नवरात्र आणि उपवास

नवरात्र म्हणजे चैतन्याचा उत्सव, स्त्रीशक्तीचा जागर आणि सृजनाचे पूजन.

आपल्या संस्कृतीत या दिवसात उपवास करण्याची प्रथा आहे. विविध प्रांतातील उपवासाचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी पूर्ण निराहार, काही ठिकाणी एकभुक्त म्हणजे एक वेळ जेवणे, काही ठिकाणी फलाहार तर काही उपवासाचे खास पदार्थ या दिवसात खाल्ले जातात.

आयुर्वेदानुसार उपवासाचे महत्त्व हे शरीरशुद्धीशी जोडले आहे. उपवास किंवा लंघन याला आयुर्वेदात चिकित्सेचा दर्जा दिलेला आहे.

लघु म्हणजे हलके. या शब्दानुसार शरीराला हलकेपणा आणणारा आहार किंवा क्रीया म्हणजे लंघन. उपवास करणे ही एक प्रकारची उपचार पद्धतीच आहे.

मानवी शरीरात अन्न सेवन केल्यानंतर ते जठरात जाते आणि तिथे ते पचविण्याची क्रीया सुरू होते. ह्या पचन क्रियेसाठी आवश्यक असतो तो पाचकाग्नी. जेव्हा आपण उपवास करतो त्यावेळी या पाचकाग्नीला पचवण्यासाठी अन्न मिळत नाही.

मग तो शरीराच्या अंतर्गत साठलेले दोष शोधून त्यांचे पचन करतो.

आयुर्वेद शास्त्रानुसार, रोग होण्यासाठी कारणीभूत ठरतो आमदोष. आम म्हणजे न पचलेले, सडलेले अन्न आतड्यांच्या ठिकाणी साठून निर्माण होणारी अशुद्धी.

हा आम चिकट आणि जड गुणधर्म असणारा आहे. हा शरीरात ठिकठिकाणी अवरोध म्हणजे अडथळा निर्माण करतो.

आमदोषामुळे शरीरात जडपणा जाणवतो, आळस, जास्त झोप येणे, चव न जाणवणे, मळमळ, अजीर्ण, अपचन, बद्धकोष्ठता, सांधेदुखी, ज्वर अशी अनेक लक्षणे दिसून येतात.

थोडक्यात म्हणजे उत्साह हरवून मरगळ येणे.

आपल्या शरीरात आम का निर्माण होत असावा याचा विचार केला तर लक्षात येईल की आपण आज ज्याप्रकारे जगतोय तीच जीवनशैली याला कारणीभूत आहे.

धावपळीचे जीवन, जेवणाच्या अनियमित वेळा, भूक नसताना खाणे, तेलकट पदार्थ जास्त खाणे, बैठी जीवनशैली, शारीरिक श्रमाची वानवा, जागरण , टेन्शन, डेडलाईन्स एक ना दोन कित्येक कारणे.

याला कारणीभूत अनेक घटक आहेत. जागतिकीकरण आणि त्यामुळे बदललेल्या कामाच्या वेळा, पार्टी कल्चर, जंकफूड इत्यादी.

पूर्वी घरातील सर्व कामे ही शारीरिक श्रमाची कामे होती. विहीरीवर रहाटाने पाणी ओढणे, जात्यावर दळण, पाट्यावर वाटणे, कपडे धुणे. पण आता सर्व कामांसाठी यंत्रे उपलब्ध आहेत. मिक्सर, वॉशिंग मशीन, डिश वॉशर या यंत्रांनी आयुष्यात सुखसोयी आणल्या पण श्रमांना हद्दपार केले. त्यामुळे लवकरच हे सुखासीन जीवन आपल्या शरीरावर चरबीचे थर चढवते.

स्थूलता, हृदय विकार, थायरॉईड, ब्लडप्रेशर हे सर्व लाईफस्टाईल डिसीजेस अर्थात चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे रोग आहेत. आणि यावर उपाय म्हणजे योग्य, आरोग्यपूर्ण जीवनशैली जगणे.

