बऱ्याचदा आपण डीटाॅक्स बद्दल ऐकतो. अनेक वेळा डीटाॅक्स करण्याचा सल्ला दिला जातो.
पण हे डीटाॅक्स म्हणजे नक्की काय असते? ते करायची गरज का पडते आणि ते कशा पद्धतीने करावे? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात.
आज या लेखात तुम्हाला याच प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
मित्रांनो, आपण राहतो त्या वातावरणात प्रचंड प्रमाणात धूळ, प्रदूषण असते.
जन्मतः निरोगी आणि स्वच्छ असलेलं आपलं शरीर वाढत्या वायाबरोबर हळूहळू प्रदूषण, खानपानाच्या चुकीच्या सवयी तसेच इतर काही गोष्टींमुळे दूषित व्हायला लागतं.
आपण खातो-पितो त्यात जास्त प्रमाणात अन्हेल्दी फूड्सचा समावेश असतो. आपल्याला कामाचा ताण असतो.
दिवसभराच्या व्यापांमुळे जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात. कधी व्यायाम नियमितपणे होत नाही तर कधी दिवसभरात जेवढे पाणी प्यायला हवे असते तेवढे प्यायले जात नाही.
या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशा जीवनशैलीमुळे आपल्या शरीरात टॉक्सिन्स साठत जातात.
यामुळे डायबेटीस, उच्च रक्तदाब आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक आजारांना आपण बळी पडतो.
हे सगळे तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल. यासाठी योग्य ती काळजी सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने घेत असालच.
नियमित व्यायाम, वेळेत सकस आहार हे निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेच, पण फक्त हे करून पुरेसे नाही.
तुम्ही श्वास घेता ती हवा, तुम्ही खाता त्या भाज्या याबद्दल तुम्हाला काहीच खात्री देता येत नाही आणि त्यात काही बदल सुद्धा करता येत नाहीत.
त्याचे तुमच्या आरोग्यावर जो काही विपरीत परिणाम व्हायचे असतात तो होतातच. मग अशावेळेला काय करावे?
डीटाॅक्सचे महत्व नेमक्या अशाच वेळेला जास्त आहे.
काळजी घेऊनही जी काही टॉक्सिन्स तुमच्या शरीरात अशाप्रकारे साठतात ती बाहेर काढायचा ‘आयुर्वेदिक डिटॉक्स‘ हा उत्तम पर्याय आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या या क्रिया अनेक वर्षांपासून केल्या जातात.
आयुर्वेदात असे सांगितले जाते की प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन दोष असतात: वात, कफ आणि पित्त.
या तिन्हींचा जर समतोल असेल तर शरीराची विविध कार्य सुरळीतपणे सुरु राहतात.
पण काही कारणाने जर या दोषांचा समतोल बिघडला तर शरीरात टॉक्सिन्स जमा होऊन वेगवेगळ्या आजारांची सुरुवात होते.
यावर आयुर्वेदात काही उपाय सांगितले आहेत.
यामुळे या तीन दोषांचा समतोल राखला जाऊन आजारांमुळे शरीरात साठलेले टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात आणि जी काही व्याधी असेल ती दूर होते. यालाच डीटाॅक्स असे म्हणतात.
आता या लेखाच्या पुढच्या भागात आयुर्वेदिक डिटॉक्स करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला वाचायला मिळणार आहेत.
१. नेती व नस्य
या पुरातन काळापासून केल्या जाणाऱ्या क्रिया आहेत. यामुळे श्वसनसंस्थेची कार्यक्षमता वाढते.
तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुम्हाला प्रदुषणाला सामोरे जावेच लागते. प्रदुषणामुळे शरीरात जे टॉक्सिन्स साठून राहतात ते बाहेर फेकण्यासाठी हा उपाय आहे.
यामुळे नाकात साठून राहिलेली घाण बाहेर पडते, सायनस भरलेले असतील तर ते मोकळे होतात.
नेती करण्याठी तुम्हाला आवश्यकता असते ती नेती पाॅटची. चहाच्या किटलीसारखा दिसणारा हा पाॅट आयुर्वेदिक औषधी मिळणाऱ्या दुकानांमध्ये उपलब्ध असतो.
या नेती पाॅटमध्ये कोमट पाणी भरून ते एका नाकपुडीतून आत घालावे, मान वाकडी करून ते पाणी दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर यायला पाहिजे.
