अन्न हे पूर्णब्रम्ह आहे, हे आपण जाणतोच. केवळ ‘उदरभरण’ हे अन्नाचे कर्म नसून ते एक यज्ञकर्म आहे.
केवळ शरीराला नाही तर मनालाही पोषक असणार्या अन्नविषयीची ‘माइंडफुल इटिंग’ ही संकल्पना जाणून घेऊयात या आजच्या लेखात.
‘सर को राखो ठंडा, पैरोंको रखो गरम और पेट को रखों नरम’ अशी एक म्हण प्रचलित आहे.
आपला आणि अन्नाचा संबंध जुना आहे. माणूस शेती करू लागला तेव्हापासून त्याची अन्नाशी नाळ जोडली गेली. आपल्या तीन मूलभूत गरजांमध्ये ‘अन्न’ ही आत्यंतिक महत्वाची आणि प्राथमिक गरज आहे. पण ते अन्न कसे, किती आणि कोणत्या प्रतीचे खावे आणि ते खाताना आपली मानसिकता कशी असावी यासाठी काही नियम पूर्वजांनी नक्कीच घालून दिलेले आहेत.
जे आजच्या जागतिकीकरणाच्या युगात चपखल लागू होणारे आहेत. आपण ते नियम सध्या विसरलो आहोत. ते नव्याने जगाला माहीत करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी निर्माण झाली ‘माइंडफुल इटिंग’ हि संकल्पना. खटाटोप करून जे अन्न आपण मिळवतो ते शरीराला आणि मनालाही आनंद देणारे हवे.
असे म्हणतात की प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो, खरंच आहे ते. प्रेमाने केलेला कोणताही पदार्थ आपण आवडीने खातोच.
पण अनेकजण त्यांच्या आवडीचे पदार्थ म्हंटले की त्यावर अधाश्यासारखे तुटून पडतात. याचसाठी आवश्यक आहे ’माइंडफूल इटिंग’ तंत्र. याची नेमकी प्रक्रिया, पद्धत, प्रयोग आणि उपयोग जाणून घेऊयात.
हे तंत्र कशासाठी?
1) अन्न खाण्याची मानसिकता बदलण्यासाठी
2) वाढलेले वजन कमी करण्यासाठी
3) अन्नाविषयीची भीती घालवण्यासाठी
4) मानसिक आणि शारीरिक भुकेतला फरक समजण्यासाठी
5) चांगले आणि पौष्टिकता देणार्या अन्नाची व्याख्या समजण्यासाठी
6) अन्नाच्या प्रकारवरून आपली प्रकृती, संस्कृती बदलण्यासाठी.
‘माइंडफुल इटिंग’ म्हणजेच आपण खाणार्या अन्नाची उपयोगिता लक्षात घेवून त्याप्रमाणे ते खाणे. आजच्या धावपळीच्या युगात लोकांचा घरात शिजवलेल्या रुचकर अन्नपेक्षा बाहेरील हॉटेल, रस्त्यावर तयार होणारे पदार्थ खाण्याकडे कल वाढला आहे. लोक केवळ चवीसाठी हे पदार्थ खातात.
अनेकजण कायम हॉटेलिंग करणारे आहेत. पण शरीराला कोणते अन्न खाण्याची गरज आहे, त्याची उपयुक्तता आज लोक विसरले आहेत. त्यासाठी गरज आहे लोकांची अन्न विषयीची मानसिकता बदलण्याची. त्यासाठी आहे ‘माइंडफुल इटिंग’.
माइंडफूल इटिंग म्हणजे नेमकं काय?
ही ध्यानधारणेवर आधारित बुद्धिस्ट संकल्पना आहे. याचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांवर उपचारपद्धती म्हणून केला जोतो.
जसे की खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पोटाच्या तक्रारी, उदासिनता, भीती, वाढते वजन इत्यादि. हे तंत्र तुम्हाला मानसिक आणि शरीरिकदृष्टीने अन्नाची गरज समजावून देते.
आपण जेव्हा निरोगी आरोग्याची प्रार्थना करतो त्यामध्ये महत्वाची भूमिका असते अन्न या घटकाची. आरोग्याप्राप्तीसाठी ध्यानधारणा करताना नेमकी हीच गोष्ट आपण विसरतो. अन्न खाताना काही गोष्टी समजून घेणे महत्वाचे आहे. माइंडफुल इटिंग तंत्रात यासंदर्भातील पुढील बाबीचा समावेश होतो.
