त्वचेच्या तक्रारींमध्ये एक तक्रार हमखास ऐकायला मिळते, ती म्हणजे डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे.
अर्थात डार्क सर्कल्स. डार्क सर्कल्स येण्यामागे अनेक कारणे असतात.
अपुरी झोप, स्ट्रेस, थकवा, वय ही त्यातली काही प्रमुख कारणे आहेत.
पाणी कमी प्रमाणात प्यायल्याने सुद्धा डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे वाढतात.
अनुवांशिकता हे सुद्धा महत्वाचे कारण आहे.
काहीवेळा काही व्हिटामिनचा अभाव सुद्धा या डार्क सर्कल्सन कारणीभूत असतो.
व्हिटामिन ए, सी. ई व के जर योग्य प्रमाणात घेतली तर डार्क सर्कल्स कमी व्हायला फायदा होतो.
पण बहुतांश वेळा डोळ्यांभोवती आलेली डार्क सर्कल्स ही अपुरी झोप, थकवा, जास्त वेळ कॉम्पुटर स्क्रीनकडे बघणे आणि स्ट्रेस यामुळेच आलेली असतात.
थकवा आणि स्ट्रेसमुळे डार्क सर्कल्स बरोबर डोळे सुजल्यासारखे सुद्धा दिसायला लागतात.
याचा एकूण दिसण्यावर एकदम परिणाम होतो.
मेक अप वापरून हे डार्क सर्कल्स कमी करता येतात पण तो तात्पुरताच उपाय ठरतो.
डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतील तर चेहरा नेहमी थकल्या सारखा दिसतो.
अशावेळेला मग तुम्ही आजारी आहात का अशी सतत विचारपूस केली जाते.
त्यामुळे या त्रासदायक समस्येवर तात्पुरता नाही तर कायमचा उपाय शोधण्याची गरज आहे.
काही क्रीम्स वापरून थोड्या फार प्रमाणात डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळे कमी करता येतात पण या क्रीम्सचा वापर थांबवला तर ही वर्तुळे परत वाढण्याची शक्यता असते.
डार्क सर्कल्स कमी करायची असतील तर सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे पुरेशी झोप घेऊ थकवा घालवणे, स्ट्रेस कमी करणे आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणे.
हे सगळे करून, योग्य ती काळजी घेऊन सुद्धा काहींना हे डार्क सर्कल्स सतावत राहतातच.
अशावेळी त्यांच्यावर काहीतरी ठोस उपाय हवाच, नाही का?
या लेखात आम्ही तुम्हाला असे काही सोपे उपाय सांगणार आहोत.
काकडीचा रस, बटाट्याचा रस डोळ्यांभोवती लावावा हे उपाय डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी केले जातात.
पण या व्यतिरिक्त सुद्धा असे बरेच उपाय आहेत जे नियमितपणे केल्यास हा त्रास दूर होण्यासाठी मदत होते.
डार्क सर्कल्स घालवण्यात अनेक घटक गुणकारी आहेत.
या लेखात त्याबद्दलच माहिती दिली आहे. हे घरगुती उपाय तुम्हाला तुमच्या घरी नेहमीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून करता येणार आहेत.
नियमितपणे हे उपाय केल्यास आणि त्याच्या जोडीला पुरेशी झोप, आराम असेल तुमच्या डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे नक्की कमी होतील.
१. कॉफी
कॉफी पावडर ही डोळ्यांखाली आलेला काळपटपणा, डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे आणि त्यामुळे डोळ्यांना आलेली सूज घालवण्यात गुणकारी आहे.
यासाठी तुम्हाला थोड्याशा खोबरेल तेलात कॉफी पावडर घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
ही पेस्ट तुमच्या डोळ्यांभोवती १० मिनिटांसाठी लाऊन ठेवावी व त्यानंतर डोळे थंड पाण्याने धुवून घ्यावेत व कॉटनच्या कपड्याने अलगद त्यावरचे पाणी टिपून घ्यावे.
आठवड्यातून २ ते ३ वेळा हा घरगुती आय मास्क तयार करून डोळ्यांभोवती लावला तरी चालतो.
यामुळे डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे कमी होतात आणि डोळे जास्त ताजेतवाने दिसू लागतात.
२. बटाटा व पुदिना आय मास्क
नितळ व तेजस्वी त्वचेसाठी बटाट्याचा वापर केला जातो.
यामुळे त्वचेवरचे काळे डाग किंवा कमी होतात.
डार्क सर्कल्ससाठी सुद्धा बटाटा उपयुक्त आहे.
पुदिना डोळ्यांना गारवा देतो. जर झोपेच्या अभावाने किंवा स्ट्रेसमुळे डोळे सुजल्यासारखे, निस्तेज दिसत असतील तर पुदिन्याच्या वापराने ही सूज कमी होते व डोळे फ्रेश दिसायला मदत होते.
