जागतिक मधुमेह दिवस (World Diabetes Day) १४ नोव्हेंबर. तुम्हाला टाइप २ मधुमेह/डायबीटीस झाला आहे का? जाणून घ्या ह्या ९ लक्षणांवरून.
हल्लीच्या काळात भारतात मधुमेहाचं प्रमाण खूप वाढलं आहे.
अगदी तिशीपासूनच किंवा लहान मुलांमध्ये देखील मधुमेह झालेला आढळतो.
पण जर सुरुवातीलाच ह्या रोगाची दिसणारी लक्षणे ओळखली, तर आपण मधुमेह होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो.
आपल्या शरीराला कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते.
अर्थातच ही ऊर्जा अन्नातून मिळवली जाते.
अन्नाचे उर्जेत रूपांतर करण्यासाठी आपल्या शरीरातील स्वादुपिंडे इंसुलिन नावाचे हॉर्मोन तयार करतात.
हे इंसुलिन अन्नावर प्रक्रिया करून त्याचे उर्जेत रूपांतर करते.
जर ही इंसुलिन तयार होण्याची प्रक्रिया काही कारणांमुळे मंदावली किंवा बंद झाली तर हे अन्नाचे उर्जेत रूपांतर होण्याचे चक्र बिघडते.
आणि पर्यायाने त्या व्यक्तीस मधुमेह होतो. आहे की नाही सोपी गोष्ट!!
मधुमेह होतो म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढते.
शरीरात इंसुलिन निर्माण होणे एकतर कमी होते किंवा पूर्ण थांबते.
त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
मधुमेह २ प्रकारचा असतो.
टाइप १ मधुमेह आणि टाइप २ मधुमेह.
टाइप १ मधुमेह : टाइप १ मधुमेह हा अगदी लहान मुलांमध्ये होतो.
जन्मतःच काही मुलांच्या शरीरात इंसुलिन तयारच होत नाही त्यामुळे त्यांना अशा प्रकारचा मधुमेह होतो.
टाइप १ प्रकारच्या मधुमेहाला जुवेनाईल डायबीटीस असे देखील म्हणतात.
शरीरात इंसुलिन तयारच होत नसल्यामुळे हा मधुमेह कधीही बरा होत नाही.
टाइप २ मधुमेह : टाइप २ मधुमेह मात्र इंसुलिन तयार होण्याची क्रिया मंद झाली किंवा पूर्ण थांबली तर होतो.
म्हणजेच इंसुलिनचे प्रमाण कमी पडल्यामुळे अन्नाचे उर्जेत रूपांतर होण्याची क्रिया मंद होते आणि परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
टाइप २ मधुमेह होण्याचे वय अलीकडच्या काळात कमी होत चालले आहे.
म्हणजेच लहान वयापासून अशा प्रकारचा डायबीटीस होताना दिसतो.
परंतु हा डायबीटीस होऊ शकेल अशी लक्षणे जर लवकर ओळखता आली तर आपण नक्कीच तो होण्यापासून रोखू शकतो.
म्हणून आपण ह्या लेखात टाइप २ मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे कोणती आणि ती ओळखून त्यावर मात कशी करता येईल हे जाणून घेणार आहोत.
जर तुमच्या बाबतीत खालील लक्षणे दिसून येत असतील तर तुम्हाला टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता आहे.
१. वारंवार लघवीला जावे लागणे
दिवसभरात काही वेळा लघवीला जावे लागणे हे अगदी नॉर्मल आहे, परंतु जर वारंवार आणि घाईने लघवीला जावे लागत असेल तर ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असण्याचे लक्षण आहे.
रक्तातील साखर जास्त वाढली की मूत्रपिंडे ती साखर लघवीवाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे लघवी होण्याचे प्रमाण वाढते. म्हणून वारंवार लघवी होणे हे टाइप २ डायबीटीस चे प्रमुख लक्षण आहे.
२. खूप तहान लागणे
वारंवार खूप तहान लागणे हे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असण्याचे एक प्रमुख लक्षण आहे.
कारण वारंवार लघवी होण्यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
ती कमतरता भरून काढण्यासाठी शरीर वारंवार पाण्याची मागणी करते. म्हणून खूप तहान लागते.
३. खूप भूक लागणे
अन्नामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, परंतु मधुमेह झाला असल्यास शरीर अन्नाचे रूपांतर ऊर्जेत करू शकत नाही, त्यामुळे शरीराला ऊर्जेची कमतरता भासू लागते आणि मेंदू अन्न हवे अशी सूचना देऊ लागतो, त्यामुळे वारंवार भूक लागली आहे अशी जाणीव होते.
त्यामुळे वारंवार भूक लागणे हे टाइप 2 डायबिटीस चे प्रमुख लक्षण आहे.
४. थकवा
इन्सुलिन अभावी शरीरातील अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होत नसल्यामुळे शरीराला ऊर्जेची कमतरता भासू लागते.
त्यामुळे अतिशय थकवा जाणवू लागतो, तसेच वारंवार लघवी झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डीहायड्रेशन होते.
त्यामुळे देखील थकवा येतो. म्हणून थकवा हे देखील टाइप २ मधुमेहाचे लक्षण आहे.
५. स्पष्ट न दिसणे
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की डोळ्यांकडे जाणाऱ्या नसांवर त्याचा परिणाम होतो व दिसणे अस्पष्ट होऊ लागते.
त्यामुळे दिसण्यावर परिणाम झाला तर त्वरित डॉक्टरांना भेटावे.
६. हातापायांच्या बोटांना मुंग्या येणे किंवा बोटे सुन्न होणे
टाइप २ डायबिटीस मध्ये रक्ताभिसरण करणाऱ्या नसांवर परिणाम होतो.
त्यास डायबीटीक न्यूरोपॅथी असे म्हणतात.
ह्यात रक्तपुरवठा करणाऱ्या नसा बोटांच्या टोकांपर्यंत रक्त पुरवू शकत नाहीत, त्यामुळे हाता पायाच्या बोटांना मुंग्या येणे, बोटे सुन्न पडणे अशी लक्षणे दिसू लागतात.
७. त्वचेवर काळसर पट्टे दिसणे
मान, काखा किंवा जांघेत त्वचेवर काळसर रंगाचे पॅचेस येणं हे देखील टाइप २ डायबिटीसचं प्रमुख लक्षण आहे.
८. जखम लवकर भरून न येणे
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे रक्ताभिसरण करणाऱ्या नसा डॅमेज होतात, त्यामुळे शरीरावर कुठेही झालेली जखम भरून येण्यास वेळ लागतो.
ह्याची फार काळजी घेणे आवश्यक आहे, कारण जखम लवकर भरून आली नाही तर रक्तस्त्राव होत राहून जास्त त्रास होऊ शकतो.
९. सर्वांगास खाज सुटणे
शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले की फंगल किंवा बॅक्टरीयल इन्फेक्शन चा धोका वाढतो, अशा इन्फेक्शन मुळे सर्वांगास खाज सुटून त्वचा लालसर होऊ लागते.
तर ही आहेत टाइप २ डायबिटीस ची लक्षणे.
ही वेळेवर ओळखून त्याचा वेळेवर इलाज करणे आवश्यक आहे.
अन्यथा डायबिटीसचा शरीराच्या सर्वच अवयवांवर हळूहळू परिणाम होऊन ते अवयव कमकुवत होऊ लागतात.
म्हणून ह्या लक्षणांवरून डायबिटीस आहे का हे ओळखून त्वरित डॉक्टरांना भेटून तपासणी करा.
स्वस्थ रहा आनंदी रहा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.