नस्य ही श्वसनसंस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केली जाणारी आजू एक क्रिया आहे.
यासाठी नस्य तेलाची आवश्यकता असते. नस्य तेल हे तिळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, सूर्यफुलाचे तेल याचे मिश्रण करून तयार केले जाते.
त्यामध्ये बडीशेप, ब्राह्मी, निलगिरी, शंखपुष्पी या आयुर्वेदिक औषधी सुद्धा असतात. या तेलाचे काही थेंब नाकामध्ये सोडले जातात.
२. धौती
ही क्रिया पहाटे उठल्या उठल्या रिकाम्या पोटी केली जाते. यामुळे पोटाची व घशाची स्वच्छता (म्हणजेच डीटाॅक्स) होते.
पोटात जर काही न पचलेले अन्न असेल, पित्त असेल तर ते यामुळे बाहेर फेकले जाते.
यामुळे शरीरात वात, कफ आणि पित्त या त्रीदोशांचा समतोल राखला जातो.
पचनसंस्थेत साठलेले टाॅक्सिंस बाहेर घालवण्यासाठी जरी हा उपाय असला तरी त्याचा परिणाम काही प्रमाणात श्वसनसंस्थेवर सुद्धा होतो.
अस्थमा सारख्या श्वसनसंस्थेच्या आजारांसाठी सुद्धा ही क्रिया फायदेशीर आहे. धौतीचे हे काही प्रकार आहेत.
दंत धौती – दातांची व जिभेची स्वच्छता.
वमन धौती – सकाळी उठल्यावर व जेवणानंतर तीन तासांनी मिठाचे पाणी पिऊन उलटी काढून, पित्त व न पचलेले अन्न बाहेर फेकणे.
३. ऑईल पुलिंग
हे तोंडांच्या व दातांच्या डीटाॅक्स करता केले जाते.
यामध्ये सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तोंडात एक चमचा तेल घेऊन साधारण १५ ते २० मिनिटे चूळ भरली जाते माउथवाॅश प्रमाणे ही क्रिया केली जाते.
यामुळे दातांचे आरोग्य सुधारते, हिरड्या निरोगी राहतात.
तसेच या शिवाय याचे इतर इतर फायदे सुद्धा आहेत. ते म्हणजे झोप व्यवस्थित लागायला मदत होणे, चेहऱ्यावरचे पिंपल, अक्ने दूर होणे हे आहेत.
४. कपालभाती
तुमच्या फुफ्फुसांची व किडनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.
यामुळे शरीरात साठून राहिलेले टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. कपालभाती करायला सुद्धा सोपी आहे.
श्वसनावर लक्ष केंद्रित केल्याने, नाकातून श्वास भरून घेऊन लक्षपूर्वक सोडल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता तर वाढतेच.
श्वसनाचे इतर आजार सुद्धा दूर होतात. पण त्याचबरोबर कॉन्स्टीपेशन, सायनस, डायबेटीस यासारख्या आजारांवर सुद्धा हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे शरीरातील त्रिदोषांचा समतोल राखला जातो.
मित्रांनो, या डीटाॅक्सच्या काही सोप्या पद्धती आहेत.
याशिवाय सुद्धा डीटाॅक्सच्या अनेक पद्धती, प्रकार आहेत.
पण तुम्हाला त्याबद्दलची प्राथमिक माहिती मिळावी व त्या घरच्याघरी करता याव्यात म्हणून या काही निवडक क्रिया दिल्या आहेत.
या क्रिया जरी घरी तुम्हाला करता येण्यासारख्या असल्या तरी त्या योग्य पद्धतीने करणे हे महत्वाचे आहे.
तसे न झाल्यास त्यामुळे फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच होण्याची शक्यता असते. म्हणूनच या क्रिया करण्याआधी तुमच्या जवळच्या वैद्याशी जरूर संपर्क करा.
त्यांच्याकडून या क्रिया करण्याची योग्य पद्धत शिकून घ्या जेणेकरून त्याचा तुमच्या आरोग्यासाठी अधिकाधिक फायदा होईल.
वैद्यांच्या सल्ल्याने, तुमच्या तब्येतीला अनुसरून तुम्हाला इतर काही क्रिया, पथ्य सुद्धा समजतील ज्यामुळे तुमचे आजार, व्याधी दूर होतील आणि तुमच्या शरीराचे डीटाॅक्स होईल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.