प्रेमप्रकरणं, प्रेमभंग आणि नैराश्य याचा सामना कसा करावा?

आमच्या कॉलेजात एक खुप गुणी विद्यार्थी आहे, पण त्याचं अभ्यासात मुळीच लक्ष नाही, असं का? असा मला नेहमी प्रश्न पडायचा,

एके दिवशी त्याने मन मोकळं केलं, त्याला वर्गातलीच एक मुलगी आवडते आणि ती काही ह्याला भाव देत नाही, आणि झाला आमच्या हिरोचा प्रेमभंग…

दाढी वाढवुन, सदा उदास उदास फिरत असतो, केविलवाणा चेहरा..आणि फेसबुक वॉट्सएपवर दर्दभरे स्टेट्स….

बरीचशी तरुणतरुणी, आजकाल ह्या प्रेमभंगाच्या दुःखाने मानसिक त्रस्त आहेत, फरक एवढाचं कोणी मन मोकळं करतं, कोणी मनातल्या मनात कुढतं राहतं, इतकचं…

असं का होतयं? खेळायच्या, बागडायच्या, काही करुन दाखवायच्या वयात नैराश्य का घेरतयं?…

९८% भारतीय सिनेमांमध्ये प्रेमकथा हमखास असते, त्यामुळेही कदाचित बहुतांश लोकांच्या मनात लहानपणापासुनच प्रेमाचं, आकर्षणाचं बी रुजतं, आपलही हक्काचं कोणीतरी असावं, ज्याच्याशी खुप सारं बोलावं, सगळंसगळं शेअर करावं, मनसोक्त भांडावं, खोटंखोटं रुसावं आणि त्याने/तिने लाड केला की खुदकन हसावं, ह्या सगळ्या मनाच्या अविभाज्य गरजाच बनतात जणु!… तारुण्याच्या उंबरठ्यावर, कॉलेजला येऊन, पासआऊट होऊन जॉब करताना, ह्या जाणीवा अधिक तीव्र होतात.

आजुबाजुची मस्ती करणारी कपल्स बघितली की अजुनच मत्सर पेटुन उठतो आणि कुठेतरी आपलंही जुळवण्याची ईर्ष्या वाढते.
मग कधी ‘मीही कमी नाही’ ह्या उर्मीतुन कधी ‘एकटं बोअर होतयं’ ह्या भावनेतुन मनात प्रेमाचा उगम होतो, झरा फुटतो.

मग कोणी आवडीचा भेटला/भेटली तर ‘मैत्री’ च्या नावाखाली आधी फक्त बोलणं, सुरु होतं, गंमत अशी की जवळीक वाढली की आधी त्याला ‘निखळ मैत्री’ असं गोंडस लेबल चिटकवलं जातं, कारण ‘अफेअर’, ‘प्रेमप्रकरणं’ आणि ‘लफडी’ ही नेहमी दुसर्‍याचीच असतात,

आपली स्वतःची फक्त आणि फक्त ‘निखळ मैत्रीच’ असते. पुढे जवळीक वाढते, भेटीसाठी कधी कॉफीशॉप, कधी रेस्टॉरंट तर कधी वर्दळ नसलेली ठिकाणं, जसं की पार्क, मंदीर, ओव्हरब्रीज अशी कुठलीही ठिकाणं चालतात आणि गप्पागोष्टी वाढतात.

सुरुवातीला खुप मजाही येत असते, सोबत खाणं, पिक्चर बघणं, एकमेकांची काळजी घेणं, गिफ्ट देणं, हसणं, खिदळणं खुप छान वाटतं, दुसरीकडे ‘आमच्यात मैत्रीच्या पलिकडे काहीच नाही’, हे पालुपदही सुरुच असतं, पण सहवास वाढला की भावनिक गुंतवणुक वाढणं, नैसर्गिक असतं. फोनकॉल्सवर तासतास बोलणं आपोआपच वाढतं, सतत त्याचा/तिचा विचार करणं, आणि मनातल्या मनात, स्वप्नात इमारतींचे इमले बांधणं, असले मनाचे खेळ सुरु होतात.