काळाबरोबर बदलत असताना हे बदल आपल्या शरीराला रोगांचे माहेरघर तर बनवत नाहीत ना हे तपासून पाहिले पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या करताना त्यात फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा लक्षात घेतले आहे.

आयुर्वेद तर त्याहीपुढे जाऊन सांगतो की शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अश्या तिन्ही पातळ्यांवर समतोल म्हणजे संपूर्ण, निरोगी असे, स्वास्थ्य असे आरोग्य हवे असेल तर उपवासाचे खूप फायदे होतात. वर सांगितल्याप्रमाणे पाचकाग्नि दोषांचे पचन करू लागला की साहजिकच शरीरात हलकेपणा येतो.

पचन संस्थेवर आलेला अनावश्यक ताण कमी होतो. तोंडाची गेलेली चव परत येते, आम्लपित्त, अपचनाचा त्रास कमी होतो. वजन कमी होतेच पण शरीरात एक प्रकारची ऊर्जा, स्फूर्ती जाणवते. आळस, मंदपणा, थकवा दूर होतो. डोळ्यांचे जडत्व, अती झोप हे सर्व त्रास कमी होतात.

पण आजकाल आपण पाहतो की काही लोक फक्त वजन कमी करणे हा एकमेव हेतू ठेवून उपवास करतात. हे मात्र योग्य नाही.

किंवा ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून, दुसऱ्या कोणीतरी सांगितले, त्याला फायदा झाला म्हणून आपणही अंधानुकरण करू नये.

उपवासाचे एक शास्त्र आहे. ते आपल्या वैद्यांकडून नीट समजावून घ्यावे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती निराळी असते त्यानुसार तिची आहाराची गरज पण वेगवेगळी असते. साधारणपणे पित्त प्रकृतीच्या लोकांनी निराहार उपवास केला तर त्यांना सहन होत नाही. अश्यावेळी ताक, सरबत किंवा एखादे फळ खावे. काही लोकांना उपवास सहन होतो त्यांनी दिवसभरात गरम पाणी वारंवार प्यावे. यामुळे शरीराची खोलवर सफाई होते.

सर्व अवरोध निघून जातो. याचप्रमाणे वयोवृद्ध व्यक्ती, गरोदर महिला, लहान मुले यांनी उपवास करताना आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने योग्य ते नियोजन करावे. अन्यथा शरीरावर घातक परिणाम होतात.

नवरात्रात उपवासाचे महत्त्व काय?

नवरात्र उत्सव हा शरद ऋतुत साजरा केला जातो. म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात.

यावेळी पावसाचे प्रमाण कमी होते आणि वातावरणातील उष्णता हळूहळू वाढत जाते. त्यामुळे शरद ऋतु हा पावसाळा आणि थंडी यांच्यामधील ऋतु संधी किंवा बदलांचा काळ आहे. पावसाळ्यात दमट, कुंद हवेमुळे पचनशक्ती मंदावते आणि शरद ऋतुतील उष्णता शरीरात पित्त वाढवते.

म्हणून या दिवसात पचनाशी संबंधित रोग आणि वाताचे विकार वाढलेले आढळतात. पित्त वाढल्याने रक्तातील दोष निर्माण होतात त्यामुळे ज्वर, डोकेदुखी, त्वचाविकार सुद्धा जास्त प्रमाणात होतात.

अश्यावेळी केलेल्या उपवासामुळे हे साठलेले दोष निघून जातात. विशेषतः जुनाट त्वचाविकार लवकर बरे होतात.

उपवासाच्या नावाने शेंगदाणे, बटाटा असे पदार्थ मात्र खाऊ नयेत. त्याऐवजी राजगिरा, वऱ्याचे तांदूळ, ताक असा हलकाफुलका आहार घ्यावा.