हा मास्क तयार करण्यासाठी बटाट्याचा एक तुकडा आणि पुदिन्याची ताजी पाने मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्यावीत.
मिक्सरमधून वाटल्यावर जी पेस्ट तयार होईल ती एका सुती कापडात घालून पिळून घ्यावी.
यामुळे बटाटा व पुदिन्याचा रस गाळला जाईल, ज्यामध्ये औषधी घटक असतात.
कापसाचे बोळे या गाळलेल्या रसात बुडवून, हलकेच पिळून घ्यावा व १५ मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवावा.
१५ मिनिटे डोळे मिटून शांत बसावे व नंतर दोन्ही डोळ्यांवरचे बोळे काढून डोळे पुसून घ्यावेत.
हा उपाय करताना एक काळजी घेणे गरजेचे आहे.
कापसाचे बोळे पूर्णपणे पिळले जाऊन त्यामधील संपूर्ण रस काढून घेऊ नये.
डोळ्यावर बोळे ठेवल्यावर त्यातील रस संपूर्ण चेहऱ्यावर ओघळला जाऊ नये पण त्यात रसाचा अंश राहावा इतपतच पिळून घ्यावा.
आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने डार्क सर्कल्स कमी व्हायला मदत होते.
यामुळे डोळ्यांना गारवा मिळतो व डोळ्यांवर आलेला थकवा जाऊन डोळे फ्रेश दिसतात.
तुम्हाला जर कुठे बाहेर जायचे असेल तर त्यापूर्वी घरच्याघरी या उपाय करावा.
३. कोरफड जेल
कोरफडीच्या जेलचा त्वचेच्या अनेक तक्रारींवर फायदा होतो.
डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे कमी करण्यात सुद्धा हे बहुगुणी जेल उपयुक्त आहे.
बाजारात हे जेल उपलब्ध असते किंवा हे तुम्ही घरच्याघरी सुद्धा तयार करू शकता.
यासाठी कोरफडीच्या पानातील गर काढून घ्यावा.
त्यात थोडे पाणी मिसळून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
हे तुमचे तयार कोरफडीचे जेल आहे. हे फ्रीजरमध्ये तुम्ही ठेऊ शकता. या कोरफडीच्या जेलमध्ये थोडा लिंबाचा रस मिसळून डोळ्यांभोवती मालिश करावी.
रोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्याने डोळ्यांभोवती आलेली डार्क सर्कल्स कमी होतात.
४. गुलाबजल
त्वचेच्या विकारांवर गुलाबजल फार पूर्वीपासून वापरले जाते.
अनेक फेसपॅक सुद्धा गुलाबजलमध्ये कालवली जातात. यामुळे त्वचेला हवे ते पोषण मिळते, त्वचा उजळ व तजेलदार होते.
डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे आणि सूज घालवण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे.
कापसाचे बोळे गुलाबजलात भिजवून हलकेच पिळून घ्यावेत व त्या घड्या डोळ्यावर अलगद ठेऊन डोळे बंद करून १५ मिनिटे शांत बसावे.
यामुळे डोळ्यांना गरज असलेला आराम मिळेल व डार्क सर्कल्स आणि सूज कमी व्हायला मदत होईल.
तुमच्या सोयीनुसार हा उपाय रोज केला तरी त्याचा त्वचेला काही त्रास होणार नाही.
५. टोमॅटो व लिंबू
टोमॅटोमुळे डोळ्यांभोवतीचा काळपटपपणा कमी होतो तर लिंबामुळे त्वचेला गरजेचे असलेले व्हिटामिन सी मिळते.
यासाठी एक चमचा टोमॅटोचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून घ्यावा.
कापसाच्या बोळ्याने डोळ्यांभोवती हा रस अलगद लाऊन घ्यावा.
१० मिनिटे ठेऊन डोळे थंड पाण्याने धुवून घ्यावेत.
रोज एकदा किंवा दोनदा हा उपाय केला जाऊ शकतो. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतील.
६. ग्रीन टी
दोन ग्रीन टी बॅग पाण्यात बुडवून घ्याव्यात.
या टी बॅग काही तास फ्रीजमध्ये ठेऊन थंड करून घ्याव्यात.
त्यानंतर डोळ्यांवर १० ते १५ मिनिटांसाठी ठेवाव्यात.
यामधले ऍन्टीऑक्सिडन्टस डार्क सर्कल्स कमी करण्यात उपयुक्त ठरतात.
उत्तम रिझल्ट्स मिळण्यासाठी रोज किंवा दोन दिवसातून एकदा हा उपाय करावा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.