आपल्या आयुष्याला आर्थिक शिस्त असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. काही सवयींना जर आपण वेळीच ओळखू शकलो नाही तर आर्थिक डोलारा ढासळायला वेळ लागत नाही.
यासाठी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत अशा पाच सवयी वाचा या लेखात. आणि लेखाच्या शेवटी आर्थिक नियोजनाबद्दलच्या काही लेखांच्या लिंक्स सुद्धा आहेत. ज्यांना जास्त माहिती घ्यायची त्यांनी ते लेख जरूर वाचा.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांना आपल्याच ५ सवयी जबाबदार असतात. हे माहिती आहे का तुम्हाला?
आपल्याला आयुष्यात काहीतरी कारणाने वाईट किंवा चांगल्या सवयी लागतात. वाईट सवयी आपोआप लागतात, तर चांगल्या सवयी लावून घ्यायला लागतात. बरोबर आहे ना!!
चांगल्या सवयी लावून घ्यायला कष्ट पडतात. म्हणून तिकडे जरा काना डोळाच करतो आपण, नाही का? कुठं डोक्याला त्रास करत बसता? असं आपल्याला वाटतं.
पण आपल्यावर जेंव्हा अचानक एखादं संकट येतं ना तेव्हा खाडकन आपले डोळे उघडतात. आता काय करायचं? असले धक्के आपल्याला सगळ्यांना आयुष्यात कधी न कधी बसतात.
कसले कसले धक्के असतात हे? अचानक येणारं आजारपण, अचानक होणारं शारीरिक नुकसान, अचानक येणारे मोठ्ठे खर्च, अचानक येणारी एखादी नैसर्गिक आपत्ती.
व्यवसायात अचानक होणारं नुकसान, किंवा नोकरी जाणं. असं काहीतरी होतं आणि आपल्याला मोठ्ठा धक्का बसतो कारण सगळ्या धक्क्यांचा पैशांशी संबंध असतो.
पैशाशिवाय आपण असल्या एकाही धक्क्यातून सावरू शकत नाही.
म्हणजे अशी अनेक प्रकारची आर्थिक संकटं आयुष्यात आपल्यावर येतात. काही संकटं येतात ती आपल्याला असलेल्या काही वाईट सवयीमुळे.
ह्या वाईट सवयी आयुष्यात आपल्याला आपोआप येऊन चिकटलेल्या असतात. आणि त्या आपला घात करतात. आयुष्य उध्वस्त करू शकतात.
मग बघा, कोणत्या आपल्याच सवयी आपल्याला संकटात टाकतात, किंवा उध्वस्त करू शकतात.
पहिली सवय म्हणजे आयुष्यात आर्थिक नियोजन कसं करायचं हे शिकण्याचा आळस करणे
आयुष्यात ज्यावेळी आपण पैसा कमवायला सुरुवात करतो त्या वेळीच तो खर्च कसा करायला पाहिजे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे.
ही एक चांगली गोष्ट आहे. ह्या चांगल्या गोष्टीची आपण आपल्याला सवयच लावून घ्यायला पाहिजे.
ही चांगली सवय जर आपल्याला नसेल तर आपली आर्थिक घडी बसत नाही, उलट आपण संकटात अडकत जातो.
हे शिकायचं म्हणजे काही अवघड गोष्ट नाही, तो एक “कॉमन सेन्स” आहे.
म्हणजेच तुम्हाला जर आर्थिक संकटात अडकायचं नसेल तर, ‘एक तर तुम्ही तुमची कमाई वाढवा, किंवा ती कमाई वाढवता येत नसेल तर तुमचे खर्च कमी करा’
असं केलं तर आर्थिक संकटात सापडायची भीती तितकीशी राहणार नाही. आर्थिक नियोजन कसं करायचं हे शिकताना तुम्हाला कळेल की खरी संपत्ती कोणती आणि खोटी संपत्ती कोणती.
आर्थिक नियोजन शिकलात तर, हे तुम्हाला कळेल की व्याज, चक्रवाढ व्याज, ह्याची ताकद काय आहे.
तुमचं जरा जरी दुर्लक्ष झालं की हीच ताकद तुमच्या विरुद्ध कशी काम करते? तुम्हाला तुमच्या कर्जाच्या व्यवहारात कशी उध्वस्त करू शकते.
आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला हे कळेल की ताबडतोब श्रीमंत होण्याचे मार्ग कसे फसवे असतात.
अनेक लोक झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कसे स्वतः चेच पैसे घालवून बसतात. आणि त्यांचं आयुष्य कसं उध्वस्त होतं ते.
म्हणूनच आर्थिक व्यवहार कसे करायचे ते शिकून घेतलं पाहिजे. आळस केलात तर तुमचंच मोठं नुकसान होईल ?
दुसरी सवय म्हणजे संयम न पाळता अविचाराने केलेली खरेदी.
बाजारात रोज नवीन नवीन वस्तू विक्री साठी येत असतात. त्या वस्तूंची जाहिरात सगळीकडे केली जाते. टी व्ही, सिनेमा, चौकातल्या मोठ्या बोर्डवर, वर्तमान पत्रात, सोशल मीडियावर, पत्रकं वाटून, भरपूर डिस्काउंट ची ऑफर देऊन आपल्याला भुरळ पडेल अशा जाहिराती केल्या जातात.
ह्या बघून आपला संयम सुटतो आणि आपण अशा काही अनावश्यक वस्तूंची वारेमाप खरेदी करतो. हे घे, ते घे, नवीन दिसलं की घे.
असं सगळं घेत राहतो आणि लोकांना पण दाखवतो. काल आम्ही ही खरेदी केली. आज ना हे दिसलं म्हणून घेऊन आलो, नवीन प्रकार आहे ना म्हणून आणलं.
आज ही वस्तू खरेदी केली नाही तर आपलं काही काम अडणार नसतं, पण ती बाजारात नवीन आली आहे म्हणून आपण खरेदी करून आणतो.
अशा वस्तूंची सतत खरेदी केली की आपलं आर्थिक बजेट डळमळीत होतं. आपल्या बचतीचे पैसे सुद्धा आपण खर्च करून बसतो.
ह्याला अविचार म्हणता येईल, पण तो आपण करतो, खरेदीवर संयम राखू शकत नाही. ही आपली सवय आपल्याला संकटात ओढून नेते. पण ते आपल्या सहज लक्षात येत नाही. वेळ गेल्यावर लक्षात येतं.
तिसरी सवय म्हणजे दिखाऊपणा साठी नेहमी केलेली मोठ्या गोष्टींची खरेदी.
आपले शेजारी, आपले नातेवाईक आपल्याकडे येणारे जाणारे लोक ह्यांना आपली श्रीमंती दाखवण्यासाठी काही लोक शोभेच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात.
वास्तविक आपल्याला त्या गोष्टींची आवश्यकता असतेच असं नाही. पण शेजारच्या लोकांकडे आहे म्हणून आपल्याकडे पण असायला पाहिजे म्हणून खरेदी केली जाते.
ही दिखाऊपणाची सवय आपल्याला आर्थिक संकटाच्या खड्ड्यात ढकलू शकते.
आपल्या नातेवाईकांनी गाडी घेतली हे आजकाल आपल्याला व्हाट्स अप वर आलेल्या फोटोतून लगेच कळतं.
मग त्यांनी गाडी घेतली, आपल्याकडे पण असायला पाहिजे. मग काहीही करून गाडी ची खरेदी केली जाते.
आणि सुरू होतं EMI चं चक्र. ह्या EMI च्या चक्रात आपण आवश्यकता नसताना अडकतो आणि गळ्याला कर्जाचा फास आवळून घेतो.
ही सवय आपल्याला आर्थिक दृष्टीने समृद्ध होऊ देतच नाही, तर संकटाच्या गर्तेत अडकवते.
अर्थात योग्य वेळी अशी खरेदी करावी पण त्यामुळे अकारण आणि पेलवलं जात नसताना कर्जाच्या ओझ्याखाली तर अडकणार नाही ना, याचा विचार आधी करावा.
चौथी सवय ही मोठ्या व्याज दराचं कर्ज काढून घरातल्या काही गोष्टींची पूर्तता करणे.
घर घेणे, गाडी घेणे, अशी ज्यातून काही उत्पन्न नसणारी गोष्ट मोठ्या व्याजदराने कर्ज घेऊन खरेदी करणे ही एक घातक सवय ठरू शकते.
