱ्यांचे सल्ले घेऊ नका.

लहान मुलांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वैद्यांच्या सल्ल्यानुसार सुवर्णप्राशन चालू ठेवा.

कफाचे आजार होऊ नयेत याकरिता १/२ पेर आलं, १/२ पेर दालचिनी, ४-५ तुळसीची पानं, १ वेलची, यांचा काढा करून गाळून त्यात मोठ्या खडीसाखरेची बारीक केलेली पावडर किंवा सेंद्रिय पिठीसाखर किंवा सेंद्रिय गुळ किंवा सल्फर विरहित साधी साखर मिसळून पिऊ शकता.

मधुमेह असल्यास साखर किंवा गुळा ऐवजी स्टीव्हिया वापरू शकता, किंवा गोड न करता सुद्धा घेऊ शकता.

नगरी नगरस्येव रथस्येव रथी यथा ।
स्वशरीरस्य मेधावी कृत्येष्यवहितो भवेत् ।।

च.सू.6/103 मात्राशितीय अध्यायं

ज्याप्रमाणे नगराचा राजा हा सर्व नगराचे रक्षण करण्यास किंवा रथाचा मालक हा रथाची देखभाल करण्यास सदैव तत्पर असतो, त्याप्रमाणे बुद्धिमान पुरुषाने आपले शरीर, वरील दैनिक कर्मे करून स्वस्थ ठेवावे… म्हणजेच तुमच्या शरीररूपी रथाचे सारथी दुसरं, तिसरं कोणी नसून तुम्हीच आहात. म्हणून त्याची काळजी घेणे हि सर्वस्वी तुमचीच जवाबदारी.

आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले स्वस्थवृत्त व सद्वृत्तातील नियम सध्याच्या महामारीच्या वेळी सुद्धा कसे दिशादर्शक आहेत, हे सांगण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न, आपणास आवडला व पटला असल्यास नक्कीच आपल्या आप्त स्वकियांपर्यंत पोहचवा.

कारण आपले आरोग्य सेवक आणि प्रशासन बाहेर राहून या संकटाला थोपवून धरण्याचा प्रयत्न करत असताना तुमची-आमची जवाबदारी हि आहे कि घरात राहून सुरक्षित राहावं. ज्यामुळे बाहेरच्या यंत्रणेचा ताण कमी होऊन तुम्ही सुद्धा सुरक्षित राहाल.

आपणास उत्तम आरोग्य लाभो व हे जागतिक महामारीचे संकट लवकर टळो, हिच सदिच्छा…

लेखन: डॉ मंगेश पी. देसाई
संपर्क: ७३७८८२३७३२

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “संक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय