माणसाचे आयुष्य अनिश्चित आहे याचा अनुभव आपण कोरोनाच्या काळात घेतलाच.
तब्बेतीची काळजी तर आपण घेतोच. आपल्यापैकी बरेच जण आपले भविष्य सुरळीत असावे म्हणून आर्थिक नियोजन देखील करत असतात.
अशा प्रकारचे आर्थिक नियोजन करणे, हे शहाणपणाचे तर आहेच आणि अत्यंत आवश्यक आहे.
परंतु फक्त आर्थिक नियोजन करून भागणार नाही तर त्याची सविस्तर माहिती आपल्या कुटुंबीयांना देणे देखील तितकेच आवश्यक आहे.
आपल्यापैकी बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक तर करतात, परंतु अचानक एखादे आजारपण उद्भवले आणि आपल्याला स्वतःला काही झाले तर काय ह्या गोष्टीसाठी ते तयार नसतात.
असा पुढचा विचार करून ठेवणं त्यांना जमत नाही आणि मग खरंच दुर्दैवाने अशी काही परिस्थिति उद्भवली तर त्यांच्या कुटुंबियांची फरपट होते.
म्हणून पुढचा विचार करा, वाईटातील वाईट परिस्थिति आली तरी कसे वागायचे ह्याचा विचार आधी करून ठेवा.
एखाद्या कुटुंबावर ओढवणारी सर्वात वाईट वेळ म्हणजे त्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू.
भारतात अजूनही बहुसंख्य घरात घरातील आर्थिक नियोजन करणे, बचत करणे, निरनिराळ्या गुंतवणूका करणे हे सगळे पुरुषच करत असतात.
घरातील स्त्रीला म्हणजेच त्या कर्त्या पुरुषाच्या पत्नीला ह्या सगळ्याची काही कल्पना नसते.
बरेचदा तिला काय कळणार ह्यातले असे म्हणून तिला आर्थिक व्यवहारांपासून दूर ठेवले जाते. अनेकदा ती स्त्री स्वतः अर्थार्जन करत असेल तरीही घरातील आर्थिक नियोजन पुरुषाच्या हाती असते.
काही ठिकाणी स्त्रिया सर्व काही मॅनेज करत असल्या तर पुरुषांना काही माहीत नसते.
ह्या दोन्हीही परिस्थितीत जाणकार असणाऱ्या व्यक्तिला काही झाले तर मागे राहिलेल्या कुटुंबाची माहितीअभावी फरपट होते.
केवळ आर्थिक व्यवहार, बचत ह्यांची माहीती नसल्यामुळे कुटुंबाला झळ पोहोचते.
आज आपण ह्या लेखात अशा परिस्थितीवर मात कशी करता येईल ते पाहणार आहोत.
इमर्जन्सि सांगून येत नाही हे लक्षात घेऊन आधीपासून त्याची तयारी करून ठेवणे हे शहाणपणाचे ठरते. कसे ते आपण पाहूया.
१. हल्लीचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आपण सगळेच जण आता वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इंटरनेटचा वापर करतो. आणि ह्या सगळ्या वापरासाठी आपले निरनिराळे ईमेल आयडी आणि पासवर्ड असतात.
अशा सर्व ईमेल आयडी आणि पासवर्डची एक एक्सेल फाइल बनवून ठेवावी. त्या फाइलला देखील पासवर्ड असावा आणि तो आपल्या जोडीदाराला देखील सांगून ठेवावा.
जेणेकरून इमर्जन्सिच्या वेळी सगळे ईमेल आयडी आणि पासवर्ड त्यांना उपलब्ध असतील. तसेच आपल्या स्मार्ट फोन आणि लॅपटॉपचे पासवर्ड देखील आपल्या जोडीदाराला माहीत असावेत. (हल्ली काही ठिकाणी जाणून-बुजून पासवर्डच एकमेकांपासून दूर ठेवायचे असतात, तो भाग मात्र वेगळा)
२. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे आजारपण असो किंवा मृत्यू होवो, कुटुंबाला सर्वप्रथम गरज पडते ती पैशाची.
अशा वेळी कुटुंबातील आणखी एखाद्या जबाबदार व्यक्तीस म्हणजेच शक्यतो आपल्या जोडीदारास आपल्या बँक अकाऊंटचे सगळे डिटेल माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे.
हल्लीच्या इंटरनेट बँकिंगच्या काळात तर इंटरनेट बँकिंग वापरण्याचे लॉग ईन आयडी आणि पासवर्ड माहीत हवेत जेणेकरून ते वापरुन अकाऊंट मधून पैसे ट्रान्सफर करणे अथवा बिले भरणे शक्य होईल.
तसेच आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची पिन देखील आपल्या व्यतिरिक्त आणखी एका जबाबदार व्यक्तीस माहीत असावी.