उपवासाचे जसे शारीरिक परिणाम होतात तसेच मानसिक परिणाम सुद्धा होतात. शरीराप्रमाणे मनाला हलकेपणा येतो. मनाचे जडत्व म्हणजे आळस, मंदपणा, निरूत्साह जाऊन याउलट चपळाई, कोणतेही काम करण्याची इच्छाशक्ती म्हणजे मनाच्या आरोग्याची खूण.

आपल्या संस्कृतीत महात्मा गांधी, विनोबा यांनी वेळोवेळी उपवास आणि मौन यांचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे. मौन म्हणजे सततची बडबड न करता वाणी द्वारे केलेला उपवासच आहे.

यामुळे मनाची मूळची बाह्य वृत्ती आतल्या बाजूला वळवली जाते. यालाच आपण कॉर्पोरेट भाषेत म्हणतो इंट्रोस्पेक्शन. स्वत:चा स्वतः आढावा घेणे.

आपल्यातील कमतरता, दोष शोधणे. असं म्हणतात की मौनाची भाषा खूप बोलकी असते. याचा अर्थ असा की आपण शांतपणे जेव्हा स्वतःचे परीक्षण करतो तेव्हा अधिक चांगल्या प्रकारे स्वतःला ओळखतो. आणि मग दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यासाठी संधी मिळते.

उपवासाचा आध्यात्मिक पातळीवर सुद्धा फायदा होतो. आणि त्यासाठी आजच्या युगात करायचा नवीन प्रकारचा उपवास अर्थात डिजिटल उपवास !!!

आजकाल अन्न, वस्त्र, निवारा आणि याचबरोबर सोशल मिडिया हे जगण्यासाठी आवश्यक झालेले आहे.

सोशल मिडिया आणि आध्यात्मिक आरोग्य यांचा संबंध काय असा प्रश्न निश्चितच तुमच्या मनात येईल. त्यासाठी आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे काय हे समजावून घेऊ.

आपण सर्व जण परमेश्वरी शक्तीचा अंश आहोत. शिवोsहम् अर्थात मी शिवाचा अंश आहे. त्यामुळे माझे मूळ स्वरूप हे आनंद, शांती, समाधान यांनी भरलेले आहे. या गोष्टीची सतत जाणीव असणे आणि त्याप्रमाणेच जगणे म्हणजे आध्यात्मिक जीवन.

पण आताच्या काळात सतत आपल्यावर चहूबाजूंनी माहितीचा भडीमार होत असतो. ही माहिती किंवा ज्ञान पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही की त्याचे सुद्धा अजीर्ण होते.

आणि मनात नकारात्मक भाव निर्माण होतात. राग, मत्सर, ईर्ष्या या भावना जास्त प्रमाणात निर्माण झाल्या की आपला आनंद, शांती, समाधान भंग पावते.

आणि आध्यात्मिक आरोग्य डळमळीत होते. अश्यावेळी डिजिटल उपवास हा उत्तम उपाय. दिवसातून काही ठराविक वेळ मोबाईल, लॅपटॉप, कंम्प्युटर पासून लांब रहायचे. इतकेच काय नकारात्मक बातम्या, हिंसा, शिवीगाळ दाखविणारे चित्रपट, मालिका, वेबसिरीज यापासून जाणीवपूर्वक दूर रहाणे.

खरंच याचा खूप छान उपयोग होतो. किमान रात्री झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल बंद करून ठेवायची सवय लावावी. यामुळे झोप चांगली लागते.

याशिवाय ध्यानधारणा, प्राणायाम, ओंकार, मंत्रोच्चार यांचा मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर खूप छान उपयोग होतो.

एकंदरीत सजगता बाळगून घेतलेला योग्य आहार आणि त्याला पूरक असणाऱ्या कृती यामुळे आपल्या आयुष्यात समतोल साधला जातो. हे संतुलन राखण्यासाठी उपवास करून या नवरात्रीत आरोग्याचा लाभ करून घेता येईल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय