पैशाचा उड्डाणपूल बांधूया

Stock Exchange

शेअर बाजार म्हटलं की नुकसान-कर्ज-दिवाळखोरी-असंच चित्र डोळ्यासमोर उभे राहण्याचे दिवस आता राहिले नाहीत. पण अजूनही मराठी माणसाला शेअरबाजाराची आणि त्यातल्या गुंतवणूकीबद्दल जी अढी आहे ती नाहीशी झालेली नाही. योग्य वेळी कमीत कमी गुंतवणूक करणारा भवसागर तरून जातो आणि न करणारा भवसागरात बुडून जातो हे समजूनही अंगवळणी न पडणे ही आपली शोकांतीका आहे.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ. ह्यांचे व्यक्तीमत्व फार उत्तम. गाठीला चार पैसे बांधूनही होते. समस्या एकच होती- त्यांचं लग्न जमत नव्हतं.

कारण एकच. ते मुंबईच्या शेअरबाजारात नोकरीला होते. नोकरी करता करता अधूनमधून सट्टा पण करायचे. आता सट्टा करणार्‍याला मुलगी देणार कोण?

बर्‍याच वर्षांनंतर त्यांचं लग्न झालं. संसार मार्गी लागला. काल परवा एका लग्नात मला भेटले. मुलगा लग्नाचा आहे वगैरे सांगत होते.

मुलगा सीए आहे, एका म्युच्युअल फंडात फंड मॅनेजर म्हणून काम करतो आहे, हे सगळं सांगता सांगता हसायला लागले. मी हसण्याचं कारण विचारलं तर म्हणाले,

अहो, आमच्याच ओळखीतली पंचवीस स्थळं आलीत सांगून. निर्णय घेणं कठीण झालं आहे. बाप सठीसामाशी सट्टा करायचा तर केवढी अडचण लग्नाला आणि मुलगा रोज सट्टा करतो तर ढिगभर स्थळं.

साधारण दहा पंधरा वर्षात समाजमनात किती फरक पडला आहे हे सांगण्यासाठी हा किस्सा सांगीतला.

शेअर बाजार, सट्टा असं काही म्हटलं की नुकसान-कर्ज-दिवाळखोरी-असंच चित्र डोळ्यासमोर उभे राहण्याचे दिवस आता राहिले नाहीत.

पण अजूनही मराठी माणसाला शेअरबाजाराची आणि त्यातल्या गुंतवणूकीबद्दल जी अढी आहे ती नाहीशी झालेली नाही. योग्य वेळी कमीत कमी गुंतवणूक करणारा भवसागर तरून जातो आणि न करणारा भवसागरात बुडून जातो हे समजूनही अंगवळणी न पडणे ही आपली शोकांतीका आहे.

मुळात मनात पैशाची सांगड पाप पुण्याशी घातलेली आहे ती वर्षानुवर्षाच्या गरीबीने. त्यामुळे गुंतवणूकीला सट्टा समजणारी आपण माणसे.

जास्त पैसे कमावणे-गरजेपेक्षा चार पैसे जास्त खिशात असणे- याची पण आपल्याला भीती. मराठी माणसाची (शेअर बाजारातील) प्रतिमा उत्तम नोकरी करणारा माणूस अशी आहे.

सचोटीने काम करणे हे त्याचे भांडवल आहे. त्यामुळे कर्ज देणार्‍याला हवी तशी प्रतिमा (प्रोफाईल) मराठी माणसाची आहे. त्यामुळे गरजेला कर्ज घेणारा मराठी माणूस गूंतवणूक करून पैसे कमावण्याच्या मार्गाला न जाता कर्ज काढून गरज भागवण्याच्या मागे असतो.

सहाजिकच आहे की मराठी माणसाच्या हातात शेअरबाजारातला एकही शेअर नसेल पण को-ऑपरेटीवह क्रेडीट सोसायटीचे शेअर पगाराच्या पहिल्या दिवशी असतील.