काही वेळा आपण सुविधा आहे म्हणून क्रेडिट कार्ड वर कर्ज घेतो. त्याचा व्याजाचा दर सगळ्यात जास्त असतो. त्याचा हप्ता फेडण्यासाठी दर महिन्याला ती रक्कम आपल्याजवळ आली पाहिजे, जर एखादा हप्ता चुकला तर चक्रवाढ व्याजाने दंड आकारला जातो.
आणि तो भरणं शक्य झालं नाही तर त्या कर्जातून बाहेर पडणं सहज शक्य नसतं. त्या व्याजाच्या वाढत्या चक्रात माणूस जास्त जास्त फसत जातो.
आणि असं कर्ज कधीच संपतच नाही. सतत आपल्या मानगुटीवर कर्जाचं ओझं वाढतंच जातं.
घर घेताना किंवा गाडी घेताना सुद्धा त्याच्या हप्त्याची तजवीज १००% होणार असेल तरच असं कर्ज घेणं योग्य असतं, नाही तर कर्जाच्या पैशातून कोणतंही उत्पन्न नसेल तर आपण होऊन हे संकट ओढवून घेतल्या सारखंच असतं.
व्यवसायात गुंतवलेले पैसे आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळवून देतात. पण घर किंवा गाडी सारख्या खरेदीत तसं नसतं म्हणून माणूस अशा कर्जामुळे संकटात पडू शकतो. तुमच्या मिळकती पेक्षा ह्या कर्जाचा हप्ता जास्त असेल तर तुम्हाला उध्वस्त करू शकतो.
आणि पाचवी सवय ही अगदी वाईट सवय तुमचा घात करू शकते, ही सवय म्हणजे तुमच्या मिळकती पेक्षा तुमचा खर्च जास्त असणे.
दर महिन्याला तुमच्या हातात एक ठराविकच रक्कम येत असेल तर तुम्हाला त्या राकमे पेक्षा कमी खर्च करायला पाहिजे.
म्हणजे तुम्ही काहीही त्रास न होता तुमचं आयुष्य घालवू शकता. पण जर तुमच्या मिळकती पेक्षा तुमचा खर्च, किंवा उधारी जास्त होत असेल तर ती धोक्याची घंटा समजा.
ठराविक मिळकतीतून जास्तीची उधारी फिटणार नाही. दरवेळी एक खर्च थांबवून दुसरा खर्च करावा लागेल.
कसलाच ताळमेळ राहणार नाही. आणि हळू हळू ह्या सवयीमुळे खर्चाचा डोंगर मोठा होत जाईल आणि मिळकत कमी पडत जाईल.
काही लोक जेवढी मिळकत असते तेवढाच खर्च करतात.
काही लोक जेवढी मिळकत असेल त्यापेक्षा जास्त खर्च/उधारी करतात.
पण जे लोक जेवढी मिळकत असेल त्या पेक्षा खर्च कमी करतात, तेच लोक काहीतरी बचत करू शकतात. बचत करत करत पुढे जातात ते कधीच आर्थिक संकटात सापडत नाहीत. त्यांच्याकडे आर्थिक संकटांशी झगडण्याची ताकद असते.
आपल्याला कोणत्या सवयी आहेत ते आपण बघू शकतो. ह्या सगळ्या वाईट सवयीच आहेत ह्या सगळ्या सवयींपासून आपण लांब राहायचं आहे.
ह्यातून शिकायचं काय? तर आपली आमदानी जेवढी आहे त्यापेक्षा कमी खर्च करायचा.
जर खर्च जास्त होत असेल तर आपली आमदानी वाढली पाहिजे. त्यासाठी अनेक मार्गांनी पैसा येईल अशी व्यवस्था करायला लागेल.
कष्ट जास्त करावे लागतील. फक्त एकाच मार्गाने झालेली मिळकत कमीच पडेल.
बचत करून आर्थिक संकटांना यशस्वीपणे तोंड द्यायचं, कर्ज काढून सण साजरा करायचा नाही. आणि दिखावा करायचा नाही.
म्हणजेच आपल्याला ह्या सवयी असतील तर त्या सवयीत बदल करायचा की झालं. आर्थिक संकट आपल्या वाऱ्याला सुद्धा उभं राहणार नाही.
आर्थिक नियोजनाबद्दलचे लेख:
महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स
वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे का? मग हे करा
विवाहानंतरचे आर्थिक नियोजन कसे करावे
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
High things