‘टाईमपास’ साठी सुरु झालेलं प्रेम ‘सैराट’ कधी झालं ते कळतचं नाही, आणि इथेच आता खरी अग्निपरीक्षा सुरु होते. चटचट चटके बसायला लागतात, एका बाजुला, करीअर अर्ध्यावर आलेले असते, उत्पन्नाची पुरेशी साधनं नसतात, घरच्या जबाबदार्‍या आणि जीवापाड प्रेम करणारं कुटुंब असतं, दुसरीकडे गुलाबी पण कल्पनेतली स्वप्नं, प्रेमाच्या अधुर्‍या प्रॉमीस आणि जोडीदाराबद्दल प्रचंड ओढ असते.

हा मानसिक दबाव सहन होत नाही, दोन्हीपैकी कुणाची एक निवड करायची वेळ येते आणि बराचद्या ‘प्रेमभंग’ होतो.

चुटकीसरशी समस्या सोडवणारे, दुसर्‍याला सल्ले देणारे, मजबुत मनाचे, भलेभले लोक अशा स्थितीने बावचळुन जाऊन गार होतात. दुःख, मनाच्या वेदना कोणाला सांगण्याची सोय नसते, आणि मनाला समजावणं, स्वतःच्या कुवतीबाहेरचं असतं, मग कसलही प्रेमगीत आपलसं वाटु लागतं, कुठलही टुकार विरहगीत आपलीच दास्तान वाटतात, दिवसाला दहा आणि पायलीला पन्नास प्रेमावरच्या कविता सुचायला लागतात, छोटछोट्या गोष्टी नाजुक मनाला घायाळ करुन जातात, आठवणीने दाटुन येऊन डोळे उगाचंच ओले होतात,…

एक प्रकारे, आयुष्य जगण्यातला रसच संपतो.
कधी कधी दुःख हसर्‍या चेहर्‍याआड दडविले जाते खरे!…
पण वरवर चेहर्‍यावर हास्य ठेवलं तरी, मनातल्या मनात हे प्रेमवीर कुढंत राहतात….
ह्या सगळ्याने, आत्मविश्वास नष्ट होतो,
काही करुन दाखवण्याची वृत्ती खलास होते, आता कुणाचे उपदेशाचे डोस आणि सल्ले नकोसे असतात,
पुस्तकं वाचणं, अभ्यास करणं, असलं तर जीवावर येतं,
सगळ्या जगाचा प्रचंड राग येतो, चिडचिड वाढते.
जगण्यातला आनंद, चेहर्‍यावरचं हास्य हरवुन जातो,
काळजीने केस गळायला लागतात, चेहरा निस्तेज बनतो. बुद्धीही मंद बनते.

सहज म्हणुन अवतीभवती नजर टाकली तरी अशा भरपुर व्यक्ती तुम्हालाही दिसतील. यात कॉलेज ‘स्टुडंट्स’ पासुन कॉर्पोरेट जॉब करणारे ‘सिंगल’ जास्त आढळतील.

अशा वेळी, टिव्ही बघुन, वॉट्सएप, फेसबुक चाळुन कितीही मन रमवायचा प्रयत्न केला तरी राहुन राहुन पुन्हापुन्हा दुःख उफाळुन वर येतंच राहतं…
मग ह्या समस्येवर काही उपाय आहे का?

हो, आहे. कित्येक वर्षांपुर्वी मीही अशा मानसिक तणावातुन गेलो आहे. ही स्थिती भयानक आणि केविलवाणी असली तरी हा जीवनाचा शेवट नक्कीच नसतो, उलट अशा संकटात, दुःखद स्थितीत तावुन सुलाखुन निघालेलं मन पुढे प्रचंड निग्रही, कणखर आणि खंबीर बनतं, असाच माझा तरी अनुभव आहे.