कदाचित ही विधाने अतिरंजित वाटत असतील तर फोर्टमधल्या एखादया पेपर स्टॉलवर नजर ठेवा. बर्‍याच वेळा नव्या नोकरीचे फॉर्म आणि शेअर्सच्या नव्या इश्युचे फॉर्म एकाच पेपरवाल्याकडे असतात.

तासाभरात पन्नास नोकरीचे फॉर्म विकले जातात पण आमचा मराठी माणूस फुकट मिळणारा गुंतवणूकीचा फॉर्म उचलताना दिसणार नाही.

पण नोकरीतला माणूस दरवर्षी गरीब होत जातो हे सत्य आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला पगार मिळतात वर्षभरात फक्त बारा.

 • त्यापैकी एक फंडात जमा होतो.
 • एक आयकरात जातो.
 • एक वैयक्तीक कर्ज फेडण्यात जातो.
 • एक पगार लग्न-बारशी किंवा इतर सामाजिक जबाबदार्‍यांसाठी.
 • अचानक उदभवणार्‍या समस्यांसाठी एक पगार जातो.
 • एक पगार विम्याचे हप्ते भरण्यात.
 • हातात उरले पगार सहा. त्यात खर्च चालवायचा बारा महिन्यांचा. पुढच्या दोन वर्षात महागाई वाढली की हे प्रमाण पाच पगार आणि बारा महिने असे होईल.

म्हणजे एकूण अंदाजपत्रक असलंच तर ते तूटीचे आहे. मग आपला संसार चालतो कसा? तो चालतो कर्ज काढून किंवा हातात अचानक लाभानी येणारे पैसे वापरून.

दरवर्षी नवीन कर्ज काढून किंवा असलेल्या कर्जाची मुदत वाढवून. थोडक्यात काय तर आगामी भविष्यकाळातील मिळणारा वाढीव पगार वर्तमान काळातच संपून जातो.

मग या दुष्टचक्रातून सुटका होणार कशी?

दरवर्षी पैसे कमी पडत असल्याची भावना वारंवार जागृत झाल्यावर खटपट सुरु होते जास्त पैसे मिळवण्याच्या सोप्या तोडग्यांची. आणि मग आपली गाठ पडते पैसे खाणार्‍या लांडग्यांशी.

हे लांडगे वेगवेगळ्या नावानी आपल्या समाजात फिरत असतात. कधी त्यांचे नाव कल्पवृक्ष असते तर कधी शेरेकर, तर कधी उदय आचार्य तर कधी लिमोझीन.

गेल्या दहा वर्षात अशा लांडग्यांनी आपल्याला जवळ जवळ दहा हजार कोटींना नागवले आहे. कल्पवृक्ष मार्केटींग, सीयु मार्केटींग, शेरेकर वगैरे वगैरे.

या उल्लेख केलेल्या कंपन्यांनी प्रत्येकी जवळ जवळ पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा अपहार केला आहे. गरीब गुंतवणूकदारांचे प्रॉव्हीडंट फंडाचे पैसे, स्वेच्छा निवृत्तीचे पैसे, अडीनडीला घरात असावेत म्हणून गृहीणींनी ठेवलेले पैसे, बँकेपेक्षा चार पैसे जास्त मिळतील म्हणून ठेवलेले पैसे तळहातावर ताजमहाल दाखवून या कंपन्यांनी खाऊन टाकले.

आज ह्या घोटाळ्यांतील सगळे प्रवर्तक जामिनावर सुटून बाहेर आलेले आहेत.

खटले न्यायालयात चालू आहेत. भारतातील न्यायसंस्थेचा वेग पहाता हे खटले संपेपर्यंत बहुतेक प्रवर्तकांचे वृध्दापकाळानी गमन झालेले असेल.

