बऱ्याच जणांना त्यांच्या उंचीबद्दल न्यूनगंड असतो.
उंची जास्त असेल तर व्यक्तिमत्वावर त्याचा प्रभाव पडतो असे वाटते.
आपल्या दिसण्याबद्दल जागरूक असणे ही चांगली गोष्ट आहे.
काही पालक आपल्या मुलांच्या उंचीबद्दल चिंतेत असतात.
मुलांची उंची योग्य वयात, योग्य प्रमाणात वाढवी यासाठी ते प्रयत्नशील असतात.
मुलांची उंची, वजन हे दोन्ही योग्य प्रमाणात असावे जेणेकरून दिसण्याबरोबरच त्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहील, हेच त्यामागचे मुख्य कारण आहे.
उंची ही काही अंशी जेनेटिक असते, म्हणजे जर एखाद्या परिवारामध्ये सगळेच बुटके असतील तर त्या परिवारातल्या लहान मुलांची उंची वाढण्यावर सुद्धा मर्यादा येतात.
क्वचित एखाद्या मुलाची उंची अचानक वाढू शकते पण सर्वसाधारणपणे नाहीच.
पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की उंची वाढणे जितकं जीन्सवर अवलंबून आहे तितक्याच इतरही काही गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहेत.
जीन्स हे आपल्या हातात नसले तरी या गोष्टी आपल्या हातात नक्कीच आहेत.
मुलांच्या वाढत्या वयात योग्य दिशेने प्रयत्न केले तर त्याची उंची वाढण्यासाठी नक्की मदत होते.
आईबाबांनी हे प्रयत्न नक्की केले पाहिजेत कारण उंची वाढल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो, देहबोली सुद्धा सुधारते.
अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा उंची वाढण्यावर परिणाम होतो?
काय केल्याने उंची वाढण्यास मदत होते?
आजचा हा लेख त्याचसाठी आहे.
तुम्ही जर तुमच्या मुलांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
१. पौष्टिक आणि चौकस आहार
संतुलित आहार हे अनेक प्रश्नांवरचे साधे, सोपे आणि सरळ उत्तर आहे.
वाढत्या वयातील मुलांचा आहार चौकस असणे हे त्यांच्या एकूण आरोग्यासाठी, वाढीसाठी अत्यंत गरजेचे आहे.
आहारात योग्य पदार्थांचा समावेश केला तर उंची वाढण्यासाठी मदत होते.
कॅल्शियम आणि व्हिटामिन ‘डी’ चे प्रमाण वाढवल्याने मुलांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
कॅल्शियम हे हाडांच्या वाढीसाठी गरजेचे असते तर व्हिटामिन ‘डी’ हे स्न्यायुंच्या.
दुधाच्या पदार्थांमधून कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळतात.
नाचणीमध्ये सुद्धा कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते.
वाढत्या वयातील मुलांना दिवसातून एक ग्लास तरी दुध प्यायला दिले पाहिजे जेणेकरून त्यांच्या हाडांची वाढ योग्य प्रमाणात होईल.
पौष्टिक आणि सकस आहारातून सगळीच महत्वाची पोषकद्र्व्ये योग्य प्रमाणात शरीराला मिळत असतात.
यामध्ये ताज्या भाज्या, फळे, भरपूर प्रथिने, दुध, ड्रायफ्रुट यांचा समावेश असायला हवा.
२. कोवळे ऊन
कॅल्शियम हे आहारातून घेता येते.
दुधामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतात. कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळणाऱ्या पदार्थांचा जेवणात समावेश करून हाडांची वाढ सुधारता येते.
व्हिटामिन ‘डी’ मुळे अन्नातून घेतलेल्या कॅल्शियमचे शरीरात अबसॉर्ब्शन नीट होते.
तसेच ते स्नायूंच्या वाढीसाठी गरजेचे असते.
व्हिटामिन ‘डी’ हे कोवळ्या उन्हात बसल्यावर आपल्या त्वचेत तयार होते.
त्यामुळे उंची वाढवायचा प्रयत्न करत असाल तर जास्तीतजास्त सकाळचे, कोवळे ऊन अंगावर घेतले पाहिजे.
जेणेकरून व्हिटामिन ‘डी’ जास्त प्रमाणात मिळेल.
ज्या प्रदेशात सकाळचे कोवळे ऊन मिळणे शक्य नसते अशा प्रदेशातील मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटामिन ‘डी’ च्या गोळ्या किंवा पावडर दिली जाऊ शकते.
३. व्यायाम
काही व्यायाम हे उंची वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
हे व्यायाम कोणते ते जाणून घेऊन मुलांना त्यांची गोडी लागावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मुलांना हे व्यायाम करायला प्रवृत्त केले पाहिजे.
मात्र हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, हे व्यायाम म्हणजे काही जादू नाही की आज व्यायामाला सुरुवात केली आणि आठवड्यातच उंची प्रचंड प्रमाणात वाढली.
नियमितपणे हे व्यायाम करत राहिल्याने उंची वाढायला मदत होते.
या व्यायामाला उत्तम, सकस, पौष्टिक आहाराची जोड मिळाली तर अजूनच फायदेशीर ठरते.
स्ट्रेचिंग करून उंची वाढवली जाऊ शकते.
ज्या स्ट्रेचेसमुळे मज्जारज्जूवर भार येऊन ती लांब केली जाते, असे व्यायाम मुलांना करायला सांगितले तर त्यांची उंची वाढायला नक्कीच मदत होईल. हे मात्र जाणकार फिजिओथेरपीस्ट, डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली करावे.