अशाच किंवा इतर कसल्याही कारणाने तुम्ही नैराश्याचे डिप्रेशनचे शिकार झाला असाल, तर खालील उपाय वापरुन तुम्हीसुद्धा जगातली सर्वात जास्त आनंदी व्यक्ती बनु शकता.

 • भुतकाळ पुसुन टाका –
  भुतकाळात बर्‍या वाईट आठवणींच गाठोडं असतं,
  जोपर्यंत ते उर्जा देतं, तोपर्यंत ते सोबत बाळगायचं असतं, जर ते ओझं बनुन, जोखड बनुन, आपल्या आयुष्याची गति कमी करत असेल, त्रास देत असेल, मग मात्र दयामाया न दाखवता, त्याला झुगारुन देण्यातच खरा शहाणपणा असतो.
  जुन्या भेटवस्तु, किंवा त्रास देणारी प्रत्येक गोष्ट निर्दयीपणे फेकुन द्यावी, दुःख उराशी कवटाळुन बसण्यापेक्षा त्याची विल्हेवाट लावुन, आयुष्याची नवी सुरुवात करायला हवी.
  ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, त्यांच्याशी संबंध तोडणं, त्यांचे नंबर डिलीट करणं, त्यांना ऑनलाईन ब्लॉक करणं, नक्कीच कष्टदायक असतं. पण यातुन बाहेर पडल्याशिवाय यापेक्षा चांगलं घडणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहीजे.
 • मोठ्ठी स्वप्न पहा, मोठ्ठी ध्येयं ठरवा –
  आपलं मन खुप कलाकार आहे, ते रिकामं राहुच शकणार नाही, त्याला चघळण्यासाठी सतत काहीनकाही हवं असतं, तेव्हा जुन्या कष्टदायक अपुर्‍या स्वप्नांच्या बदल्यात, त्याहुन मोठ्ठी, उदात्त अशी स्वप्ने त्यात पेरली पाहीजेत, मोठमोठ्ठी ध्येय ठरवली पाहीजेत. रोज सकाळ संध्याकाळ ती मनात घोळवली पाहीजेत.
  उदा. माझं खुप छान करीअर सेट झालेलं आहे…
  सध्याच्या कमाईपेक्षा माझी कमाई पाचपट वाढलेली आहे….
  माझं खुप सुंदर जोडीदारासोबत लग्न झालेलं आहे, माझा सुखाचा संसार सुरु आहे…
  माझ्या कूटुंबातल्या प्रत्येकाला माझा खुप अभिमान आहे….
  मी एक आनंदी आणि प्रसन्न व्यक्तीमत्व आहे….
  असे विचार केल्याने आत्मप्रतिमा सुधारते, आत्मविश्वास बळावतो, एक नवी शक्ती मिळते…
 • स्वतः वर प्रेम करा –
  सगळ्यात महत्वाचं, आपण जगाच्या दृष्टीने तुच्छ कःपदार्थ नसुन, आपण स्वतः, जगातली एक आगळीवेगळी, एकमेव द्वितीय, महान व्यक्ती आहोत हे पुन्हा पुन्हा मनाला सांगा.
  अकांउंट मध्ये निनावी पैसे भरावेत तसे आपल्या आयुष्याच्या खात्यात रोज नवे चोवीस तास भरले जातात, ते काहीतरी भव्य दिव्य करुन दाखवण्यासाठीच असा विश्वास बाळगा.
  मी हातात घेतो, ते काम चिकाटीने पुर्ण करतो अशी जिद्द अंगात बाणवली की लवकरच तुम्ही तुमच्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल!..
 • स्वतःला गुंतवुन ठेवा –
  लक्षात घ्या, माणुस जेव्हा दुःखात बुडालेला असतो तेव्हा, एकटेपणा हाच त्याचा सर्वात मोठ्ठा आणि खरा शत्रु असतो.
  उदास राहणं, मोबाईलवर स्क्रोलींग करत लोळत पडणं, आळशीपणा हेच आपल्याला पुन्हा पुन्हा निराशेच्या गर्तेत ढकलतात. त्याउलट अशा वेळेस शरीराला खुप कष्ट करायला लावावेत, इतकंइतकं काम करावं की कामानं अक्षरशः थकुन जावं, स्वतःला कामात असं काही झोकुन द्यावं की रात्री ग्लानी यायला पाहीजे, पडल्या पडल्या एकदम शांत झोप लागली पाहीजे. कॉलेजात असाल तर जिममध्ये जा, वर्कआउट करा, एरोबिक्स, डान्सक्लास जॉईन करा, परवडत नसेल तर रोज दोन अडीच तास वॉकींग करा. दिवसातुन थोडा वेळ एकट्यानेच जोरजोरात गाणी लावुन मनसोक्त नाचा, अंग दुखेपर्यंत नाचा, शरीरातली उर्जा बाहेर पडुन, नव्या उर्जेचा संचार होईल.
 • गरजुंना मदतीचा हात द्या –
  बॉलीवुडचं एक जुनं पण, खुप सुंदर गाणं आहे.
  तुम बेसहारा हो तो किसीका सहारा बनो,
  तुम्हे अपने आप सहारा मिल जायेगा,
  पहुंचा दो कोई, कश्ती किनारेपे,
  तुम्हे अपने आप किनारा मिल जायेगा.
  ह्या जगाचा एक बेसीक नियम आहे, द्या म्हणजे मिळेल, स्मितहास्य द्या, स्माईल मिळेल, मान द्या, सन्मान मिळेल, आदर द्या, आपलेपणा मिळेल, बी लावा, झाड उगवेल, दान द्या, पैसे मिळतील. दिलेलं व्याजासकट वापस मिळतं, मग ते प्रेम असो वा इतर काहीही…
  थोडं, आजुबाजुच्या, इतर, गरजु लोकांच्या आयुष्यात डोकावुन बघा!.., बघा किती मोठ्मोठी संकटं झेलतायतं ते, त्यांच्यासमोर तर आपलं दुःख क्षुल्लक आहे, स्वतःचं दुःख विसरुन, आता त्यांना मदत करा, बघा, तुमच्या एखाद्या साध्या कृतीने, कूणाच्या चेहर्‍यावर हास्य फुललं, तर एक आत्मिक समाधान मिळेल.