1) हळूहळू आणि न घाबरता खाणे (‘न घाबरता’ म्हणजे मनात कुठलीही भीतीची भावना न ठेवता.)
2) भूक असेल तेव्हढेच आणि पोटभर खाणे.
3) खूप भूक असणे आणि नसणे असा भुकेतला फरक समजून घेणे.
4) रंग, वास, चव, अन्नाचा प्रकार, स्वरूप समजून जेवणे.
5) आरोग्यास पूरक आणि पोषक अन्न खाण्याची सवय लावणे.
6) तुमच्या शरीरावर आणि मनावर अन्नाचा होणारा परिणाम तपासणे.
7) जे अन्न आपण खातो त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे.
आपले शरीर हे सवयीचा गुलाम आहे. शरीराला जशी सवय आपण लावू तशी लागते. अश्या पद्धतीने आपण आपल्या खाण्याच्या वाईट सवयीचे रूपांतर चांगल्या सवयीमध्ये करू शकतो.
हे तंत्र आपण का वापरावे?
सध्याच्या फास्ट फूडच्या जगात लोकांचा बाहेरच्या खाण्यापिण्याकडे खूप कल वाढला आहे. पदार्थांच्या आवडी बदलल्या आहेत.
प्रसारमाध्यमांवर विविध पदार्थांच्या जाहिरातींचा होणारा भडिमार त्यास काहीप्रमाणात कारणीभूत आहे. अनेक नवीन पदार्थ बाजारात येत आहेत. ‘रेडी टू मेक’ कडे लोक आकर्षित होत आहेत.
त्यामुळे पौष्टिक आणि सकस असे काहीच पोटात जात नाही, याउलट ‘अन्न’ हे केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाल्ले जाऊ लागले आहे, शारीरिक पुष्टतेसाठी नाही.
अन्नाची उपयोगिता विचारात घेतली जात नाही. भरभर अन्न खाण्याच्या प्रक्रियेत तुमचे पोट नक्की किती भरले हे लक्षात येत नाही. कोणता पदार्थ खातो, हेही महत्त्वाचे आहे. भूक आहे म्हणून काहीही खाल्ले तर त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो.
जेवण झाल्यावरही भूक लागल्यासारखे वाटणे आणि थोडी भूक असताना खूप खाणे या सवयी प्रकृतीला बाधक आहेत. अशा वाईट सवयी न लगता अन्नविषयीची जागृती निर्माण होण्यासाठी, त्याचा प्रसार होण्यासाठी माइंडफूल इटिंग महत्वाचे आहे.
ही संकल्पना कोणकोणत्या कारणासाठी नेमक कसं काम करते ते आपण जाणून घेवूयात.
- वाढलेले वजन कमी करण्यासाठी
आजच्या युगात अनेक देशांमध्ये लठ्ठपणा हा एक आजार बनला आहे. अतिखाण्यामुळे वाढत्या वजनाची समस्या भारतातही वाढली आहे.
यामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. वजन कमी करण्याच्या इतर कोणत्याही प्रक्रिये पेक्षा जास्त परिणामकारक ‘माइंडफूल इटिंग’ संकल्पना आहे.
85 टक्के लोकांनी या संकल्पनेचा वापर करून त्यांचे अवाजवी वाढलेले वजन कमी केले आहे. अवाजवी खाण्यावर मर्यादा, अन्नाचे पोषकत्व, ठराविक वेळेत जेवणे, जेवण्याच्या सवयी बदलणे अश्या तंत्राचा वापर करून शरीराला कोणताही अपाय न होता यशस्वीरीत्या वजन कमी करता येते.
अनेक तज्ञांनीही या संकल्पनेला मान्यता दिली आहे. माइंडफुल इटिंगच्या अनेक शिबिरतून वाढलेले वजन आश्चर्यकारकरित्या कमी केलेले लोक आनंदी आणि तणावमुक्त झाले आहेत.
खाण्यापिण्याच्या वाईट सवयी बदलून वजनावर नियंत्रण मिळवता येते, हे सिद्ध झाले आहे.