त्यामुळे कॅश काढणे व वापरणे देखील शक्य होते. अर्थातच ही सगळी माहिती अत्यंत गोपनीय असते आणि आपल्या कुटुंबातील जबाबदार व्यक्ति सोडून इतर कोणाच्या हाती ती पडणार नाही ह्याची काळजी घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे.
इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की आपल्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला आपल्या बँक अकाऊंट आणि इतर बचत खात्यांची नॉमिनी/वारस म्हणून नेमायला विसरू नका.
३. हल्ली बहुतेकवेळा सगळी बिले जसे की लाइट बिल, फोन बिल, क्रेडिट कार्डचे बिल हे ऑनलाइन भरले जातात.
तर ही बिले ऑनलाइन भरण्यासाठीचे आयडी आणि पासवर्ड देखील एका ठिकाणी नोंद करून ठेवावे. म्हणजे अशी बिले भरणे कुटुंबाला सोपे जाईल आणि ह्या सेवा खंडित होण्याची नामुष्की येणार नाही.
४. जर तुमचे प्रॉविडंट फंड अथवा पेन्शन खाते असेल तर तुमच्या पश्चात त्या खात्यातील सर्व रक्कम तुम्ही ज्या व्यक्तीस नॉमिनी किंवा वारस म्हणून नेमले असेल त्या व्यक्तीस मिळते.
त्यामुळे तुमच्या प्रॉविडंट फंडाच्या खात्याचे किंवा पेन्शन खात्याचे वारस तुम्ही योग्य व्यक्तिला नेमले आहे ना ह्याची वेळोवेळी शहानिशा करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच ह्यासंबंधीची सर्व माहिती कुटुंबातील जबाबदार व्यक्तीस देऊन ठेवणे आवश्यक आहे.
५. प्रत्येकाने जीवन विमा काढणे आवश्यक आहे. हा जीवन विमा आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवतो.
तसेच जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर त्यासंबंधीचा विमा देखील उतरवलेला असणे योग्य ठरते.
त्यामुळे अचानक काही दुर्घटना घडली तर कुटुंबाला आर्थिक मदत होते. इथेदेखील योग्य व्यक्तीस वारस नेमणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण वारस व्यक्तीच्या खात्यातच विम्याची संपूर्ण रक्कम जमा होते. तसेच हयासंबंधीची सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवून त्याची माहिती आपल्या जवळच्या व्यक्तीला देऊन ठेवावी.
६. हल्ली म्यूचुअल फंड आणि शेयर बाजारात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.
हयातून चांगला परतावा मिळत असल्यामुळे गुंतवणूकदारांचा तिकडे कल असतो. परंतु म्यूचुअल फंडातल्या गुंतवणुकीला आपण दिल्याशिवाय वारसाची नोंद होत नाही.
त्यामुळे ती नोंद करून घेणे आवश्यक आहे. तसेच शेअर्स साठी देखील डीमॅट अकाऊंटला वारसाची नोंद करणे आवश्यक आहे.
ह्या सर्व गुंतवणुकीची एक पासवर्ड असणारी एक्सेल फाइल तयार करून त्यात सर्व फंड आणि शेअर्स ह्यांची नावे, सुरु केल्याच्या तारखा आणि गुंतवलेली रक्कम ह्याची डिटेल माहिती लिहून ठेवावी.
७. आपल्या कडील स्थावर, जंगम मालमत्तेची तसेच रोख रक्कम आणि सोने, दागिने इत्यादीची देखील नोंद करून त्याची अंदाजे किंमत लिहून एक पासवर्ड असणारी एक्सेल फाइल तयार करावी.
त्यामुळे गरजेनुसार कुटुंबाला सर्व आर्थिक परिस्थितीची एकहाती केलेली नोंद सापडेल.
८. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा. आपल्यावर असणारे कर्ज किंवा देणी ह्याची देखील आपल्या कुटुंबाला कल्पना देऊन ठेवायला हवी.
आपल्या पश्चात आपल्या कर्जाची फेड आपल्या कुटुंबाला करावी लागते. त्यामुळे आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांची पूर्ण माहिती आपल्या कुटुंबाला असायला हवी.
आपल्या कुटुंबासाठी आपण सदैव असायला हवं असं तर प्रत्येक व्यक्तिला वाटत असतं. परंतु दुर्दैवाने काही वाईट घटना घडली तर आपल्या मागे आपल्या कुटुंबाचे हाल होऊ नयेत असे देखील प्रत्येकाला वाटते.
म्हणून ह्या लेखात दिल्याप्रमाणे आपल्या आर्थिक बाबींची पूर्ण माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करा. स्वस्थ रहा आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.