फळांमध्ये व्हिटामिन, मिनरल्स खूप जास्त प्रमाणात आढळतात, त्यांच्यात पाण्याचे प्रमाण सुद्धा जास्त असते.
त्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक म्हणून आपण फळांचा समावेश नियमितपणे आपल्या आहारात करत असतो.
भाज्या तर आपल्या जेवणातील अविभाज्य घटकच आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की ही फळे, भाज्या ज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या व गरजेच्या असतात, पिकवताना त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स, पेस्टीसाईड्स म्हणजेच कीटकनाशके खूप जास्त प्रमाणात फवारली जातात.
बऱ्याचदा फळे व भाज्या तयार झाल्यावर सुद्धा ती ताजी रहावीत, टवटवीत दिसावीत यासाठी त्यावर केमिकल फवारले जातात.
आपल्याला बाजारात उपलब्ध असणाऱ्या या भाज्या व फळेच खावी लागतात. त्याला काही पर्याय नाही.
आपल्या सुरक्षिततेसाठी आपण काळजी मात्र घेऊ शकतो.
या फळांवर व भाज्यांवर चिकटलेले कीटकनाशक आपल्या पोटात जाऊ नये यासाठी आपण दक्षता घ्यायला हवी.
साधारणतः आपण भाज्या व फळे खाण्यापूर्वी किंवा स्वैपाकात वापरण्यापूर्वी धुवून घेतोच. पण बऱ्याचदा ते पुरेसे नसते.
फक्त धुण्याने बऱ्याचदा त्याला चिकटलेले केमिकल्स निघत नाहीत.
मग काय करता येईल? त्याचसाठी या लेखात टिप्स दिल्या आहेत.
फळे व भाज्या व्यवस्थित धुण्याची पद्धत कशी आहे व अजून काय करून तुम्ही त्यावरचे कीटकनाशके पूर्णपणे काढून टाकू शकता याची माहिती आज या लेखातून तुम्हाला मिळणार आहे.
१. फळे व्यवस्थित धुवा
वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही खायच्या आधी भाज्या आणि फळे नळाखाली धरून थंड पाण्याने, चोळून धुवत असालच.
पण अशाप्रकारे फळे व भाज्या धुतल्यास त्यातील केवळ ७५ ते ८० टक्केच कीटकनाशक धुतले जाते.
म्हणजे तुम्ही जेव्हा भाज्या, फळे धुवून खाता तेव्हा सुद्धा तुमच्या पोटात १५ ते २० टक्के कीटकनाशक जाण्याची शक्यता असते.
म्हणूनच फळे किमान २-३ वेळा व्यवस्थित, चोळून धुवून घ्यावीत जेणेकरून त्याला चिकटलेले पेस्टीसाईड पूर्णपणे निघून जाईल.
द्राक्षे, पेरू, सफरचंद, पेयर अशी जी फळे सालासकट खाल्ली जातात ती धुताना जास्त काळजी घ्यावी.
२. मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा
फळांवर चिकटलेले केमिकल्स, पेस्टीसाईड्स पूर्णपणे घालवण्यासाठी हा एक सोपा आणि सहस करता येण्यासारखा उपाय आहे.
यासाठी साधारण ४ कप कोमट पाणी घ्यावे व त्यात दोन चमचे मीठ घालून फळे बुडवून अर्धा तासासाठी बुडवून ठेवावीत.
अर्धा ते पाऊण तासानंतर मिठाच्या पाण्यातून फळे काढून खाण्यापूर्वी थंड पाण्याने, नळाखाली धुवून घ्यावीत.
तुम्ही जर या पद्धतीने फळे धुणार असाल तर एक छोटीशी टीप- स्ट्रोबेरीसारखी लवकर खराब होणारी फळे अशा पद्धतीने पाण्यात बुडवून ठेऊन धुतल्यास, ती लवकर खराब होण्याची शक्यता असते.
त्यामुळे अशी फळे धुण्यासाठी वेगळी पद्धत निवडावी.
३. फळे व्हिनेगरच्या पाण्यात बुडवून ठेवा
मिठाच्या पाण्याप्रमाणेच चार कप पाण्यात एक मोठा चमचा व्हिनेगर घालून व्हिनेगरचे पाणी तयार करून घ्यावे.
यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी फळे बुडवून ठेवावीत.
खाण्यापूर्वी थंड पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावीत. या पद्धतीने फळे व भाज्या धुतल्यास त्यावर चिकटलेले हट्टी पेस्टीसाईड्स व्यवस्थित निघून जातील व तुमची फळे जास्त वेळासाठी ताजी राहतील.
४. फ्रुट स्प्रे तयार ठेवा
तुमच्याकडे दर वेळेस फळे किंवा भाज्या आणल्यावर त्या खाण्यापूर्वी अर्धा ते पाऊण तास वेळ असेलच असे नाही.
कधीतरी घाईच्या वेळेत फळे अशी मिठाच्या किंवा व्हिनेगरच्या पाण्यात बुडवून ठेवायला जमणार नसेल, त्यावेळी तुमच्या कामाला हा फ्रुट स्प्रे येईल.
हा फ्रुट स्प्रे जर हाताशी असेल तर त्याचा वापर करून तुम्ही फळे लवकर पण व्यवस्थितपणे स्वच्छ करू शकता.
फ्रुट स्प्रे तयार करण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी आहे.
यासाठी एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे व्हिनेगर एक कप पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
हेच प्रमाण वापरून तुम्ही जास्त स्प्रे सुद्धा एका वेळेला तयार करू शकता.
हे मिश्रण एका काचेच्या बाटलीत भरून त्याला स्प्रे लावावा. फळे आणल्यावर त्यावर या काचेच्या बाटलीतला स्प्रे फवारून साधारण अर्धे मिनिट व्यवस्थित चोळावे व पाण्याखाली धरून स्वच्छ धुवून घ्यावे.
या पद्धतीने एका मिनिटात तुम्ही फळे, भाज्या व्यवस्थित धुवून त्यावरचे कीटकनाशक घालवू शकता.
५. बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचे तुमच्या स्वैपाकघरात अनेक उपयोग असतात. त्यातीलच एक उपयोग म्हणजे तुमच्या भाज्या व फळे व्यवस्थित धुण्यासाठी.
बेकिंग सोडा वापरून फळे धुतल्यास त्यावरील पेस्टीसाईड्स सहज निघून जातात.
थोडक्यात, जास्तीतजास्त पेस्टीसाईड्स धुतले जावेत यासाठी हा एक सोपा व खात्रीशीर उपाय आहे.
यासाठी एका मोठ्या भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्यावे.
त्यामध्ये फळे घालून साधारण १० ते १५ मिनिटे ठेवावीत, साधारण ५ मिनिटे झाल्यावर एकदा फळे व्यवस्थित चोळून घ्यावीत. अशाप्रकारे फळे धुतल्यानंतर ती खाण्यापूर्वी नीट पुसून घ्यावीत.
सालासकट खाल्ली जाणारी किंवा साल काढून खाल्ली जाणारी फळे व भाज्या सुद्धा यापैकी तुम्हाला सोयीस्कर वाटणाऱ्या पद्धतीने व्यवस्थित धुवून घ्याव्यात.
जी फळे लवकर खराब होतात ती मात्र धुताना काळजी घ्यावी. अशी फळे शक्यतो खाण्यापुर्वीच थोडा वेळ धुवून घ्यावीत कारण ती जर जास्त वेळासाठी ओली राहिली तर लवकर खराब होण्याची शक्यता असते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.