“काही नाही हो, जरा टाॅन्सिल्सचा त्रास आहे. ही औषधे घ्या, गरम पाणी प्या.. वाटेल बरं..” असं तुम्ही स्वतःच्या बाबतीत किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत डॉक्टरांकडून नक्की ऐकले असेलच.
खरेतर हा त्रास जास्त करून लहान मुलांमध्येच, विशेषतः थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात दिसून येतो.
घसा दुखणे, ताप येणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत.
टाॅन्सिल्सचा त्रास होतो म्हणजे खरेतर टाॅन्सिल्स या अवयवाला सूज येते.
टाॅन्सिल्स हे अवयव कोणते कार्य बजावतात आणि त्यांना सूज कशी येते, ती कमी कशी करायची, त्यासाठी काय काळजी घ्यायची आणि काय घरगुती उपाय करायचे हे आज ये लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
टाॅन्सिल्स या आपल्या घशाच्या मागच्या बाजूला असलेल्या ग्रंथी आहेत.
या ग्रंथींचे काम म्हणजे शरीरात जेव्हा जीवाणू किंवा विषाणू घशावाटे शिरकाव करायला बघतात तेव्हा त्यांना तिथेच अडकवून मारून टाकायचे काम या ग्रंथी करत असतात.
म्हणजेच टाॅन्सिल्स हे आपल्या रोग प्रतिकारशक्तीची पहिली ढाल असतात.
शरीरात व्हायरस किंवा बॅक्टेरीया शिरल्या शिरल्या त्यावर ऍटॅक करण्याचे काम टाॅन्सिल्स करतात.
पण याचमुळे कदाचित, अनेक जीवाणू आणि विषाणूंच्या संपर्कात आल्याने तिथे सतत इन्फेक्शन होऊन सूज येत असते.
यालाच वैद्यकीय भाषेत ‘टाॅन्सिलायटीस’ असे म्हणतात.
‘टाॅन्सिलायटीस’ होण्यामागे मुख्य कारण हे विषाणू (व्हायरस) असतात.
पण काही वेळेला काही जीवाणूंमुळे (बॅक्टेरीया) सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकते.
टाॅन्सिलायटीसची लक्षणे काय असतात?
१. घशात सूज येऊन, लाल दिसणे. (सूज ही टाॅन्सिल्स ग्रंथींना येते.)
२. टाॅन्सिल्स वर इन्फेक्शनचे पॅचेस दिसणे.
३. घशात, गिळताना आणि बोलताना सुद्धा प्रचंड प्रमाणात दुखणे.
४. थंडी भरून ताप येणे.
५. घसा बसणे.
६. डोकेदुखी, मानदुखी.
७. कानदुखी
हे इन्फेक्शन लहान मुलांमध्ये होण्याचे मुख्य कारण हेच आहे की, लहान मुले एकमेकांबरोबर खेळताना अनेक जीवाणूंच्या, विषाणूंच्या संपर्कात येतात त्यामुळे ते सारखे आजारी पडण्याची शक्यता असते.
मुलांना सारखे असे इन्फेक्शन्स होऊन त्यांना टाॅन्सिलायटीस होण्याची शक्यता जास्त असते.
यापैकी बॅक्टेरीयल टाॅन्सिलायटीस झाला तर त्यावर उपाय म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या ऍन्टीबायोटिक गोळ्या घेणे आणि आराम करणे.
पण व्हायरल टाॅन्सिलायटीसवर मात्र ऍन्टीबायोटिक गोळ्यांचा काही परिणाम होत नाही.
अशावेळेला डॉक्टर फक्त ताप किंवा सर्दी कमी व्हायला औषधे देतात किंवा दुखणे कमी व्हावे यासाठी गोळ्या लिहून देतात.
पण बाकी उपयोग होतो तो आराम आणि घरगुती उपयांचाच, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
याचमुळे बऱ्याचदा मुलांना डॉक्टरांकडे नेल्यावर डॉक्टर व्हायरल आहे असे सांगून औषधे लिहून देऊन आराम करण्याचा सल्ला देतात.
टाॅन्सिल्सच्या त्रासावर कोणते घरगुती उपाय करावे?
१. दिवसभर भरपूर प्रमाणात गरम पाणी, चहा, कॉफी, सूप घेत राहावे. यामुळे घशात होणारी विषाणूंची वाढ थांबेल.
२. आराम करावा ज्यामुळे शरीर स्वतःच इन्फेक्शनशी लढा द्यायला तयार होईल.
३. व्हिटामिन ‘सी’ जास्त प्रमाणात असणारी फळे घ्यावीत ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल.
४. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याने घशाला आराम मिळतो आणि आवाज बसला असेल तर तो सुटायला मदत होते.
५. गरम पाण्याची वाफ घेतल्याने सर्दी मोकळी होते आणि सर्दीमुळे होणारी डोकेदुखी सुद्धा कमी होते.
६. जेष्ठमध हे घशाच्या विकारांसाठी, खोकल्यावर अत्यंत प्रभावी औषध आहे.
चवीला गोड असल्याने मुलांना सुद्धा ते द्यायला त्रास होत नाही. जेष्ठमधाचा तुकडा मुलांना तोंडात चघळल्याने घसा दुखणे कमी होते.
७. सुंठ, हळद, तुळशीची पाने आणि मिरी घालून केलेल्या चहामध्ये, एक चमचा मध घालून प्यायल्यास घशाला आराम मिळतो.
टाॅन्सिलायटीस बरा व्हायला सहसा ७ ते १० दिवस लागतातच. ‘व्हायरल टाॅन्सिलायटीस’ बरा व्हायला जास्त दिवस लागतात कारण त्यावर काहीच औषध नाही पण ‘बॅक्टेरीयल टाॅन्सिलायटीस’ मात्र औषधे घ्यायला लागल्यापासून साधारण ३ ते ४ दिवसात बरा होतो.
कोणतीही ट्रीटमेंट चालू असली तरी पुष्कळ पाणी पिणे आणि भरपूर आराम करणे या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत.
काही वेळेला मात्र जर मुलांना सारखाच टाॅन्सिलायटीस होत असेल तर मात्र ऑपरेशन करून ते काढावे लागतात.
जर टाॅन्सिल्स सारखे इन्फेक्शन्स होऊन पूर्णपणे खराब झाले असतील तर सहसा हा निर्णय घेतला जातो.
जर मुलांचा ताप, खोकला बरा झाला नाही, त्यांना घसा दुखत असल्यामुळे खायला, प्यायला फारच त्रास होत असेल, अजिबातच आराम वाटत नसेल तर मात्र लगेच डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जाणेच हिताचे आहे.
मुलांना हा त्रास वारंवार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची? टाॅन्सिलायटीस हा संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे त्याचा प्रसार थांबवण्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी.
१. सतत हात धुतले पाहिजेत. शाळेतून आल्यावर, खेळून आल्यावर, जेवणाच्या आधी किंवा काही खाण्याच्या आधी मुलांना हात धुवायची सवय लावली पाहिजे.
२. मुलांना शाळेत चमचे, डबा, बाटल्या या एकमेकांच्या वापरायच्या नाहीत हे शिकवले पाहिजे.
कारण असे केल्याने एका मुलाला झालेले इन्फेक्शन सगळ्यांना व्हायला वेळ लागणार नाही.
३. मुलांना जर टाॅन्सिलायटीस होऊन बरा झाला असेल तर त्यांचे जुने दात घासायचे ब्रश टाकून नवीन वापरायला द्यावेत.
जुन्या ब्रशवर जीवाणू/विषाणू अडकून राहण्याची शक्यता असते.
४. मुले आजारी पडली तर त्यांना पूर्ण बरे वाटेपर्यंत घरीच आराम करू द्यावा.
५. आजारी मुलांना शाळेत पाठवून, क्लासला किंवा खेळायला पाठवून रोगाचा प्रसार करू नये.
त्यांना सुद्धा या जबाबदारीची जाणीव करून द्यावी आणि त्यांना पूर्ण बरे वाटल्यावरच बाहेर, इतर मित्रांकडे पाठवावे.
६. मुलांना खोकताना, शिंकताना तोंडासमोर रुमाल धरायची सवय लावावी.
लहान मुलांमध्ये अतिशय कॉमन असणारा हा आजार सहसा अपोआपच बरा होतो, त्यातून इतर गुंतागुंतीच्या समस्या सहसा होत नाहीत.
तो लवकर बरा व्हावा आणि प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी भरपूर आराम, व्हिटामिन ‘सी’ आणि सतत पाणी पिणे या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत.
काहीवेळेला मात्र मुलांना खूपच त्रास होत असेल तर ऑपरेशन करण्याच्या सल्ला डॉक्टर देतात.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.