मुंबईत अशा अनेक नव्या कंपन्या येतात आणि पैसे नाहीसे होतात. पोलीस केस होते. प्रकरण न्यायप्रविष्ट होते.

आरोपींना जामीन मिळतो. जामीन ते सुनावणी यात जवळ जवळ सहा-सात वर्षांचे अंतर जाते.

बरेच आरोपी गहाळ होतात. काही साक्षीदार देवाघरी जातात. तपासणी अधिकारी निवृत्त होतात.

कागदावर अवलंबून असलेली केस कागदासोबतच जीर्ण होत जाते. नवीन लांडगे येतात.

नविन केस होते आणि हे असेच वारंवार होत राहते कारण न्यायप्रविष्ट झाल्यावर चौकशी अधिकार्‍याचा रस संपतो.

तक्रार करणारा कोर्टात फिरकेनासा होतो. तक्रारदाराची भूमिका पैसे वसूलीची असते. आरोपीला शिक्षा होण्यात गुंतवणूकदाराला रस नसतो. एक घोटाळा संपला तरी दुसरा चालू होतोच आणि आपण परत गरीबीच्या दारात उभे !!!!!!

या लांडग्यांच्या तोंडी घास घालण्यापेक्षा तेच पैसे फक्त आय.पी.ओ. म्हणजे नव्या कंपन्यांच्या निर्धोक गुंतवणुकीत टाकले असते तर काय झाले असते ते पहा.

फक्त २०१९ चा विचार करा. समजा गुंतवणुकीची सुरुवात जानेवारी महिन्यापासून केली असती तर डिसेंबरपर्यंत प्रत्येक गुंतवणुकीवर चाळीस टक्क्याचा नफा झाला असता.

म्हणजे एक वर्षात एका लाखाचे कमीतकमी दोन लाख झाले असते. आणि आपले पैसे आपल्याच ताब्यात राहिले असते. थोडक्यात या गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर येण्याचा एकच रस्ता आहे तो म्हणजे सुयोग्य गुंतवणूकीचा.

आता एक प्रश्न मनात नक्की येईल तो म्हणजे मी गुंतवणूक का करायची? कारण तुमची बचत खात्यातली रक्कम अडीच ते तीन टक्के व्याज देते, मुदतबंद खात्यावर परतावा फक्त आठ टक्के मिळतो आणि महागाई दहा टक्क्यानी वाढते.

म्हणजे दरवर्षी बचतीची किंमत वाढण्याऐवजी कमी होत जाते आहे. महागाईवर मात करायची असेल तर महागाईपेक्षा जास्त दरानी वाढ होईल अशाच क्षेत्रात जायला हवे. यासाठी अनेक रस्ते आहेत.

 • शेअर बाजारात गुंतवणूक
 • कमोडीटी बाजारात गुंतवणूक करणे
 • फॉरेन एक्सेंजची खरेदी विक्री म्हणजेच फॉरेक्स मार्केट

आता या तीनही गुंतवणुकीत रिस्क फॅक्टर हा जास्त आहेच. पण जास्त परतावा मिळावा म्हणून पॉन्झी स्कीम्सकडून फसवणूक न करून घेता या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये पूर्ण अभ्यासअंती उतरणं हे कधीही चांगलं.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची माहिती देणारे लेख येथे वाचा:

नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (SIP म्हणजेच Systematic Investment Plan)
म्यूचुअल फंड योजना कशा काम करतात?

तीन पर्यायातून कुठलाही निवडा. दर महिन्यात, दर आठवड्यात, दर दिवशी उत्पन्न मिळवून देणारे तीन सोपान आहेत. सोपे आहेत म्हणून ते सोपान आहेत. सुरुवात मात्र शेअर बाजारातून करायला हवी.

चला तर सुरुवात करू या डीमॅट अकाउंट सुरु करण्यापासून. हे डिमॅट खाते आहे तरी काय? फार सोपे आहे.