प्रेमप्रकरणं आणि प्रेमभंग, जितकी साधी वाटतात, तितकी साधी नसतात, आयुष्यात उलथापालथ करणारी असतात, काही वर्षापुर्वी मीही ह्या गोष्टींचा चांगलाच अनुभव घेतला. फार भीषण वेळ असते ही, पण हातपाय गाळुन चालत नाही, निभवावीच लागते, इथं स्वतःला स्वतःचाच आधार देऊन सावरावे लागते.

मनापासुन प्रेम केलं, पण काही कारणाने, लग्न होवु शकत नाही, म्हणुन भुतकाळातील कडुगोड आठवणींना तलवार बनुन मनावर जखमा करुन घेण्याऐवजी, प्रत्येक बिकट प्रसंगात, त्या सुंदर आठवणींची ढाल बनवुन, आयुष्याची लढाई जिंकता येते. तुम्ही ढाल तलवार पैकी काय निवडता? ह्यावर तुमचा विजय अवलंबुन आहे.

यापुढे तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस अधिकाधिक आनंद घेऊन येवो, अशा मनःपुर्वक शुभेच्छांसह….

वाचण्यासारखे आणखी काही…..
मानवी जीवनाचा कल्पतरु – जीवनातला आकर्षणाचा नियम
डिएसके, तुमचं चुकलंच…
शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु…

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “प्रेमप्रकरणं, प्रेमभंग आणि नैराश्य याचा सामना कसा करावा?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय