मित्रांनो, आपल्या आरोग्याबद्दल जागरूकता असणे ही चांगली गोष्ट आहे.
आजकाल अनेक लोकं हेल्थ कॉन्शस असतात, विशेषतः तरुण वर्ग.
बदललेली आहार पद्धती, जीवनशैली, वाढलेली टेन्शन्स, स्ट्रेस याचा विचार केला तर हे हेल्थ कॉन्शस असणे गरजेचेच वाटते.
काही गोष्टींचा, जसे की कामाचा स्ट्रेस, व्यायामाचा अभाव, अपरिहार्यपणे आपल्याला स्वीकार करावाच लागतो.
या गोष्टींचा आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून आहारात शक्य असतील तेवढे बदल करणे महत्वाचे असते.
अशाच एका महत्वाच्या बदलाबद्दल हल्लीच एक लेख लिहिला होता, तो म्हणजे साखर जर आहारातून पूर्णपणे वर्ज केली तर त्याचे शरीराला कोणत्या प्रकारे फायदे होतात.
आहारातून साखर पूर्णपणे वर्ज केल्याने काय फायदे होतात…
साखर सोडण्याचे अनेक फायदे आहेतच. पण काही वेळेला किंवा प्रत्येकालाच ते जमेल असे नाही.
साखर नाही तर गोडाला पर्याय काय वापरू शकतो?
साखरेला गूळ हा पर्याय वापरला जाऊ शकतो. पण काही पदार्थांमध्ये जर साखर हवी असेल तर काय करावे?
किंवा काही आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा औषधांमध्ये सुद्धा साखरेचा वापर सांगितला जातो.
मग साखर जर हानिकारक असेल तर असे कसे शक्य आहे?
मित्रांनो, आपण घरी जी खातो ती असते रीफाईंड साखर.
पण खडीसाखर ही रीफाईंड साखरेच्या तुलनेत आरोग्यासाठी चांगली असते.
रीफाईंड साखरेचे अनेक दुष्परिणाम आहेत पण त्या मानाने कमी गोड असणारी ही खडी साखर योग्य प्रमाणात खाल्ली तर तिचे आपल्या आरोग्यासाठी फायदेच असतात.
म्हणूनच अनेक आयुर्वेदिक औषधामध्ये ती घ्यायला सांगतात.
रीफाईंड साखरेपेक्षा खडीसाखर चांगली असण्याचे एक महत्वाचे कारण असे आहे की खडीसाखरेत रीफाईंड साखरेच्या तुलनेत कमी कॅलरी असतात.
आयुर्वेद शास्त्रात असे मानले जाते की आपल्या शरीरातल्या त्रिदोषांचा, म्हणजेच कफ, वात व पित्त समतोल असावा.
या त्रिदोषांचा समतोल बिघडल्यास वेगवेगळ्या व्याधींना सुरुवात होते.
खडीसाखर हा समतोल राखायला मदत करते.
मग दोस्तांनो, खडीसाखरेचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे जाणून घ्यायला उत्सुक आहात ना?
मग हा लेख पुढे वाचा.
१. खोकल्यावर व आवाज बसण्यावर घरगुती उपाय
सर्दी, खोकला यासारख्या आजारांवर घरगुती उपाय अनेकदा लाभदायक ठरतात.
जर तुमचा खोकला खूप दिवस बरा होत नसेल, कफ साठून राहिला असेल तर त्यासाठी खडीसाखर हा एक प्रभावी उपाय आहे.
खडीसाखरेमुळे खोकला बरा होऊन घशाला आराम मिळतो.
तसेच जर तुमचा आवाज बसला असेल तर तो मोकळा होण्यासाठी सुद्धा खडीसाखरेचा वापर केला जाऊ शकतो.
यामुळे घशाला होणारा त्रास, दुखणे कमी होऊन घसा स्वच्छ व मोकळा होतो.
यामुळे बसलेला आवाज लवकर सुटतो. खोकल्यासाठी खडीसाखरेचा वापर दोन प्रकारे केला जाऊ शकतो.
खडीसाखर तोंडात धरून नुसती चघळल्याने खोकला येण्याचे प्रमाण कमी होते.
खोकल्याची ढास लागल्यावर तोंडात खडीसाखरेचा तुकडा धरावा.
आल्याचा रस काढून घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून खाल्ल्याने सुद्धा दीर्घकाळ असलेला खोकला बरा होतो.
२. हिमोग्लोबिन वाढते
आपल्या रक्तातील तांबड्या पेशींवर असणारे हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरातील इतर सर्व पेशींना ऑक्सिजन पोहचवण्याचे काम करत असते.
जर आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर शरीरातील इतर पेशींना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.
याला ऍनेमिया म्हणतात. थकवा जाणवणे हे ऍनेमियाचे प्रमुख लक्षण आहे.
जर तुम्हाला असा अशक्तपणा जाणवत असेल तर रक्ताची तपासणी करून हिमोग्लोबिनचे प्रमाण बघितले पाहिजे.
ज्यांना ऍनेमियाचा त्रास असतो त्यांच्यासाठी खडीसाखर अतिशय फायदेशीर आहे.
यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.
रोज सकाळी खडीसाखर दुधात घालून घेतल्याने फायदा होतो.
याशिवाय जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या बरोबर एका लहान डबीत नेहमी खडीसाखर बाळगू शकता.