2) बेफिकीर खादाडपणा कमी करण्यासाठी आणि खाण्याची वैचारिकता वाढवणे
खादाडपणाच्या व्याख्येत भूक नसताना बकासुरसारखे भरभर आणि भरपूर खाणे, याचा समावेश होतो. शरीराची गरज आणि मर्यादा लक्षात न घेता केवळ खात राहणे म्हणजे बेफिकीर खादाडपणा. ही एक मानसिकता असू शकते.
अनेकांना अन्न किंवा पदार्थ कोणताही असो तो भरपेट खाण्याची सवयच असते. त्यामुळे अशी मानसिकता असणारे अनेक लोक लठ्ठ असतात.
पण ‘माइंडफुल इटिंग’ च्या तंत्राने हा बेफिकीरपणा कमी करता येवू शकतो. त्यासाठी मनावर आणि तोंडावर नियंत्रण ठेवण्याची सवय लावली जाते.
भारंभार खाण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते आणि खादाडपणा मानसिकता बदलू शकतो. ही एक परिणामकारक पद्धती आहे. ‘अन्न आपल्यासाठी आहे आपण अन्नसाठी नाही.’
3) आरोग्यास घातक खाण्यापिण्याच्या वाईट सवयी
आपण काय खातो आणि कसे खातो यावर आपले आरोग्य अवलंबून आहे. यामध्ये साधारण दोन पद्धती आहेत.
एक म्हणजे अन्नाबद्दल असणारी भावनिकता आणि दुसरी म्हणजे अन्नाची वासना नसणे. या दोन्ही गोष्टी वेगळ्या परिणाम करणार्या आहेत.
अनेकजण पोट भरलेले असले आणि कोणी त्यांच्यासमोर गुलाबजाम किंवा बासुंदीची वाटी आणली तर केवळ समोर आलेल्या अन्नाचा अपमान करायचा नाही या भावनेपोटी ती वाटी स्वीकारतात.
याउलट काही पदार्थांचा वास, चव अनेकजणांना आवडत नाही. म्हणून भूक असली तरी केवळ तो पदार्थ आवडत नाही म्हणून ते खात नाहीत. केवळ अन्नावर वासना नसते म्हणून अन्न खाणे टाळणारे लोक आहेत. याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो.
या आरोग्यास घातक सवयी बदलण्यासाठी, मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी ‘माइंडफुल इटिंग’ खूप महत्वाची भूमिका बजावते.
‘माइंडफुल इटिंग’चा वापर कसा करावा?
हे तंत्र आत्मसात करण्यासाठी तुम्हाला ध्यानधारणा, व्यायाम, योगसाधना यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. अनेकजण शिबिरे, ऑनलाइन कोर्स करतात.
पण ते करूनही त्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्यांचे पालन करणेही महत्वाचे आहे. घरच्याघरी खाण्यापिण्याच्या सवयी बदलू शकता.
ही संकल्पना खूप सोपी आहे जी कोणीही आत्मसात करू शकते, त्यासाठी हवा संयम, चिकाटी आणि आत्मसंतुलन. पुढीलप्रमाणे काही नियम पाळणे आवश्यक आहे.
1) ताटात येईल ते हळूहळू आणि चावून खा.
2) जेवताना घाई-गडबड टाळा.
3) जेवताना टीव्ही पाहणे, मोबाईलवर बोलणे टाळा.
4) शांतपणे न बोलता जेवा, मनापासून जेवा.
5) जे खात आहात त्याच्यावर लक्ष केन्द्रित करा.
6) पोट भरल्यासारखे वाटल्यावर जेवण थांबवा.
7) आपण कशासाठी खातोय, त्याचा खराखुरा उद्देश आणि उपयोगिता लक्षात घ्या.
8) नेहमी पौष्टिक अन्नाचा आग्रह धरा
9) अन्नाचा अपमान करू नका.
10) वेळेवर जेवा, नाश्ता घ्या, फळे खा.
या सर्व महत्वाच्या गोष्टींचा विचार, वापर नेहमी करा. तरच जे तुम्ही खाल ते तुमच्या अंगी लागेल आणि तुमची प्रकृती निरोगी राहील.
लक्षात ठेवा, अन्न खाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया व्यवस्थित होणे आवश्यक आहे.
कारण ‘जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्णब्रम्ह’. आपला आहार हेच आपल्या अनेक आजारांवरील औषध आहे. रुचेल तेच पहा आणि पचेल तेच आणि आवश्यक तेवढेच खा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.