उंची वाढवण्यासाठी ज्या व्यायामांमुळे पोटरीवर भार येतो असे व्यायाम फायदेशीर असतात.
हात डोक्यावर घेऊन नमस्कार करून, टाचा उंच करून चालल्याने पोटऱ्याना चांगला व्यायाम मिळतो.
दिवसातून दो ते तीन मिनिटे असे चालल्याने उंची वाढायला नक्कीच मदत होते.
सायकलिंग, उंचीवर बारला धरून लोंबकाळणे यासारख्या व्यायामांमुळे सुद्धा उंची वाढायला मदत होते.
४. पाठीला बाक येऊ देऊ नका
वाढत्या वयातल्या मुलांना बऱ्याचदा पाठीला किंचित बाक काढून बसायची, चालायची सवय लागते.
खांदे सुद्धा काही मुले पाडून चालतात.
अशी सवय असेल तर ती वेळीच काढून टाकली पाहिजे. यामुळे मज्जारज्जू वाकला जातो आणि उंची वाढण्यावर त्याचा परिणाम होतो.
उंची व्यवस्थित असली तरी अशी चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे ती कमी असल्यासारखी भासू शकते.
ताठ बसणे, ताठ उभे राहून, खांदे सरळ ठेऊन चालले तर उंचीत लगेच फरक पडतो.
शिवाय बसणे, चालणे सुधारले की स्वतःच्या वाढणाऱ्या उंचीबद्दल आत्मविश्वास सुद्धा वाटायला लागतो.
५. आत्मविश्वास वाढवा
वरील मुद्दाच पुढे नेत, कसे बसतो, कसे चालतो याबद्दल मुलांच्या मनात जागरूकता निर्माण करा.
त्यांना योग्य पद्धतीने बसायची सवय लावा. चालताना त्यांचे खांदे झुकत असतील तर त्यांना सारखे सावध करून सुधारणा करायला प्रवृत्त करा.
आरशासमोर चालायची सवय लावली, किंवा त्यांच्या चालण्याचे व्हिडीओ करून त्यांनाच दाखवले तर त्यांना त्यांची काय चूक होत आहे ते लवकर समजेल.
यामुळे त्यांना सुधारणा करायला सोपे जाईल.
६. व्यवस्थित झोप घेऊ द्या
झोपेचा आणि उंचीचा काय संबंध?
हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. खरेतर उंची वाढवण्यासाठी पुरेशी झोप घेणे हा उपाय जरा गमतीशीर वाटतो, पण यात सुद्धा झोपेचे महत्व आहे.
आपले शरीर सतत कार्यरत असते, आपल्या झोपेत सुद्धा.
मुले झोपेत असताना त्यांची वाढ जास्त प्रमाणात होत असते.
म्हणूनच रात्रीची सलग ७ ते ८ तासांची झोप अत्यंत गरजेची आहे.
झोपताना उशी शिवाय, पाठीवर झोपल्याने उंची वाढायला अजून मदत होते.
वाढत्या वयातील मुलांकडे नीट लक्ष देऊन त्यांची उंची वाढण्यासाठी योग्य प्रयत्न केले तर नक्कीच त्याचा उपयोग होईल.
तुमचे प्रयत्न सोपे करायला या टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
एका ठरविक वयानंतर उंची वाढत नाही.
उंची कमी असेल तरीही त्यात निराश होण्यासारखे काही नाही.
तुमचा आत्मविश्वास आणि तुमची देहबोली हे जास्त महत्वाचे आहे.
या दोन्हीचा वापर करून तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व जास्तीत जास्त प्रभावी करू शकता.
पण तरीही तुम्हाला जर उंच दिसायची हौस असेल तर तुम्ही या गोष्टी करून बघू शकता.
१. उंच टाचांचे बूट
हा जरी उंची वाढवण्यासाठीचा उपाय नसला तरी यामुळे उंच दिसता येते.
उंच टाचांचे बूट/सँडल हे तात्पुरते का होईना पण उंच असल्याचे समाधान देते. त्यामुळे नक्कीच आत्मविश्वास वाढतो
यासाठी चालायला अवघड असणाऱ्या चपलांची निवड करायला पाहिजे असे काही नाही.
उंची जास्त दिसण्यासाठी उपलब्ध असणारे शू लिफ्ट्स हे मुले आणि मुली अगदी सहज वापरू शकतात.
यामुळे चालताना, वावरताना अजिबात अवघडलेपण येत नाही.
२. कपडे
कपड्यांची योग्य पद्धत निवड केली तर तुमची उंची आहे त्यापेक्षा जास्त भासू शकते.
याउलट काही कपड्यांमुळे तुम्ही बुटके वाटू शकता.
उंच दिसायचे असल्यास, लांब ड्रेस निवडावेत.
तसेच उभे पट्टे असलेले ड्रेस याची निवड करता येते.
उंची कमी असल्यास साडीची निवड करताना साडीचा काठ जास्त मोठा नाही न याची खात्री करून घ्यावी.
कमी उंचीच्या बायकांनी जाड, मोठ्या काठाची साडी नेसली तर त्यांची उंची अजूनच कमी वाटू शकते.
काय मग मित्रांनो आणि मैत्रीणींनो आवडल्या ना टिप्स!!
तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी… मग आता तुम्ही एक करायचं, आमच्यासाठी आणि तुमच्या इतर मित्र परिवारासाठी….
पटापट, उंची-आत्मविश्वास वाढवण्यासाठी लिहिलेला हा लेख शेअर करायचा….
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Perfect!