आपण पैसे बचत करण्यासाठी बँकेत खाते उघडतो. तसेच शेअर घेऊन जमा करण्यासाठी आणि विक्री केल्यानंतर काढण्यासाठी जे खाते असते त्याला म्हणतात डीमॅट खाते.

आता या खात्यात जमा करण्यासाठी शेअर बाँबे स्टॉक एक्स्चेंजमधून(BSE) किंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधून(NSE) विकत घ्यायला हवेत.

या बाजारात खरेदी करण्यासाठी आपल्याला ब्रोकर किंवा मराठीत ज्याला आपण दलाल म्हणतो त्यांच्या मार्फत जावे लागते. तुमच्या पसंतीनुसार दलाल निवडा आणि त्याच्याकडे ट्रेडींग खाते उघडा.

थोडक्यात आता तुमच्याकडे तीन खाती झाली. एक तुमचे बचत खाते, दुसरे डीमॅट खाते, तिसरे ट्रेडींग खाते.

बचत खाते बँकेत उघडताना जी कागदपत्रे लागतात तीच कागदपत्रे बाकीची दोन खाती उघडताना लागतात.

ही खाती सुरु केली की शेअरबाजारात येण्याची तयारी पूर्ण झाली.

पुढच्या भागात आपण शेअर कधी घ्यायचे, किती घ्यायचे, का घ्यायचे आणि घेतलेल्या शेअरची विक्री कधी करायची याचा विचार करणार आहोत. पण तो पर्यंत खाती उघडून तयार रहा.

आता गुंतवणूक करायची म्हणजे भांडवल हवे. भांडवल म्हणजे डोळ्यासमोर लाखाचे आकडे यायला नकोत. हाताशी असलेल्या पाचशे रुपयापासून ते विस-पंचवीस हजारातही हा व्यवसाय सुरू करता येतो.

दुसरा प्रश्न असा की वेळेची गुंतवणूक किती? सुरुवातीला ट्रेन मधून येण्याजाण्याचा वेळ वाचनाला द्यावा आणि व्यवहारासाठी दहा ते पंधरा मिनीटे. मग हा आटापिटा करून मिळकत किती होणार? समजून व्यवहार केला तर मुद्दल सुरक्षित ठेवून वर्षाकाठी मुद्दलावर चाळीस टक्के कमावणे फारसे कठीण नाही.

आता विचार करा दोन वर्षात आपले पैसे आपल्याच हातात ठेवून दुप्प्ट होत असतील तर महीन्याला सात आठ टक्के देणार्‍या धोकादायक स्किम कडे कशाला जा?

चला, शेअरबाजाराचा पासपोर्ट घेऊ या. हा पासपोर्ट म्हणजे काय तर डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट ही पैसे कमावण्याची पहिली पायरी. श्रीमंत व्हायचा प्रारंभ करू या !!

या वर्षी मी पैसा कमावणार, माझी गुंतवणूक मीच करणार, माझा नफा मीच कमावणार आणि माझी कर्जे मीच फेडणार. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक आर्थिक अडचणींवर उड्डाणपूल बांधण्याचा कार्यक्रम मी या नवीन आर्थिक वर्षात सुरु करणार.

सौजन्य: अर्थसाक्षर

वाचण्यासारखे आणखी काही…..

शेअरबाजार- आक्षेप आणि गैरसमज
तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार!
पैशास पत्र….

लेखक –रामदास

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

7 Responses

 1. Amit shedge says:

  Nice sir

 2. Radhesham says:

  Very helpful article for biginer

 3. पूजा नाखले says:

  उफयुक्त सर

 4. संदिप पाटिल सर says:

  खुप छान सर…

 5. Shobha Wagle says:

  V nice n best informative article.

 6. सुहास says:

  मोठ्या आशेने मी ही पोस्ट वाचत होतो. काही खास माहिती मिळेल असे वाटले होते. परंतु निराशा झाली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!