कधी अचानक दमल्यासारखे वाटल्यास थोडी खडीसाखर चघळून खाल्ल्याने शक्ती येते.
३. खडीसाखर पाचक असते
तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला जेवणानंतर बडीशेप दिली जाते, पण या बडीशेपेबरोबर अजून काय दिले जाते याकडे तुमचे कधी लक्ष गेले आहे का?
हॉटेलमध्ये नेहमी बडीशेप आणि खडीसाखर असे एकत्र दिले जाते.
यामध्ये केवळ तोंड गोड व्हावे, खडीसाखरेची चव चांगली लागावी हा हेतू नसतो.
खडीसाखर ही सुद्धा बडीशेपेसारखीच पाचक असते.
यामुळे पचनसंस्था सुधारते. जेवणानंतर खडीसाखर खाल्ल्याने पचन चांगले होते.
यामुळे अपचनाच्या तक्रारी सुद्धा दूर होतात.
४. शरीरातील उष्णता कमी करते
बाहेरील तापमान वाढल्यावर शरीरातील उष्णता वाढते. अनेकांना उन्हाळ्यात हा त्रास होतो
यामुळे थकवा येणे, हातापायांची आग होणे यासारखे अनेक त्रास होतात.
खडीसाखर हा थंड पदार्थ असल्याने शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
जर तुम्हाला सुद्धा उष्णतेचा त्रास होत असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात रोज सकाळी उठल्यावर पाण्यात खडीसाखर विरघळवून ते पाणी प्यावे.
उष्णतेमुळे होणारा अजून एक त्रास म्हणजे नाकातून रक्त वाहने, ज्याला गुळणा फुटणे असेही म्हणतात.
हा त्रास सुद्धा सहसा उन्हाळ्याच्या दिवसातच होतो.
असे झाल्यास कांद्याचा वास देणे, डोक्यावर पाणी शिंपडणे याचबरोबर खडीसाखरेचा सुद्धा उपयोग होतो.
नाकातून रक्त वाहायला लागल्यावर तोंडात एक खडीसाखरेचा तुकडा धरावा.
यामुळे वाहणारे रक्त लवकर थांबते.
उन्हातून घरी आल्यावर तोंडात खडीसाखरेचा खडा टाकून पाणी प्यायल्याने उन्हाळा बाधत नाही.
५. वंधत्वावर गुणकारी
जी जोडपी गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असतील त्यांना खडीसाखरेचा फायदा होतो.
यामुळे विर्यातील शुक्राणूंची संख्या (स्पर्म काऊन्ट) वाढतो.
जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर खडीसाखरेचे पाणी दररोज घ्यावे.
६. डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली
दृष्टी सुधारण्यासाठी सुद्धा खडीसाखरेचा उपयोग होतो. तुम्हाला डोळ्यांचे काही विकार असतील तर तुम्ही रोज खडीसाखरेचे सेवन केले पाहिजे.
जेवणानंतर खडीसाखरेचे पाणी घेतल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात व दृष्टी सुधारते. मोतीबिंदूच्या त्रासावर सुद्धा खडीसाखर लाभदायक असते.
७. तोंडाच्या आरोग्यासाठी चांगले
आपण जे अन्न खातो त्याचे बरेचसे कण दातावर, दातांच्या फटीत आणि जिभेवर चिकटून बसतात.
यामुळे तोंडात जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू प्रमाणाबाहेर झाले तर त्यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
खडीसाखर या जीवाणूंच्या संख्येवर नियंत्रण आणते.
खडीसाखर चघळून खाल्ल्याने तोंडातील जीवाणू कमी होतात यामुळे तोंडाच्या, दातांच्या इन्फेक्शन्सपासून तुम्ही दूर राहू शकता
जर तुम्हाला सतत तोंड येण्याचा म्हणजेच तोंडात अल्सर होण्याचा त्रास असेल तर त्यावर सुद्धा खडीसाखर गुणकारी आहे.
यासाठी जेवण झाल्यावर खडीसाखरेचा एक छोटा तुकडा तोंडात ठेऊन चघळावा.
८. मानसिक थकवा घालवण्यासाठी
शारीरिक थकवा घालवण्यासाठी खडीसाखरेचा वापर करता येतो.
त्यासाठी तुमच्या जवळ तुम्ही सतत खडीसाखर ठेवली पाहिजे.
दमल्यासारखे वाटल्यावर पटकन खडीसाखर खाल्ली तर ती शक्तिवर्धक असते.
तसेच तुम्ही जर मानसिक ताणाखाली असाल, मानसिकदृष्ट्या थकला असाल तर त्यावर सुद्धा खडीसाखर उपयुक्त ठरते.
तुम्हाला जर ताण घेण्याची सवय असेल तर रोज सकाळी दुधातून अक्रोडाची पूड व खडीसाखर घ्यावी.
यामुळे तुमचा मानसिक थकवा दूर होईल आणि दिवसभर तुम्हाला उत्साही वाटेल.
९. बाळंतपणात आवश्यक
बाळंतपणात दुध वाढवण्यासाठी खडीसाखर उपयुक्त ठरते.
बाळ झाल्यावर आईला कोमट दुधाबरोबर दिवसातून दोनदा खडीसाखर द्यावी.
यामुळे शारीरिक व मानसिक थकवा दूर होऊन दुध येण्याचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होते.
निरोगी राहण्यासाठी थोड्या प्रमाणात, औषधासारखा खडीसाखरेचा वापर जरूर करावा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.